संदीप नाईक यांचा भाजपमध्ये दणक्यात प्रवेश

    दिनांक  31-Jul-2019नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक माजी नगरसेवक तसेच शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात समारंभपूर्वक प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री विनोद तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक प्रगती होते आहे. एका चांगल्या प्रवाहासोबत राहण्याचा हा कृतीशील संकल्प असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने नवी मुंबईचा विकास साधण्याबरोबरच येथील प्रलंबित प्रश्‍नही सोडवू, असा विश्‍वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला.

 

जनभावनेची दखल आणि लोकप्रतिनिधींचा आग्रह लक्षात घेवून संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंगे्रसमधून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी त्यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाउ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. उच्चशिक्षित असलेले संदीप नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदार संघातील जनतेने सलग दोन वेळा बहुमताने जिंकून दिले आहे. मागील १० वर्षात त्यांनी या मतदार संघाचा समतोल विकास साधला असून पायाभूत विकास प्रकल्पांसह अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त असो, ग्रामस्थ असो, झोपडपटटीवासीय असो, नोडमधील रहिवासी किंवा कंडोमिनियम, सिडकोनिर्मिती इमारतींमधील रहिवासी असो सर्वच घटकांचे प्रश्‍न तळमळीने सोडविले आहेत. उर्वरित गुंतागुंतीच्या ज्या काही समस्या असतील त्यावर मुख्यमंत्री फडणवीस योग्य तोडगा काढून त्या सोडविण्यास निश्‍चितच मदत करतील, अशी खात्री संदीप नाईक यांनी भाजपा पक्षप्रवेशा प्रसंगी बोलून दाखवली.

 

हे आहेत पक्षांतर केलेले महत्वाचे पदाधिकारी

 

माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी उपमहापौर भरत नखाते, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, प्रशांत म्हात्रे, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी परिवहन समिती सभापती श्याम महाडिक, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेवक अमित मेढकर, राष्ट्रवादीचे नवी मुंबई सेवादल प्रमुख दिनेश पारख, सेवादल उपाध्यक्ष मोहन बोबडे, राष्ट्रवादीचे मागासवर्गीय सेलचे प्रमुख अभंग शिंदे, माजी नगरसेवक प्रदीप गवस, नेरुळ तालुकाअध्यक्ष गणेश भगत, राष्ट्रवादीचे कोपरखैरणे तालुका उपाध्यक्ष अवतार बिंद्रा, राष्ट्रवादी ऐरोली विधानसभा युवक अध्यक्ष राजेश मढवी, जयेश कोंडे, अशोक शेवाळे, सुनिल मस्कर, नवी मुंबई युवक उपाध्यक्ष सुनिल सुतार, माजी नगरसेविका राजश्री कातकरी, देवनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, विकास पालकर, माजी नगरसेविका गौतमी सोनावणे, जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश पाटील, दिघा तालुका सरचिटणीस राजेश गवते, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी परिहवन समिती सदस्य प्रल्हाद भोईर, माजी नगरसेवक अमृत मेढकर, माजी शिक्षण समिती सदस्य वासूदेव पाटील, रॉबिन मढवी, नरेश सुतार, प्रमोद पाटील, जयेंद्र सुतार, मुरबाड तालुका युवक अध्यक्ष दर्शन शेटये, तुषार कडवडकर, नेरुळ तालुका महिला अध्यक्षा रुचिता करपे, योगेश म्हात्रे, शिवाजी खोपडे, सुदर्शन जिरगे, सचिन सावंत, राजेश ठाकुर, बाळासाहेब माने, सुर्यकांत शेळके, बंजारा समाजाचे नेते सुंदरलाल जाधव आदी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat