जिगरबाज ‘लेपर्ड मॅन’!

    दिनांक  04-Jul-2019    

 
आपल्या जीवाची बाजी लावून बिबट्या बचावाचे, संरक्षणाचे काम करणारे, जिगरबाज लेपर्ड मॅनवनाधिकारी सुनील वाडेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 

मुंबई (अक्षय मांडवकर) : वन्यजीवांसाठी काम करण्याच्या तळमळीने त्यांनी रेल्वेमधील नोकरी सोडून वनविभागात प्रवेश मिळविला. मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांवर मात करणे यात त्यांचा हातखंडा. नाशिक जिल्ह्यातील त्यांचे बिबट्या बचावाचे आणि त्यासंबंधीच्या जनजागृतीसाठीचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. गेल्या १९ वर्षांच्या सेवेत त्यांनी दीडशेहून अधिक बिबट्यांना जीवदान दिले आहे. जीवाची बाजी लावून बिबट्या बचावाचे काम करण्यासाठी तेसुपरिचित आहेत. असे जिगरबाज लेपर्ड मॅनम्हणजे वनाधिकारी सुनील वाडेकर!

 

वाडेकर यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १९६८ सालचा नाशिकच्या भगूरमधला. त्यांचे वडील वसंतराव वाडेकर हे शहरी भागात वनविभागाच्या सेवेत कार्यरत होते. त्यामुळे वाडेकर यांचे बालपण ग्रामीण भागातच गेले. जंगलाशी आणि पर्यायाने वन्यजीवांशी त्यांची जवळीक निर्माण झाली. यातून आपसूकच वन्यजीव संवर्धनाची आवड वाढत गेली. वाडेकर यांनी विज्ञान शाखेत वन्यजीव विषयातून एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वन्यजीव क्षेत्रात काम करण्याची इच्छा असूनही त्यांनी दोन वर्ष रेल्वे विभागात नोकरी केली, परंतु, वन्यजीवांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी २००० मध्ये एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन वनविभागात प्रवेश मिळवला. १ मे २००० मध्ये ते नाशिक शहरात वनविभागाच्या सेवेत रुजू झाले. वाडेकर नाशिकमध्ये कार्यरत असताना फेब्रुवारी, २००४ मध्ये शहरात प्रथमच बिबट्या शिरल्याचा प्रसंग घडला. त्यापूर्वी शहराच्या भरवस्तीत बिबट्या शिरल्याची घटना कधीही घडली नव्हती.

 

नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील रसोई उपाहारगृहात बिबट्या लपल्याची बाब वाडेकर यांच्या लक्षात आली. सकाळची वेळ असल्याने या परिसरात रहदारी वाढणार होती. प्रसंगावधान राखून पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी नाशिकमध्ये बिबट्याला बेशुद्ध करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती. म्हणून मुंबईहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्या पथकाला नाशिकमध्ये दाखल होण्यास चार ते पाच तास लागणार होते. मात्र, तोपर्यंत बघ्यांच्या गर्दीमुळे परिस्थिती चिघळणार होती. बिबट्याची एक झलक पाहण्यासाठी जमलेला जमाव पोलिसांनाही पांगत नव्हता. त्या गोंधळात उपाहारगृहात दडून बसलेला बिबट्या चवताळून बाहेर पडला आणि त्याने लोकांवर हल्ला चढवला. काही अतिउत्साही लोकांनी हातात मिळेल त्या वस्तूने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला. त्यात ते देखील जखमी झाले. हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला बंदुकीच्या गोळीने ठार करण्याचे आदेश दिले. अखेरीस पोलिसांच्या मदतीने बिबट्याला ठार करण्यात आले. मात्र, या घटनेचा वाडेकरांच्या मनावर आघात झाला. केवळ बघ्यांच्या चुकीमुळे एका निष्पाप प्राण्याला आपल्या जीवाला मुकावे लागल्याची बाब त्यांच्या मनाला बोचत होती.

 

विभागाने या प्रसंगाची गांभीर्याने दखल घेत, वाडेकर आणि इतर वनाधिकाऱ्यांना मुंबईला प्रशिक्षणाला पाठविले. त्यांना बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्या बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर नाशिक आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात घडणाऱ्या बिबट्या बचावाचे काम वाडेकर करू लागले. २०१२ मध्ये असाच कठीण प्रसंग त्यांच्यावर ओढवला. यावेळी वाडेकरांनी जीवाची बाजी लावून बिबट्याला पकडले. वणी येथील सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी खुल्या जागेत वावरणारा बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. अनियंत्रित गर्दीमुळे बिबट्याने काही लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. लोकांच्या गराड्याभोवती अडकलेल्या बिबट्याला बघ्यांनी डिवचल्याने त्याने १५ फुटांवरून वाडेकरांच्या अंगावर उडी मारली. झाडाचा आसरा घेतल्यामुळे ते बचावले. बिबट्या झाडावर जाऊन बसला. अशावेळी वाडेकर एका गाडीवर उभे राहून झाडापाशी गेले आणि त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. अशा प्रसंगांदरम्यान अडकलेल्या प्राण्याला वाचविण्यापेक्षाही जमणारी बघ्यांची गर्दीच खऱ्या अर्थाने आमच्यासमोरील आव्हान असल्याचे वाडेकर सांगतात.

 

गेल्या १९ वर्षांच्या वनसेवेत वाडेकरांनी एकदाही मागे वळून न पाहता, बिबट्या बचावाचे काम सुरू ठेवले आहे. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, ठाणे, पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यातील सुमारे दीडशेहून अधिक बिबट्यांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत. तसेच त्यांनी बिबट्या बचावाचे प्रशिक्षण महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यातील वनकर्मचाऱ्यांनाही दिले आहे. वाडेकर यांना पुढील वाटचालीकरिता दै. मुंबई तरुण भारतकडून शुभेच्छा!

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat