गोरेगावातील कोंडी फुटता फुटेना...

    दिनांक  30-Jul-2019


 

मुंबई (अरविंद सुर्वे) : पश्चिम रेल्वेमार्गावरील गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. रेल्वेस्थानकापासून दूरवरचा भाग लक्षात घेतला तरी तो गर्दीने खचाखच भरलेलाच दिसून येईल. त्यामुळे येथे पार्किंगची समस्या फार मोठी आहे. मुंबईत सर्वात जास्त वाहतूककोंडीही याच भागात होते. वांद्र्याहून अर्ध्या तासात जोगेश्वरी येथे येणार्या बसची पुढे पश्चिम द्रुतगती मार्गावर इतकी घुसमट होते की बोरिवली येथे पोहोचायला दीड-दोन तास लागतात.

 

वांद्र्यापासून सुरू झालेला आणि दहिसर येथे संपणारा प्रख्यात एस. व्ही. रोड म्हणजे वीर सावरकर मार्ग फारच गजबजलेला आहे. येथे चालणेही मुश्कील आहे. अशा गर्दीत वाहने रस्त्यात उभी केली असतील तर वाहतुकीचे बारा वाजले म्हणून समजा. त्यामुळे येथे पार्किंगवर नियंत्रण आणणे आवश्यकच होते. वाहतूक विभागातर्फे करण्यात येणारे टोइंग म्हणजे पौर्णिमा-अमावस्येची कारवाई ठरते. त्याने मिळणारा दिलासा क्षणिक असतो. वाहतूक पोलिसांची गाडी पुढे गेली की मागे त्या जागेवर दुसरे वाहन उभे राहतेच.पार्किंगची समस्या टाळण्यासाठी गोरेगाव येथे दोन पार्किंग सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यांपैकी गोरेगाव पश्चिम भागात रेल्वे स्थानकानजीक टोपीवाला मार्केट बिल्डिंगमध्ये एक पार्किंग सेंटर उभारण्यात आले आहे.गोरेगाव पश्चिम भागात टोपीवाला मार्केट परिसराची लोकवस्ती दीड लाखाच्या आसपास आहे आणि त्याच्या 25 टक्के वाहनांची संख्या आहे. इमारती मोठ्या संख्येने आहेत. मात्र पार्किंगची सुविधा फारच कमी आहे. त्यामुळे रस्ता हेच वाहनांसाठी पार्किंग स्थळ झाले. त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. गोरेगाव आगारातून अनेक बसेस मुंबईच्या विविध भागात जातात. मात्र त्या रेल्वेस्थानकानजीक असणार्‍या टर्मिनसमधूनच सुटतात. परंतु जाण्या-येण्याच्या मार्गावर वाहने उभी असल्याने त्या मुख्य रस्त्याला येईपर्यंत त्यांची घुसमट होते. बेकायदा पार्किंगविरोधात दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर येथील पार्किंग सेंटरमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र त्यांचे प्रमाण कमी असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. या पार्किंग सेंटरची मर्यादा सुमारे सहाशे वाहनांची आहे. सध्या दीडशे ते दोनशे वाहने येतात. अख्तर एन्टरप्रायझेस या ठेकेदार कंपनीतर्फे हे पार्किंग सेंटर चालवले जाते.

 
 
 

समस्या जैसे थे

 

येथे पार्किंग सुविधा असली तरी परिसरातील वाहनचालक रस्त्यातच गाडी उभी करतात आणि त्याबदल्यात पालिकेच्या पार्किंग ठेकेदाराकडे आकार भरतात. येथे ठेकेदाराची माणसे रस्त्यात उभ्या राहणार्‍या वाहनांना चार्ज आकारतात. पण पावतीवर असलेला दर त्यांना मिळत नाही. त्याच्या निम्मा दरच त्यांना मिळतो, असे ठेकेदाराच्या माणसांनी सांगितले. ज्या भागात पार्किंग सेटर आहे तेथील रहिवाशंना कायद्याचा हिसका दाखवून जमत नाही. त्यांच्याबरोबर गोडीगुलाबीने घ्यावे लागते. येथे ठेकेदारास पैसा मिळतो, पण पार्किंग समस्या मिटली असे म्हणता येणार नाही.

 

रस्त्यात उभ्या असणार्‍या वाहनांमुळे नागरिकांना फारच त्रास होतो. हा त्रास कमी होण्यासाठी पालिकेने पार्किंग सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र त्या सुविधेचा लाभ घेण्याचे कोणी टाळत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायलाच हवी, तरच सुधारणा अपेक्षित आहे.

 

- सुभाष सुर्वे,

स्थानिक रहिवासी, गोरेगाव (पश्चिम)

 

सुरळीत वाहतूक सर्वांच्याच हिताची असते. वाहतूक कोलमडली की किती त्रास होतो हे प्रत्येक जण अनुभवत आहे. बेकायदा पार्किंगविरोधात पालिकेने सुरू केलेला दंड भरण्यापेक्षा ठराविक आकार भरून पार्किंग सुविधेचा लाभ घेणे सर्वांसाठी चांगले आहे.

 

- अजयकुमार पड्याळ

स्थानिक रहिवासी, गोरेगाव (पश्चिम)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat