संघाच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधी उद्या माझगाव कोर्टात

    दिनांक  03-Jul-2019
मुंबई : गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी गुरुवार दि. ४ जुलै रोजी मुंबईत होणार आहे. त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी माझगाव न्यायालयात उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येशी रा. स्व. संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी माकप नेते सीताराम येचुरी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात वकील धृतिमान जोशी यांनी सप्टेंबर, २०१७ मध्ये खटला दाखल केला होता.

 

हिंदुत्वविरोधी लिखाण करणाऱ्या व डाव्या विचारांच्या कट्टर समर्थक लेखिका-पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर, २०१७ रोजी हत्या झाली होती. ही घटना घडून २४ तास उलटण्याच्या आतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात संघाचा हात असल्याचा आरोप केला होता तर, संघाच्या विचारसरणीतून संघ कार्यकर्त्यांनी गौरी लंकेश यांची हत्या केली, असा आरोप सीताराम येचुरी यांनी एका चर्चासत्रामध्ये केला होता. या विधानांवर तीव्र आक्षेप घेत अॅड. धृतिमान जोशी यांनी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. वास्तविक, या प्रकरणाची सुनावणी ३० एप्रिल रोजीच होणार होती. मात्र न्यायाधीशांची बदली झाल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat