बेकायदा बांधकाम करणारे पालिकेच्या रडारवर

    दिनांक  31-Jul-2019मुंबई : बेकायदा बांधकामे करून अमाप पैसा कमवणारे आणि लोकांच्या जीवाशी खेळणारे कंत्राटदार आता पालिकेच्या रडारवर असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. झोपड्या व काही इमारतींमध्ये अशी बांधकामे केली जात असल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने अशा कंत्राटदारांची नाकेबंदी करण्याचे ठरवले आहे.

 

डोंगरी दुर्घटनेनंतर मुंबईत अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहत असल्याचे समोर आले आहे. बी, सी व डी विभागात असे रॅकेट असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. इमारतींसह झोपडपट्ट्यांतील अनधिकृत बांधकामेही पालिकेच्या रडारवर आहेत. अनेक ठिकाणी बेकायदा झोपड्यांच्या टॉवरकडेही पालिकेने मोर्चा वळवला आहे. दोन दिवसांपूर्वी धारावीच्या झोपडपट्टीत अनधिकृत बांधकामे करून मजल्यावर मजले चढवणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेने चांगलाच हिसका दाखवला. येथे झोपडी दादांच्या मदतीने अनधिकृत बांधकामे करणाऱ्या पाच कंत्राटदारांवर पालिकेने एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली. अशा कंत्राटदारांना तीन वर्षाची सजा व तडीपारची कारवाई होऊ शकते. या कारवाईमुळे अशा बेकायदा बांधकाम करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

 

मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांत मजले चढत आहेत. स्थानिक झोपडीदादांच्या सहकार्याने कंत्राटदारांनी अशा प्रकारची बेकायदा बांधकामे करण्यासाठी शिरकाव केला आहे. पालिकेकडून अशा झोपड्य़ांवर कारवाई केली जाते, मात्र ही कारवाई वरवरची असल्याने झोपडीदादांकडून अशा झोपड्या पुन्हा उभारल्या जात आहेत. यात काही अधिकारीही सामील असल्याने १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांचे बांधकाम करण्यास नियम धाब्यावर बसवून परवानगी दिली जाते. त्यामुळे झोपड्यांचे टॉवर उभे राहिले आहेत. धारावीतील पालिकेची ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. झोपडपट्ट्यात अशा कंत्राटदारांचे जाळे मोठ्या प्रमाणात असताना काही विभागातील इमारतींतही दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकाम केली जात आहेत. बी विभागात अशा अनेक इमारतीत अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे उभी राहिली असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने एका सहायक आयुक्तांना या प्रकरणी निलंबित केले आहे, तर काही कंत्राटदारांवरही कारवाई करण्यात आली आहे.

 

कंत्राटदारावर कडक कारवाई

 

धारावीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशी कारवाई चालूच राहणार असून अशी अनधिकृत बांधकामे करणाऱ्या कंत्राटदारांना कायदेशीर बडगा दाखवला जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.