विश्वचषकानंतर धोनीची निवृत्ती ?

    दिनांक  04-Jul-2019नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवणारा आणि अजूनही भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील भारतीय संघाचा अखेरचा सामना हा महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलाही अखेरचा सामना असण्याची शक्यता आहे. विश्वचषकानंतर धोनी भारताकडून पुन्हा खेळेल असे वाटत नसल्याचे मत बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना व्यक्त केले होते. त्यानंतर क्रिकेट विश्वात आता अनेक तर्कवितर्क लावले जात असून अजून कुठलाही अधिकृत दुजोरा बीसीसीआय किंवा धोनीकडून आलेला नाही.

 

भारताच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा अचानक राजीनामा देऊन धोनीने धक्का दिला होता. त्यामुळे त्याचा काहीच भरवसा देता येत नाही. भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि १४ जुलैला लॉर्डसवर विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला, तर भारतीय संघाने धोनीच्या कारकीर्दीला उचित सन्मानाने दिलेला निरोप ठरेल, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असला तरी संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय या संवेदनशील मुद्द्यावर खुलेपणाने कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

 

इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या धीम्या खेळीने त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. नेटकऱ्यांनी त्याच्या फिनिशरच्या कौशल्यावरही प्रश्न उपस्थित केले. तेवढेच नाही तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीदेखील त्याच्यावर टीका केली होती. धोनीने सध्याच्या विश्वचषकातील सात सामन्यात २२३ धावा केल्या आहे. परंतु तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे यावर धोनी काय प्रतिक्रिया देतो आणि खरंच धोनी निवृत्ती घेतो का? याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य लागले आहे.

 

धोनीची २०१९ विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी

 

दक्षिण आफ्रिका - ३४ धावा (४६ चेंडू)

ऑस्ट्रेलिया - २७ धावा (१४ चेंडू)

पाकिस्तान - १ धाव (२ चेंडू)

अफगाणिस्तान - २८ धावा (५२ चेंडू)

वेस्ट इंडीज - नाबाद ५६ धावा (६१ चेंडू)

इंग्लंड - नाबाद ४६ धावा (३१ चेंडू)

बांगलादेश - ३५ धावा (३३ चेंडू)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat