नेहरूंविना सृष्टीनिर्मितीही अशक्य!

    दिनांक  30-Jul-2019गॉड पार्टिकल किंवा देवकणांचा शोध लावला कोणी? तर... तर भांबावून जाऊ नका. कारण, त्याचेही उत्तर एकच एक आहे, ते म्हणजेच नेहरू आणि नेहरूच! नेहरूंनीच ६०-७० वर्षांपूर्वी अशी कल्पना मांडली व ती आताच्या शास्त्रज्ञांनी उचलली आणि हा प्रयोग एकविसाव्या शतकात सुरू झाला! म्हणजेच सृष्टीनिर्मितीचे कारण जवाहरलाल नेहरूच असल्याचे या दोन्ही उदाहरणांतून स्पष्ट होते!

 

सृष्टीनिर्मितीच्या अनेकानेक वैज्ञानिक सिद्धांतांपैकी एक सांगितला जाणारा ‘बिग बँग-महाविस्फोट’ कोणी घडवून आणला? त्याचा कर्ता करविता कोण? हा खरे तर सर्वांच्याच मेंदूचा भुगा करणारा आणि त्याचवेळी निरनिराळी उत्तरे देणारा सवाल! पण, हाच प्रश्न जर तुम्ही नेहरू-गांधी घराण्याच्या पट्टीच्या गुलामाला विचारला तर? तर नक्कीच तो उत्तरेल की, ‘बिग बँग-महाविस्फोट’ घडवून आणला तो जवाहरलाल नेहरूंनीच! नेहरू अवकाशात शतपावली करत होते. त्यावेळी त्यांनी चुकून जरा जोरात पाय आपटला. नेहरूंच्या पाय आपटण्यातून कंपने उमटली व त्या उमटलेल्या कंपनांमुळेचबिग बँग-महाविस्फोट’ झाला! ‘बिग बँग-महाविस्फोटा’ शीच संबंधित आधुनिक युगातला प्रयोग म्हणजे ‘लार्ज हायड्रोजन कोलायडर’. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर जिनिव्हाजवळ हा सृष्टीरचनेचे गूढ उकलणारा प्रकल्प आकारास आला, कार्यान्वित झाला. पण, हा प्रकल्प उभारला कोणी आणि त्यातून गॉड पार्टिकल किंवा देवकणांचा शोध लावला कोणी? तर... तर भांबावून जाऊ नका. कारण, त्याचेही उत्तर एकच एक आहे, ते म्हणजेच नेहरू आणि नेहरूच! नेहरूंनीच ६०-७० वर्षांपूर्वी अशी कल्पना मांडली व ती आताच्या शास्त्रज्ञांनी उचलली आणि हा प्रयोग एकविसाव्या शतकात सुरू झाला! म्हणजेच सृष्टीनिर्मितीचे कारण जवाहरलाल नेहरूच असल्याचे या दोन्ही उदाहरणांतून स्पष्ट होते!

 

चक्रावून गेलात? बरोबरच आहे... चक्रावून जाण्यासारखीच स्थिती आहे ही... कारण, भारताने ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण केले आणि स्वतःला ‘नेहरूवियन’ म्हणत विद्यमान केंद्र सरकारवर तोंडसुख घेणाऱ्यांचे चित्त थाऱ्यावर राहिले नाही. ‘चांद्रयान-२’चे श्रेय नरेंद्र मोदी वा भाजपने घेऊ नये म्हणून सगळ्याच ‘नेहरूवियन’ टोळ्या कामाला लागल्या. नेहरूंच्या दूरदृष्टीमुळेच कशी भारताची चांद्रमोहीम आकारास आली, साकारली, याची पोपटपंची या टोळक्यांच्या म्होरक्यांपासून प्रत्येकजण करू लागला. नेहरूनामाच्या उद्घोषाने देशातील राजकीय, सामाजिक, बुद्धीजीवी, विचारवंती, समाजमाध्यमी जगदेखील ढवळून निघाले. त्या ढवळण्यातूनच नेहरूंच्या स्तुतीपर लेखच्या लेख छापून येऊ लागले; त्यातलेच एक लेखक म्हणजे परवेझ हुडभॉय! नुकताच या महाशयांनी 'Pakistan could never reach the Moon because it didn’t have its own Nehru' हा लेख लिहिला आणि तो ‘डॉन’ या पाकिस्तानी माध्यमासह देशातील ‘स्क्रोल’ या डाव्या विचारांच्या माध्यमस्थळाने प्रकाशित केला. पाकिस्तानकडे जवाहरलाल नेहरू नसल्याने तो देश चंद्रावर पोहोचू शकला नाही, असा या लेखाचा मुद्दा आहे. नेहरूंच्याच नावाचा घंटानाद करणारा हा लेख असल्याने त्यात ‘इस्रो’ची स्थापना जवाहरलाल नेहरू यांनीच केल्याचेदेखील ठोकून दिले आहे, जे सरळसरळ चूक आहे, कारण ‘इस्रो’ची स्थापनाच मुळी झाली ती १९६९ साली म्हणजेच नेहरूंच्या मृत्यूनंतर. तरीही त्याच्या स्थापनेचे श्रेय मात्र नेहरूंचेच! सोबतच भारताच्या अवकाश संशोधनातील प्रगतीलादेखील जवाहरलाल नेहरूच कारणीभूत असल्याचा दावा लेखात केला आहे. हा तर लाळघोटेपणाचा आणि कृतघ्नपणाचाही कळसच म्हटला पाहिजे. कारण, भारतीय अवकाश संशोधनाला चालना दिली ती नेहरूंनी नव्हे, तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांनी. पण, लेखकाला कौतुक मात्र जवाहरलालांचेच करायचे असल्याने त्यांनी साराभाईंच्या नावाचा चुकूनही उल्लेख केला नाही, मग श्रेय द्यायची गोष्ट तर दूरचीच. बरं, हे जाऊ द्या, नेहरूंवरील अत्याधिक प्रेमापायी असे होऊ शकते म्हणा. पण, पुढे एक अतिशय वाह्यात प्रश्न विचारून त्याचे बालिश उत्तर दिले आहे. ‘७० वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरूंऐवजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर?’ हा तो प्रश्न आणि, “तर भारताने अ‍ॅस्ट्रॉनॉमीची (अवकाश विज्ञान) नव्हे तर अ‍ॅस्ट्रॉलॉजीची (ज्योतिष विज्ञान) चर्चा केली असती,” हे ते उत्तर. वस्तुतः ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात आले, तेव्हा आणि त्याआधी भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे श्रेय ‘इस्रो’ व शास्त्रज्ञांना दिले होते. तसेच देशाच्या विज्ञान क्षेत्राला कुठल्याही गोष्टींची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही दिली होती. त्यामुळेच मोदी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान असते, तर देशाची वैज्ञानिक प्रगती झाली नसती, देश ज्योतिष आणि पोथ्या-पुराणांतच अडकून पडला असता, हे केवळ स्वप्नरंजन ठरते.

 

दुसरीकडे हा काळाचाही महिमा आहे, कारण जग ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्या वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न एकतर देशातील सत्ताधारी आणि त्यांच्यात तशी कुवत नसेल तर शास्त्रज्ञ, वैज्ञानिक मंडळी करतच असतात. देशात विक्रम साराभाईंसारखे शास्त्रज्ञ होते, म्हणूनच आपण अवकाश संशोधनाची पायाभरणी केली आणि चंद्रावर स्वारी केली, हेच खरे. त्यामुळे त्याचे श्रेय केवळ आणि केवळ नेहरूंनाच देण्याची काहीही गरज नाही. पण, काही गोष्टींचे श्रेय नक्कीच जवाहरलाल नेहरूंनाच द्यायला पाहिजे, नेहरूंच्या हाती सत्ता नसती तर या गोष्टी घडल्याच नसत्या. पण, या अशा गोष्टी आहेत, ज्यांचे नाव काढले तरी सगळ्याच ‘नेहरूवियन’ मंडळींची एकतर बोबडी वळते वा गुलामीची नशा चढलेली असल्याने नेहरूच कसे योग्य होते, हे सांगण्यासाठी त्यांच्या शब्दांचा फुलबाजा तडतडू लागतो. केंद्रातील कोणत्याही सत्ताधाऱ्याचा पिच्छा पुरवणाऱ्या जम्मू-काश्मीर प्रश्नाचे भिजते घोंगडे जवाहरलाल नेहरूंच्याच विचित्रपणामुळे पडले आहे, पण त्याचे श्रेय कधीच कोणी नेहरूप्रेमी घेताना दिसत नाही. काश्मीरबरोबरच चीनबरोबर पंचशील करार करून, ‘हिंदी-चिनी भाई-भाई’चा नारा देऊन नेहरूंनीच भारताला १९६२ साली पराभवाच्या खाईत लोटले. इस्रायलने देऊ केलेली मदतही नेहरूंनी या युद्धावेळी वेडगळ अटी लावून नाकारली होती. याच युद्धानंतर चीनने भारताचा अक्साई चीन हा मोठा भूभाग स्वतःच्या घशात घातला, पण त्याचेही श्रेय घराण्याच्या गुलामांनी कधी नेहरूंना दिल्याचे ऐकिवात नाही. दरम्यानच्या काळात तिबेटला चीनचा भाग असल्याचे आणि वायव्य सरहद्द प्रांताच्या भारतातील सामिलीकरणाला नाकारण्याचे कामही नेहरूंनीच केले. भारत आज ज्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, ते मानभावीपणे न स्वीकारण्याचा उद्योगही नेहरूंनीच केला होता. तेव्हा हे सदस्यत्व चीनला देण्याची शिफारस नेहरूंनी केली होती आणि आज तोच चीन भारताला वाकुल्या दाखवताना दिसतो. स्वतःला ‘नेहरूवियन’ म्हणवणाऱ्यांनी कधीतरी याचे श्रेयही जवाहरलाल नेहरूंना देऊन पाहावे.

 

वर उल्लेखलेले नेहरूंचे कारनामे काहीजणांना बऱ्यापैकी माहितीही असतील, पण त्यांनी अजूनही काही पराक्रम केलेले आहेत. जसे की, भारत-चीन युद्धाआधी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी नेहरूंना अणुचाचणी करण्यासाठी मदत देऊ केली होती. तेव्हा नेहरूंनी ती मदत स्वीकारली असती, तर चीनने भारतावर हल्ल्याचे धाडसच केले नसते, पण हल्ला झालाच, त्याचेही श्रेय नेहरूंनाच द्यावे की नेहरूवियनांनी! सोबतच मणिपूरची काबू व्हॅली ‘बाप का माल’ समजून म्यानमारला देणे आणि म्यानमारने हा भूभाग चीनला सोपविण्याचे प्रकरण, त्याचे श्रेयही नेहरूंचेच! ओमानच्या सुलतानाने भारताला देऊ केलेले ग्वादार बंदर नाकारण्याचे व ते पाकला देण्याचे प्रकरण, आज याच बंदरावरून पाकिस्तान-चीन भारताला शह देण्याचा प्रयत्न करताना दिसतो, त्याचे श्रेयही नेहरूंचेच. दरम्यान, नेपाळचे राजे त्रिभुवन यांनी नेहरूंसमोर सादर केलेला विलीनीकरणाचा प्रस्ताव नाकारण्याची घटना असो आणि आज त्याच नेपाळचा वापर चीनने भारतविरोधासाठी करण्याचे प्रकरण, या सगळ्याचेच श्रेय नेहरूंचेच की! इंग्रजीला हिंदीपेक्षा अधिक महत्त्व देण्याचे आणि डाव्या बुद्धीजीवींच्या साथीने धर्मांध मुस्लीम शासकांचा अत्याचारी इतिहास शाळा-महाविद्यालयांतून दडवून ठेवण्याचे, मराठ्यांचा इतिहास सोयीस्कररित्या गाळण्याच्या उठाठेवींचे श्रेयही नेहरूंनाच द्यायला हवे, पण कोणीही नेहरूनिष्ठ असे करणार नाही, कारण शेवटी सवाल तत्त्वा-बित्त्वाचा नव्हे तर दुकानदारी चालण्याचा आहे ना!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat