‘सन्मित्र’ हीरक महोत्सवी वर्ष

    दिनांक  03-Jul-2019

 

 
 
सन्मित्र मंडळ, गोरेगाव या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. १० बाय १० च्या खोलीत पाच-सहा बालकांसह सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. मराठी माध्यमातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन विभाग आणि १२०० विद्यार्थी पटसंख्या असणारी सन्मित्र मंडळही पश्चिम उपनगरातील एक अग्रगण्य संस्था आहे.
 
 
मुंबई : २०१८-१९ हे संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करताना केवळ ‘सेलिब्रेशन’ असा विषय न करता वर्षभर शिक्षकांचे प्रबोधन, विद्यार्थ्यांसाठी गुणात्मक आणि कलात्मक स्पर्धा, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजातील शुभेच्छुक यांच्याशी संपर्क व संवाद असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या सगळ्याचे सिंहावलोकन, शाळेची सद्यस्थिती व पुढील यशस्वी वाटचालीच्या संकल्पासाठी सांगता समारोहाचे आयोजन केले होते.
 
 
महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रशिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. सकाळी १० वाजता विनोदजींचे आगमन झाले. स्वागतासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे घोषपथक सज्ज होतेच. त्याचबरोबर पर्यवेक्षिका रेखा मोरे यांनी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. तद्नंतर विनोदजींच्याबरोबर संस्थाचालक व मुख्याध्यापकांचे चहापान व अनौपचारिक गप्पा झाल्या. १०:३० वाजता माधव सभागृहात प्रत्यक्ष सांगता समारोहाला सुरुवात झाली. मान्यवरांनी सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीवंदनाही झाली. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र पुराणिक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संस्थेचा ६० वर्षांचा आढावा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अॅड. नारायण सामंत यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडला, तर हीरक महोत्सवी वर्षातील घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती कार्यकारिणी सदस्य अरुणा सप्रे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी यांनी मंत्रिमहोदयांचे स्वागत करून सन्मित्र मंडळ, गोरेगावचे स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट दिले.
 

विनोदजींनी नंतर सर्व उपस्थितांचे मार्गदर्शन केले. सन्मित्र मंडळसारख्या संस्था विद्यार्थ्यांना घडवत असतात. १०० टक्के’ निकाल असा आग्रह धरण्यापेक्षा आपल्याला ‘थ्री इडियट्स’मधील ‘रांचो’ निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सुचवताना त्यांनी वाईतील जिल्हा परिषद शाळांमधील ‘कुतूहल’ कोपर्यााचे उदाहरण दिले. मातृभाषेतील शिक्षण हे आवश्यक व अतिशय उपयोगी आहे, असे नमूद करून मातृभाषेला ‘डोळ्यां’ची, तर इंग्रजी भाषेला ‘चश्म्या’ची उपमा देत, सन्मित्र मंडळाचे मराठी माध्यमातून शिक्षण चालू ठेवल्याबद्दल राज्याच्यावतीने अभिनंदन केले. शाळेतील ई-लर्निंग, इंग्रजी संभाषण वर्ग, संगणक प्रशिक्षण व सेमी इंग्लिश अशा अनेक उपक्रमांबद्दल सर्व मुख्याध्यापक व त्यांच्या सहकाऱ्यांना शाबासकी दिली व असेच प्रयोगशील राहून मराठी माध्यमातून शिक्षण देणार्याऱ संस्थेची यशस्वी वाटचाल चालू ठेवण्याचे आवाहन केले. मराठी माध्यमातील मुलांना स्पर्धात्मक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करून ‘लोकल ते ग्लोबल’ असा नव्याने पूर्ण अभ्यासक्रम तयार केला असल्याचे सांगितले. हा अभ्यासक्रम तयार करताना डॉ. काकोडकर, डॉ. भाटकर, डॉ. माशेलकर, सोनम वांगचूक अशांचे मार्गदर्शन लाभले आहे. या जोडीला ओपन बोर्ड सुरू केले.

 
शिक्षणात १६व्या क्रमांकावर असणारे महाराष्ट्र राज्य कृती शिक्षण आणि अशा अनेक प्रयोगांमुळे आता तृतीय क्रमांकावर आल्याचे व तीन वर्षात राज्यात 36 हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हापरिषदांच्या शाळेत आल्याचे सांगितले. तुम्ही वाचता, तुम्ही विसरता, तुम्ही बघता, तुम्ही लक्षात ठेवता आणि तुम्ही करता आणि तुम्ही समजता हा कृती शिक्षणामुळे होणारा बदल आहे. एकीकडे मुंबईसारख्या शहरातील मराठी शाळेतील भरतीचा टक्का घसरत असताना ‘सन्मित्र मंडळा’मध्ये या वर्षी १००च्या वर प्रवेश वाढले आहेत, याचे विनोद तावडेंनी विशेष कौतुक केले. ६० वर्षाच्या पुढील वाटचालीत तुम्ही उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण व कौशल्य विकास नवीन वास्तूत चालू करा आणि त्या नवीन उपक्रमांच्या उद्घाटनासाठी मी नक्की येईन, असे आश्वासन दिले.
 

मंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व मुख्याध्यापकांनी (नंदिनी भावे, वैशाली सावंत व सिद्धार्थ गव्हाळे) आपापल्या विभागाची सद्यस्थिती सांगितली. नंतर संस्थेचे सदस्य नीलेश ताटकर यांनी ‘निर्माणोंके पावन युग मे, हम चरित्र निर्माण न भुले’ हे गीत सादर केले. नंतर संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या शुभेच्छुक व माजी विद्यार्थ्यांना संस्थेशी www.sanmitramandal.org, फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे आवाहन केले. ‘सन्मित्र मंडळा’च्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता झाली असली तरी, मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी नव्या कल्पना वास्तवात आणण्याच्या कार्याची नवी सुरुवात आहे.

- अजित वर्तक
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat