शिक्षा एका मदतीची...

    दिनांक  04-Jul-2019   
 
 
 
एका मुलीने ४० लोकांचा जीव वाचवला तरीही तिला कैदेत टाकण्यात आले. तिला लाखो रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. तिच्यावरून जगातल्या तीन देशांत वाद-प्रतिवाद नि तणावाची स्थिती उद्भवली. तथापि, तिच्या सुटकेसाठी हजारो लोकांनी आवाजही उठवला आणि तिच्या मदतीसाठी १० कोटी रुपयेही जमा करण्यात आले. पण नेमके काय आहे हे प्रकरण? तिला का अटक करण्यात आली? तिचा अपराध तो काय? आता तिला कारागृहातून सोडले का? आणि नेमकी कुठे घडली ही घटना? तर जाणून घेऊया याचबद्दल...
 

हे प्रकरण जर्मनी आणि इटलीच्या सीमेवरील असून अटक केलेल्या मुलीचे नाव करोला राकेटे असे आहे. तिने समुद्रमार्गे येणाऱ्या ४० स्थलांतरितांचा जीव वाचवला. हे सगळेच इटलीत घुसण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान तिच्यावर पोलिसांच्या जहाजाला टक्कर मारल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि हाच आहे तिचा गुन्हा. आफ्रिकी देशांतील यादवी, युद्धजन्य परिस्थितीमुळे हजारोंच्या संख्येने लिबिया वगैरे देशांतून पलायन केलेले स्थलांतरित इटलीच्या समुद्री सीमेत अडकलेले आहेत. दरम्यान, जर्मनीच्या एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणारी करोला एका जहाजाची कप्तान असून ती या स्थलांतरितांपैकीच ४० जणांच्या गटाला वाचवण्यासाठी समुद्रात पोहोचली. लोकांना वाचवण्याच्या या प्रयत्नात सुमारे दोन आठवडे चहुबाजूंनी पाण्याने वेढलेल्या ठिकाणी राहिल्यानंतर तिने इटलीच्या सागरी सीमेत प्रवेश केला. तिच्या जहाजाला रोखण्यासाठी इटलीच्या पोलिसांनी पिच्छा केला, पण करोला आपल्या जहाजाला न थांबवता पुढे पुढेच घेऊन जाऊ लागली. पुढे जाण्याच्या प्रयत्नांतच ती इटलीच्या लाम्पेदूसा बंदरावर पोहोचली, तेही विनापरवानगी. दरम्यान, नंतर पोलिसांनी आरोप केला की, करोलाने मुद्दामहून पोलिसांच्या गस्तीनौकेला टक्कर मारण्याचा उद्योग केला आणि म्हणूनच तिला अटक करण्यात आली. तथापि, करोलाच्या वकिलांनी वेगळीच कहाणी सांगितली. त्यांच्या मते, करोलाने पोलिसांची गस्तीनौका पाहताच आपल्या जहाजाचे इंजिन बंद केले. याचमुळे तिचे सी वॉच-3’ नामक जहाज पोलिसांच्या नौकेला धडकण्यापासून बचावले.

 

त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले आणि इटली, फ्रान्स व जर्मनी या तीन युरोपियन देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली. इटलीच्या सत्ताधारी पक्षाचे नेते-उपपंतप्रधान मॅटिओ साल्विनी यांनी देशात स्थलांतरितांच्या प्रवेशाला बंदी घातलेली आहे. सोबतच समुद्रमार्गे येणाऱ्या लोकांचा प्रश्न सोडवण्यात अन्य युरोपीय देशांनी इटलीला एकटे पाडल्याचा आरोपही त्यांनी केला. म्हणूनच करोलाने केलेल्या कृत्याला गुन्हा ठरवत हा अॅक्ट ऑफ वॉरचा प्रकार असल्याचेही म्हटले. साल्विनी यांनी जर्मनीच्या राष्ट्रपतींना आवाहन करत,“स्वतःच्या देशातल्या प्रकरणांची चिंता करा,” असा सल्लाही दिला. तसेच शक्य असेल तर आपल्या नागरिकांना इटलीत येऊन इथल्या नियमांचे उल्लंघन न करण्याचा आदेश द्या, असेही सांगितले. अर्थातच यामागे जर्मनीचे राष्ट्रपती फ्रॅन्क वॉल्टर स्टाइनमायर यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी होती. करोलाच्या अटकेनंतरच स्टाइनमायर यांनी, लोकांचा जीव वाचवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अपराधी मानता येणार नाही, असे म्हटले होते. साल्विनी यांनी याच विधानावर आक्षेप घेत त्यांना प्रत्युत्तर दिले.

 

दुसरीकडे, बु्रसेल्समध्ये युरोपीय संघाच्या बैठकीसाठी आलेल्या इटालियन पंतप्रधान गिसेप्पे कॉन्टे यांनी तर करोला राकेटे हिच्यावर सरळसरळ राजनैतिक ब्लॅकमेलिंगचा आरोप लावला. तसेच २००७ साली जर्मनीच्या तूरिन प्लान्टमध्ये लागलेल्या आगीचे प्रकरण उकरून काढले. जणांचा जीव घेणाऱ्या या आग प्रकरणात काही अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले होते. याबाबत कॉन्टे यांनी म्हटले की, जर्मनीने अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेवर नेमकी काय अंमलबजावणी केली, त्याची माहिती द्यावी. दरम्यान, एका बाजूला करोला प्रकरणावरून इटली आणि जर्मनीत भांडण पेटलेले असतानाच फ्रान्सनेही यात दखल देत स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित केला. परिणामी इटलीने फ्रान्सलाही लक्ष्य केले. या सर्व घडामोडी घडत असतानाच नंतर नागरिकांच्या वाढत्या दबावातून आणि संघर्ष विकोपाला जाऊ नये म्हणून इटलीने करोलाला तुरुंगातून सोडले. परंतु, तिला सोडले तरीही तिच्यावर खटला चालवू, असे म्हटले. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कोणतेही स्थलांतर हे त्या त्या प्रदेशातील स्थानिकांच्या अधिकारावरील अतिक्रमणच असते, पण म्हणून करोलासारख्यांवर गुन्हा दाखल करणे योग्य ठरते का?

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat