सुनीता मसुरकरांचे हॉटेल ग्रीन चॅनेल

    दिनांक  04-Jul-2019   
एक स्त्री उद्योजिका झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योजक म्हणून घडतं. प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट आणि नैतिक मूल्य यांचं सिंचन सुनीता मसुरकरांनी केल्यानेग्रीन चॅनेलखर्‍या अर्थाने फुलले, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

 

तुम्ही अमूलचं बटर एवढं का वापरता? त्यात जरा दुसरं बटर मिसळलं तर कोणाला कळणार नाही आणि पैसे पण वाचतील.” एका बटर कंपनीचा विक्री विभागाचा अधिकारी उपाहारगृहाच्या संचालिकेला सांगत होता. “आम्ही पैसे वाचविण्यासाठी व्यवसाय करत नाही, तर ग्राहकांचं आरोग्य नीट राहावं आणि उत्तम दर्जाचे आणि उत्तम चवीचे अन्नपदार्थ मिळावेत म्हणून हा व्यवसाय करतो. तुटपुंज्या पैशाचा लोभ ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस हे हॉटेल मी बंद करेन.” कोणताही मुरलेला उद्योजक कदाचित यावर हसेल. मात्र, हीच नीतीमत्ता त्या उपाहारगृहाच्या मालकिणीने जपली. म्हणून ते हॉटेल गेल्या २१ वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. नीतीमत्तेने व्यवसाय करणार्‍या या उद्योजिका म्हणजे ‘ग्रीन चॅनेल’ या उपाहारगृहाच्या संचालिका सुनीता मसुरकर.

 

सुनीताच्या वडिलांचं, सखाराम कापसे यांचं कुर्ल्यात जनरल स्टोअर्स होतं. शाळेतून घरी आलं की, बाबांना जेवणाचा डबा घेऊन दुकानावर जायचं, ते थेट रात्री ११ वाजता बाबांसोबतच घरी यायचं, हा सुनीताचा जणू शिरस्ताच झाला होता. सखारामांची पूर्वी लॉण्ड्रीची ४ दुकानं होती. कालौघात ही दुकानं बंद पडली. मात्र, काहीही झालं तरी सखाराम यांनी नोकरी केली नाही. त्यांनी जनरल स्टोअर्स सुरू केलं. समज आल्यापासून सुनीता आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात चिमुकला का होईना, पण हातभार लावत होती. विविध तर्‍हेची, विचारांची माणसं दुकानात येत. पण, जात्याच घरंदाजपणा आणि सखाराम कापसे शरीरयष्टीने पैलवान असल्याने कधी कुणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. आयुष्यात उद्योजिकाच व्हायचं, ही मनाशी खूणगाठ बाळगून सुनीताने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली.

 

शिक्षण झाल्यावर काही महिन्यांतच सखाराम आजारपणामुळे अंथरुणाला खिळले. त्यांच्या नजरेसमोर लग्न व्हावं, अशीच आईसह सगळ्यांची इच्छा असल्याने सुनीताचा साखरपुडा महानगरपालिकेत अभियंता असणार्‍या पराग मसुरकर यांच्यासोबत झाला. दुर्दैवाने काही दिवसांतच सखाराम कापसेंचं निधन झालं. कालांतराने सुनीताचा पराग मसुरकरांसोबत विवाह झाला. पराग मसुरकर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून ९०च्या दशकात बोरिवली पश्चिमेस असणार्‍या गोराईला म्हाडाची एक जागा खरेदी केली होती. त्यावेळी गोराईच्या परिसरात एवढी गजबज नव्हती. त्या मोकळ्या जागेत मसुरकर आणि त्यांच्या मित्रांनी इमारत बांधली. त्यातील २ व्यापारी गाळे मसुरकरांनी घेतले. आजूबाजूला वस्ती नसल्याने किराणा मालाचं वा इतर कोणतंही दुकान चालण्यासारखं नव्हतं. सुनीता मसुरकरांची आई सुगरण होती. तोच वारसा सुनीताकडे आला होता. त्यामुळे हॉटेल सुरू करायचं त्यांनी निश्चित केलं.

 

खरंतर मराठमोळे खाद्यपदार्थ बनवता येणं, निव्वळ एवढंच भांडवल त्यांच्याकडे होतं. मराठमोळ्या खाद्यपदार्थांसह दाक्षिणात्य, चायनीज आणि पावभाजीने त्यांनी सुरुवात केली. ६ टेबल आणि १५ कर्मचार्‍यांनिशी हे हॉटेल सुरू झालं. अगदी इराणी हॉटेलसारखं याचं स्वरूप मुद्दाम ठेवलं होतं. ‘ग्रीन चॅनेल’ हॉटेल व्यावसायिक न वाटता घरासारखं वाटलं पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष होता. पावभाजीमुळे थोड्याच कालावधीत हे हॉटेल नावारूपास आलं. १९९८ साली हे हॉटेल सुरू झाल्यावर काही प्रेमीयुगुलं या हॉटेलमध्ये यायची. आज यातील काही जोडप्यांची लग्नं झाली असून त्यांची मुलं पास झाली की आवर्जून ते सुनीता मसुरकरांना पेढे द्यायला येतात. हॉटलमध्येच मग सेलिब्रेशन करतात. आज ‘ग्रीन चॅनेल’मध्ये २०च्या आसपास टेबल्स आहेत, तर २५ ते ३० कर्मचारी कार्यरत आहेत. येथे सगळे सण साजरे केले जातात. मकरसंक्रांतीला ग्राहकांना तिळगूळ दिले जातात. लहान मुलांना पतंग दिले जातात. महाराष्ट्रदिनी हॉटेल झेंडूच्या फुलांनी सजून जाते. मराठी गाण्यांचा सुमधुर नाद दुमदुमत असतो. बालदिनी हॉटेलमध्ये येणार्‍या लहानग्यांना चॉकलेट्स दिली जातात, तर १ जानेवारी आणि व्हॅलेन्टाईन डेला कॅण्डल लाईट डिनरची व्यवस्था असते.

 

काही दिवसांपूर्वीच हॉटेलची अंतर्गत सजावट बदलण्यात आलेली आहे. जुन्या काळातील मराठमोळ्या वाड्याचा लूक हॉटेलला दिला आहे. लाकडी छत, लाकडांचीच कमान, नक्षीदार जुन्या काळातले दिवे, सोबत लामणदिवे, १८व्या शतकातल्या पेहेरावात असणार्‍या महिलांच्या भिंतीवरील कृष्णधवल तसबिरी हे सारं काही मोहवून टाकणारं आहे. ‘ग्रीन चॅनेल’चं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे काहीही आधीच तयार करून ठेवलेलं नसतं. खाद्यपदार्थाची ऑर्डर दिल्यानंतरच अगदी कांदा चिरण्यापासून सगळं काही साग्रसंगीत तयारी करून ती डिश आपुलकीने तयार होते. त्यामुळेच येथील खाद्यपदार्थ खाऊन माणूस आजारी पडलाय, असं गेल्या २१ वर्षांत कधीच घडलं नसल्याचं सुनीता मसुरकर अभिमानाने सांगतात.

 

सुनीताताईंकडे १० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. हॉटेलसोबतच त्या वाचनालयदेखील चालवत. अगदी १५-२० रुपये एवढेच शुल्क त्या आकारायच्या. शेकडो वाचक याचा लाभ घ्यायचे. मात्र, सोशल मीडियाच्या पदार्पणानंतर वाचकांची संख्या रोडावली आणि हे वाचनालय त्यांनी बंद केले. मात्र, आता पुन्हा नव्या स्वरूपात वाचनालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सुनीता पराग मसुरकरांना २ कन्या आहेत. एक आर्किटेक्चरला असून लहान कन्या फॅशन कम्युनिकेशन या विषयात पदवीच्या वर्गात शिकत आहे. आर्किटेक्चर झालेली तनया सुनीताताईंना त्यांच्या हॉटेल व्यवसायात मदत करते. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं, असं महात्मा फुले म्हणत. त्याच धर्तीवर एक स्त्री उद्योजिका झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योजक म्हणून घडते, याचा प्रत्यय येथे येतो. प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट आणि नैतिक मूल्य यांचं सिंचन सुनीता मसुरकरांनी केल्याने ‘ग्रीन चॅनेल’ खर्‍या अर्थाने फुलले, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

 

(८१०८१०५२३२)

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat