वनाधिकारी ज्योती बॅनर्जी यांच्यावर मालाडमध्ये हल्ला

    दिनांक  03-Jul-2019मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मालाडच्या पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथे मंगळवारी भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पाहणीसाठी गेलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका (अतिरिक्त भार) ज्योती बॅनर्जी आणि इतर वनाधिकाऱ्यांवर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे वन विभागाच्या जागेत मुंबई महानगर पालिकेने बांधलेली भिंत कोसळून २३ जण दगावल्याची दुर्घटना घडली. घटनेच्या पाहणीसाठी गेलेल्या बनर्जी यांना शिवीगाळ करत त्यांच्यासह इतर वनधिकाऱ्यांवर स्थानिकांनी दगडफेक केली. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 
 

तेलंगणा येथील महिला वनाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना अशीच घटना मंगळवारी मुंबईत घडली. मालाडमधील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील काही झोपड्यांवर मंगळवारी संरक्षण भिंत कोसळण्याची घटना घडली. ही घटना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात घडली असल्याने उद्यानाच्या संचालिका ज्योती बॅनर्जी काही वनाधिकाऱ्यांसह या ठिकाणी पाहणीसाठी गेल्या होत्या. उद्यानाचे संचालक अन्वर अहमद सुट्टीवर असल्याने बॅनर्जी यांच्याकडे काही दिवसांकरिता संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, पाहणीसाठी गेलेल्या बनर्जी यांच्यावर संतप्त स्थानिकांनी हल्ला चढविला.

 

संबंधित घटना वन विभागाच्या जागेत घडल्यामुळे माणूसकीच्या नात्याने पाहणीकरिता गेलो असता, आंबेडकर नगर येथे काही नागिरकांनी शिवीगाळ करत आमच्यावर दगडफेक केल्याची माहिती ज्योती बॅनर्जी यांनी मुंबई तरुण भारतला दिली. दगडफेक सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका झोपडीत आम्ही सगळ्यांनी स्वत:ला डांबून घेतले. त्यावेळी झोपडीवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चिघळलेली परिस्थिती पाहता मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरुन कल्पना दिल्याचे, त्या म्हणाल्या. काही वेळानंतर वयोवृद्ध महिलांनी बनर्जी आणि सहकाऱ्यांची झोपडीतून सुटका केली. यासंर्दभात समोर येत असलेल्या एका छायाचित्रफितीमधून स्थानिक रहिवाशी वनधिकाऱ्यांना अॅसिडने भरलेल्या बाॅटल फेकून मारू अशी धमकी देत असल्याचे दिसत आहे. तसेच अर्वाच्च भाषेत वनधिकाऱ्यांना शिवगाळ होत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. परंतु, पोलीसांनी माझ्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली असून तक्रार नोंदविल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat