आणखीन एक 'अण्णा भाऊ'

    दिनांक  30-Jul-2019   


 


'क्लास वन ऑफिसर' म्हणून निवृत्त झालेले तुकाराम साठे आज शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक ऐक्य यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यातील मानवी संवेदनांच्या भावनांचा हिंदोळा घेणारा हा लेख...

 

त्याच काळात तुकाराम साठे यांचे सर्व कुटुंब घायपातीपासून 'वाख' बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असे. हे अतिशय किचकट आणि त्रासाचे काम. घायपातीची पाने तोडायची. त्यातील तंतू बाहेर काढायचे. त्या तंतूंची जुडी बनवायची. ती ओढ्यालगतच्या एखाद्या डबक्यात आठ-दहा दिवस भिजत घालायची. नंतर ती सुकवायची. त्या जुडीचा दोरखंड बनवायचा. हे दोरखंड पारंपरिक रूढीनुसार गावातील ब्राह्मण, पाटील मराठा आणि इतर लोकांना द्यायचे. कारण, पशुधनाला बांधण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी गावातील सर्व समाजाला दोरखंड गरजेचे असत.

 

उन्हाळ्याच्या दिवसात हे दोरखंड तयार करण्याचे काम तुकाराम घरच्यांसोबत करत. घायपातीमुळे अंगाची लाही लाही होई. पण, हे काम करावे लागे. का? यावर तुकाराम यांना उत्तर मिळत असे की, आपण गावकीतील एक कुटुंब आहोत. येथे प्रत्येक समाजाला काम वाटून दिलेले आहे. तसे आपले हे काम आहे. शेतीसोबतच या उद्योगातून दोन-चार पैसे मिळतात. गावाचेही काम होते आणि आपल्यालाही धनधान्य पैसाअडका मिळतो. गावगाड्याच्या परस्परावलंबी भूमिकेची शिकवण तुकाराम यांना मिळत होती. ते म्हणतात, "सुदैव आहे की, मला कधीही जातीयवादाचे चटके सहन करावे लागले नाही. कारण, दोरखंड घेण्यासाठी सगळ्या समाजाचे लोक घरी येत. वडिलांसोबत पान-सुपारी खात. समाजकारण, राजकारण या विषयांवर चर्चा करत. त्यामुळे गावात एकीची भावना होती."

 

याच चर्चांमधून तुकाराम यांना समाजभान आले. अशीच सामाजिक एकीची चर्चा सुरू असताना आई म्हणाली होती की, "गावातील सगळे एक होतील, पण 'पेड' कधी एक होतील देव जाणे! ('पेड' म्हणजे दोरखंड बनवणारा मातंग समाज.)तुकाराम साठेंच्या मनात आईचे हे वाक्य कोरले गेले. समाज एक व्हायलाच हवा, अशी जिद्द मनात बाळगतच ते मोठे झाले. पुढेही समाजकार्य करताना त्यांनी समाजामध्ये समन्वय आणि समरसतेचीच भूमिका घेतली. तुकाराम यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी. वडील अप्पा साठे हे शेतकरी, तर आई कलावती या गृहिणी. उभयंतांना पाच मुलं आणि दोन मुली. 'जे तुमच्या कष्टाचे आहे ते तुमचे, पण जे कष्टाविना आहे ते विषसमान' अशी शिकवण तुकाराम यांच्या आईवडिलांनी त्यांना दिली. नेहमी खरे बोलावे आणि कोणताही 'शॉर्टकट' न घेता निष्ठेने आणि आपलेपणाने काम करावे, हेच विचार त्यांच्या मनावर ठसलेले. त्यामुळे तुकाराम यांनी आयुष्यातील प्रत्येक काम निष्ठेने आणि आपले समजून केले.

 

शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या स्वार्थासाठी राजकीय मोर्चे-आंदोलने यामध्ये ओढणारे आणि पुढे त्यांची कोणतीही प्रगती होऊ न देणारे तथाकथित नेते प्रत्येक समाजामध्ये असतातच. पण, समाजाचे नामचिन प्रस्थ असल्यामुळे सहसा त्यांना रोखण्याचे काम कुणीही करत नाही. कामा रुग्णालयामधून 'क्लास वन ऑफिसर' म्हणून निवृत्त झालेले तुकाराम साठे याला अपवाद आहेत. त्यांनी मातंग समाजातील तरुणांनी शिक्षण घ्यावे, आपली प्रगती करावी यासाठी समाजात एक मोहीमच उघडली. त्यांनी समाजप्रबोधन करण्यास सुरुवात केली.

 

"शिकण्याच्या वयात शिका, भवितव्य घडवा. राजकारणातही भवितव्य घडवायचे असेल, तर पहिले शिका. कारण, आपला समाज गरीब आहे. अजूनही समाजात एकजूट नाही. त्यामुळे तरुणांनी सबल आणि सक्षम होऊनच आयुष्याचा मार्ग ठरवायला हवा." तुकाराम साठेंचे म्हणणे समाजातील लोकांना पटू लागले. त्यामुळे आपल्या मुलांनी विधायक कार्यामध्ये त्यातही शिक्षणामध्ये लक्ष द्यावे, यावर पालक कटाक्ष देऊ लागले. आज तुकाराम साठे यांचे समाजात वजन आहे.

 

'मुलांना शिकवा' असे पालकांना सांगताना तुकाराम यांनी स्वत:च्या मुलांना उच्चशिक्षित तर केलेच, पण पत्नीलाही उच्चशिक्षणाची संधी दिली. मुंबईत आलेल्या गरजू समाजबांधवांना तुकाराम यांच्याकडून मदत मिळाली नाही, असे झालेच नाही. या मदतीमध्ये आरोग्यविषयक सेवेचा आयाम महत्त्वाचा आहे. समाजामध्ये आरोग्याचा प्रश्न भीषण आहे. या सर्वाचे मूळ व्यसनामध्ये आहे, असा निष्कर्ष तुकाराम यांनी काढला. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी 'संजीवन' संस्था उभी केली. ही संस्था समाजात सातत्याने व्यसनविरोधात जागृती करत आहेत.

 

संस्था आणि तुकाराम यांच्या प्रयत्नांनी समाजातील अनेकतरुण व्यसनांपासून दूर झाले. ही सगळी कामे करत असताना तुकाराम यांना जाणवत होते की, मुंबईमध्ये उच्चपदस्थ असणारे लोक सार्वजनिक ठिकाणी आपली जन्मजात लपवत होते. त्यांना वाटत होते की, जात समजल्यावर समाज आपल्याशी कसा वागेल? आपल्याला त्रास होईल का वगैरे... त्यांचेही म्हणणे खरेच होते. कारण, अनेकांनी या ना त्या कारणामुळे जातीय विषमतेचे चटके खाल्ले होते. या सर्वांच्या मनातील न्यूनगंड, भीती दूर करणे गरजेचे होते.

 

त्यासाठी समाजातील एक अग्रणी सुनील वारे यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम साठे यांनी बापुलाल तुपे, अंकुश आवारे यांच्या सहयोगाने प्रयत्न सुरू केले. त्यातूनच 'मातंग डेव्हलपमेंट' नावाचा ग्रुप तयार झाला. त्यामध्ये समाजातील साडेतीन हजारांपेक्षा जास्त उच्चशिक्षित नागरिक सहभागी झाले आहेत. हे सर्वजण उच्चशिक्षित आणि आपापल्या स्तरावर सर्वोच्चस्थानावर आहेत. हे हजारो समाजबांधव आज देशभरातील गरजू लोकांना मदतीचे हात देत आहेत. त्यामुळे समाज त्यांना 'अण्णा' म्हणूनच ओळखतो. लोकशाहीर अण्णा भाऊ यांचेही नाव तुकाराम साठे. यावर तुकाराम म्हणतात की, "समाजपुरुष अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्या महापुरुषाच्या विचारानुसार जगण्याचा प्रयत्न करतो. समाजजागृतीसाठी खारीचा वाटा उचलतो."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat