एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो...! - व्हि.जी. सिद्धार्थ

30 Jul 2019 12:14:54



सीसीडीचे मालक व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या पत्राने खळबळ


बंगळुरू : कॅफे कॉफी डेचे (सीसीडी) संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई व्हि.जी.सिद्धार्थ सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. २९ जुलै रोजी ते त्यांच्या गाडीने प्रवास करत होते. मात्र, त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याचे वृत्त आहे. मंगळुरू येथील नेत्रावती नदी परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती, त्याआधारे कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.




२७ जुलै रोजी त्यांनी लिहीलेले एक पत्र सध्या पोलीसांच्या हाती लागल्याने खळबळ माजली आहे. त्यात कर्जदार आणि गुंतवणूकदारांचा आपल्यावर दबाव असल्याचे उल्लेख त्यांनी केला आहे. मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सिद्धार्थ यांनी माइंडीट्री या कंपनीतील त्यांचा हिस्सा लार्सन एण्ड टुब्रोमध्ये (एलएण्डटी) तीन हजार कोटींना विकला होता. यापूर्वी ते या कंपनीतील २१ टक्क्यांच्या समभागांसह सर्वात मोठे भागधारक होते. कॉफीच्या व्यवसायात एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. कॉफी उत्पादन करण्यासाठी त्यांच्याजवळ १२ हजार एकर जमीन आहे. मार्च २०१९च्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण १७५२ कॅफे आहेत.

कर्जदारांकडून दबाव येत असल्याचा पत्रात उल्लेख

पत्रात नमूद केल्यानुसार सिद्धार्थ म्हणतात, मी माझ्या अथक प्रयत्नांनंतरही एक उत्कृष्ट व्यवसायाचे मॉडेल उभारण्यास अयशस्वी ठरलो. मी एक मोठा संघर्ष केला आहे. आता हा दबाव मी सहन करू शकत नाही. एका खासगी गुंतवणूकदाराने गेल्या सहा महिन्यांपासून माझ्यावर बायबॅक करण्यासाठी दबाव वाढवला आहे. मी मित्राकडून एक मोठी रक्कम उसणी घेत हा व्यवहार पूर्ण केला होता. दुसरीकडे कर्जदारही माझ्यावर दबाव वाढवत आहेत. आयकर विभागानेही यापूर्वी मायडंट्री व्यवहार आणि सीसीडीतील शेअरबद्दल चौकशी सुरू केल्याने कंपनीवर नगदी संकट ओढावले होते.

कर्मचारी आणि व्यवस्थापनाला पुढे जाण्याचा सल्ला

माझी विनंती आहे कि, तुम्ही एकत्र राहून कंपनी व्यवस्थापनासह व्यवसाय पुढे नेत राहा. सर्व चुकांना मी जबाबदार आहे. सर्व व्यवहारांना मी जबाबदार आहे. माझ्या टीमला आणि माझ्या ऑडिटर्सना याबद्दल माहिती नाही, मला कायदेशीररित्या यासाठी जबाबदार धरले पाहिजे. मी माझ्या परिवारालाही याबद्दल माहिती दिलेली नाही. माझा हेतू कोणाला फसवण्याचा किंवा धोका देण्याचा नाही. मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी राहिलो. मला आशा आहे कि एक दिवस, तुम्ही मला समजून घ्याल. आपली संपत्ती ही कर्जापेक्षा जास्त आहे, त्यातून आपण सर्व कर्जे फेडू शकतो.

'सीसीडी'चा शेअर कोसळला

व्ही. जी. सिद्धार्थ याच्या या पत्रामुळे शेअर बाजारात सीसीडीचा शेअर २० टक्क्यांनी कोसळला. शेअर सध्या १५३.४० रुपयांवर आला आहे. कंपनीने शेअर बाजाराला सिध्दार्थ बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. त्याबद्दल पुढील माहिती देत राहू असे कळवले आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0