सदैव स्मरणात राहील असे संमेलन...

    दिनांक  03-Jul-2019

 
 
 
 
कल्याण येथे नुकत्याच झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’स उपस्थित राहण्याचा योग आला. या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यास मला शब्द कमी पडत आहेत. युवकांनी संमेलनासाठी घेतलेले परिश्रम हे त्याचे महत्त्वाचे अंग होते. ‘सभागृह तुडुंब भरणे’ हे त्याचे यश होते. सर्व विषय व त्यासाठी अतिशय योग्य व्याख्याते शोधून त्यांची उपलब्धता आयोजणे हे त्याच्या आयोजकांच्या अभ्यासूवृत्तीचे द्योतकच म्हणावे लागेल. आता एवढे लिहिल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाचे विवेचन करणे तसे दुय्यम असले तरी ते अतिशय आवश्यक आहे.
 
 

विनायक परब यांचा दृकश्राव्य उपक्रम तर खूपच महत्त्वाचा यासाठी वाटला. कारण, काश्मीर म्हणजे एक गूढ असा न उकलणारा प्रश्न आहे. त्यावर कधीपासून, कुणी, कसे तोडगे काढले का? की तो प्रश्न वाढवत गेले, यावर उत्तर कदाचित कधीच सापडणार नाही. आता इतिहास, भूगोल, राजकारण, धार्मिक भावना या सगळ्या विषयांचा प्रामाणिकपणे अभ्यास करून जर कुणी बोलत असेल, तर तोच भारतमातेच्या कल्याणासाठीचा मुख्य प्रयत्न असेल. तो प्रयत्न या संमेलनामध्ये करण्यात आला. भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल या गंभीर, पण अतिशय आनंददायी विषयाचे विवेचन समजून घेण्यासाठी व त्यात आपली नेमकी जबाबदारी पेलण्याची मनाची तयारी करण्यासाठी सर्व व्याख्यात्यांना मानाचा मुजरा.


या संमेलनामध्ये डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी भारताच्या आर्थिक परिस्थितीचा खूपच छान आढावा घेऊन व इतर संस्थांच्या माध्यमातून भारताच्या भविष्यात आर्थिक वाटचाल कशी असेल याचे बऱ्यापैकी स्पष्ट चित्र रेखाटले. एक छोटीशी खंत वाटली की, २०२० मध्ये भारत विश्वगुरू होईल, या आशेत मी तरी समाधानी आहे. (७२ वर्षीय असल्याने). पण त्यांनी अजून दहा-बारा वर्षांनी भारत आर्थिक दृष्ट्या प्रबल होईल हे सांगितल्याने मन जरा खट्टू झाले. असो, या संमेलनामध्ये एकापेक्षा एक सरस वक्ते होते. भाऊ तोरसेकरांच्याबद्दल मी पामर काय वर्णन करू? ते एक अवलियाच आहेत. त्यांच्या वाक्या-वाक्याला मिळणाऱ्या टाळ्यांतूनच त्याचे कौतुक व्यक्त होत होते. त्यांनी आत्ताची राजकीय परिस्थिती कशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ध्येय, स्वप्न साकार करत आहे हे स्पष्ट केले. ‘सावरकर साहित्य संमेलना’मध्ये अत्यंत अनुरूप असा विषय त्यांनी मांडला.

 

डॉ. रत्नाकर फाटक यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भारताबद्दलची अतिशय गंभीर पण योग्य भविष्यवाणी अनेक लोकांनी कशी केलेली होती याचा उलगडा केला. त्यांचेही व्याख्यान समयसूचक होते. त्यांचे व्याख्यान अत्यंत संयत आणि संयमी होते. भाऊ तोरसेकरांच्या आक्रमक व्याख्यानाच्या तुलनेने या व्याख्यानाचा पोत अगदी विरूद्ध होता. त्यातूनच आयोजकांची व्याख्यान ठरवण्याची कल्पकता दिसून आली. या संपूर्ण साहित्य संमेलनाचे सार हेच होते की, देश आणि देशभक्त हेच सर्वश्रेष्ठच आहे. समाजाच्या सर्वसमावेशकतेचा आधार घेत देशाची सेवा करायला हवी. शेवटी कुठलाही देश... मग तो पाश्चात्य, पौर्वात्य, दाक्षिणात्य असो, या विश्वाचा एक भाग आहे. हे विसरता कामा नये. कुणी विज्ञानाला, आर्थिक उन्नतीला प्रगतीचे निकष मानले, तरी अध्यात्म हा खूप गहन मानला जाणारा विषय आहे. तरीसुद्धा आपल्या समाजजीवनात अध्यात्म या अनेक रूपात संस्कृतीचा भाग म्हणून येत असते. त्यामुळेच आपला समाज इतक्या आक्रमणांनंतरही टिकून आहे, तोे हा आध्यात्मिक पाया असल्यानेच.

-संगीता आमलाडी 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat