'तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय...' जडेजा मांजरेकरांवर 'सर'

    दिनांक  04-Jul-2019नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर हे सध्या क्रिकेटप्रेमींच्या टीकेचे धनी ठरत आहेत. विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध भारताच्या पराभवानंतर मांजरेकर यांनी काही खेळाडूंवर निशाणा साधला होता. यामुळे सोशल मीडियावर त्यांना चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यानेदेखील ट्विटरवरून चांगली शाळा घेतली आहे.

 

भारतीय संघावर टीका करताना संजय मांजरेकर काय म्हणाले होते?

 

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या समावेशाचे संकेत दिले होते. परंतु जाडेजाच्या संघात सामील होण्याच्या वृत्तावर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "तुकड्यांमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहू शकत नाही. तुकड्या-तुकड्यांमध्ये कामगिरी करणारे खेळाडू मला आवडत नाही, जसा की सध्या रवींद्र जाडेजाची एकदिवसीय सामन्यामधील कामगिरी. मला एकतर गोलंदाज आवडेल किंवा फलंदाज."

 

सर रवींद्र जाडेजाने दिले असे सणसणीत उत्तर

 

मांजरेकरांच्या या विधानावर रवींद्र जाडेजाने ट्विट करून सडेतोड उत्तर दिले. "मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय आणि अजूनही खेळतोय. ज्यांनी काही कमावले आहे, अशा लोकांचा आदर करायला शिका. मी तुमच्या 'व्हर्बल डायरिया' बाबत खूप ऐकले आहे." अशा खोचक शब्दात जाडेजाने त्यांना उत्तर दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat