त्र्यंबके! मृत्युभयापासून वाचव...

    दिनांक  03-Jul-2019
जन्माला येणाऱ्याचा मृत्यू हा निश्चित, तसाच मरण पावणाऱ्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. चाकाच्या धावेप्रमाणे जन्म-मृत्यूचे, सुख-दु:खाचे, हानी-लाभाचे चक्र खाली-वर होत असते. मग जर काय ही गोष्ट अटळच असेल, तर आम्ही मृत्यूला का म्हणून भ्यावे?

 

त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृताम्॥ (ऋग्वेद-7.59.92)

 

अन्वयार्थ - (सुगन्धिम्) सुमधुर, पवित्र व उत्तम ज्ञानयुक्त गंध आणि सौंदर्य असलेल्या (पुष्टिवर्धनम्) जगातील सर्व जड-चेतन तत्त्वांची शक्ती, बळ व पौष्टिकतेला वाढविणाऱ्या (त्र्यंबकम्) तिन्ही लोकांची अधिष्ठात्री असलेल्या व तिन्ही अवस्थांची अधिदृष्टी असलेल्या आई-अंबेचे आम्ही (यजामहे) यजन, स्तवन व पूजन करतो. (याच मातेच्या कृपेने) (उर्वारूकम् इव) ज्याप्रमाणे पिकलेले टरबूज (बन्धनात्) आपल्या वेलीच्या देठापासून अगदी सहजरीत्या वेगळे होते. त्याचप्रमाणे आम्हीदेखील (मृत्यो:) मृत्यू व त्यापासून होणाऱ्या भयापासून (मुक्षीय) वाचावे, वेगळे (दूर) व्हावे. पण (अमृतात्) अमृतापासून कदापी (मा) वेगळे होऊ नयेत.

 

विवेचन जगातील सर्व प्राण्यांना एकच भीती असते, ती म्हणजे मृत्यूची! साधारणपणे छोट्याशा मुंगीपासून ते विशालयकाय हत्तीपर्यंत सर्वच लहान-मोठे प्राणी, जीव, कीटक या सर्वांना जगावेसे वाटते. बालक, तरुण, प्रौढ एवढेच नव्हे, तर अगदी जर्जर झालेल्या वयोवृद्धांनादेखील जगणे आवडते. मरण कोणालाच नको आहे. पण, हे जग द्वंद्वात्मक आहे. जिथे जन्म असतो, तिथे मृत्यू हादेखील अटळच! योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात-

 

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।

 

जन्माला येणाऱ्याचा मृत्यू हा निश्चित, तसाच मरण पावणाऱ्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. चाकाच्या धावेप्रमाणे जन्म-मृत्यूचे, सुख-दु:खाचे, हानी-लाभाचे चक्र खाली-वर होत असते. मग जर काय ही गोष्ट अटळच असेल, तर आम्ही मृत्यूला का म्हणून भ्यावे? महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगूळकर आपल्या गीतरामायणात चित्रकुटावरील राम-भरत भेटीचा प्रसंग रेखाटताना श्रीरामांच्या मुखारविंदातून जन्म-मृत्यू, उत्पत्ती-लय आणि सुख-दु:ख या द्वंद्वात्मक बाबींचे विवेच्यपूर्ण वर्णन करवितात-

 

जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात?

दु:खमुक्त जगला का रे कुणी या जगात

वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...!!

 

जन्माचे जसे आनंदाने स्वागत तसेच मरणदेखील प्रिय व गोड मानावयास हवे. पण, सामान्यपणे मृत्यू किंवा दु:ख कोणासच नकोसा आहे. योगदर्शनामध्ये महर्षी पतंजली मृत्युभयास ‘अभिनिवेश’ या नावाने संबोधित करतात. हा पंचक्लेशांपैकी एक आहे. याचे स्वरूप सांगताना महर्षी म्हणतात –

 

स्वरसवाही विदुषोऽपि

तथाऽऽरुढोऽभिनिवेश:।’

 

निसर्गत: प्रवाहित होणारा (स्वाभाविकपणे) मृत्यूच्या भयाचा हा क्लेश जसा अज्ञानी व मूर्ख लोकांच्या अंत:करणात आरुढ असतो, तसाच तो ज्ञानी व विद्वान लोकांच्याही अंत:करणातदेखील आरुढ असतो, यालाच ‘अभिनिवेश’ (क्लेश) म्हणतात.

 

नेमके याच मृत्युभयापासून वेगळे होण्याची कामना या मंत्रात केली आहे. ‘मृत्यो: मुक्षीय मा अमृतात्।’ मृत्यू म्हणजे मृत्यूपासून होणाऱ्या भीतीपासून आम्ही वाचावे, त्यापासून नेहमी दूर राहावे. मात्र, अमृत म्हणजे अमृततत्त्वापासून कदापि नव्हे! याकरिता ‘उर्वारुक’ म्हणजेच टरबूज (कलिंगड) या फळाची उपमा देण्यात आली आहे. हे फळ म्हणजे इतर सर्व फळांचे प्रतिनिधित्व करणारे तत्त्व! तसे पाहिले तर परिपक्व किंवा पूर्णपणे पिकलेली फळे आपल्या वेलींच्या देठांपासून अलगदपणे वेगळी होतात. अशा फळांना विलग होताना थोडेही दु:ख होत नाही की त्रासही नाही. तसेच आमच्या मृत्यूबाबतही घडावे. आम्ही मृत्यूपासून निर्माण होणाऱ्या भय व दु:खातून मुक्त होवोत. पण, अमृतापासून म्हणजे परमेश्वरीय आध्यात्मिक आनंदापासून कदापी दूर होता कामा नये.

 

सदरील मंत्रात ‘मृत्युभयातून मुक्ती आणि अमृतसुखाची प्राप्ती’ अशी आमची तीव्र अभिलषित प्रार्थना आहे. आपले हे मागणे कोणाकडे असावे? तर ज्याच्याकडे हे इप्सित साध्य करण्याचे सामर्थ्य आहे. त्याचकडे! उगीच असमर्थांकडे व्यर्थची मागणे काय कामाचे? परमेश्वर या जगाला उत्पन्न करणारी, पालन करणारी आणि शेवटी प्रलय करणारी, अशी तीन प्रकारचे कामे करणारी, स्वर्ग-मृत्यू-पाताळ या तिन्ही जगांची, भूत-वर्तमान-भविष्य या तिन्ही काळांची उत्तम व्यवस्था लावणारी, रक्षण करणारी व काळजी वाहणारी ‘अंबा’ म्हणजेच आई आहे. जगातील सर्व जड-चेतन समूहाला आपल्या सामर्थ्याने उत्पन्न करते. विशिष्ट पद्धतीने त्यांना धन्य-धान्य, औषधी-वनस्पती आणि आध्यात्मिक व भौतिक अशा ज्ञान-विज्ञान तत्त्वांनी सुगंधित करते. त्या सर्वांना पुष्ट, बलसंपन्न बनविते. ही सर्व पात्रता व दिव्यता या मातेमध्ये आहे. जे स्वत:त असते, तेच इतरांना देऊ शकते. म्हणून ही विश्वाची आई स्वत: सुगंधयुक्त व पुष्टयुक्त आहे. अशा मातेचे आम्ही स्तवन करावे, तिचेच भजन करावे आणि तिचीच प्रार्थना करावी. ही महन्माता आम्हा जीवात्म्यांना जन्माला घालून आमचे व्यवस्थितरीत्या संगोपनही करते. जगण्याकरिता तिने वेदज्ञान व सारी सृष्टी खुली केली आहे. त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे हे आमच्या हाती आहे. पण, आम्ही मात्र चुकलो, तर ती आमच्यावर कदापि दया दाखविणार नाही. ती आपल्या मृत्युरूपी कुशीत घेते पुन्हा जन्मास घालण्याकरिता! मग त्या आईच्या कर्मविधानाची आम्ही का म्हणून भीती बाळगावी?

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat