एका शिक्षकाची ‘जंगलातील शाळा’

    दिनांक  03-Jul-2019   
हाडाचे शिक्षक असलेल्या पी. के. मुरलीधरन यांनी केरळच्या मुथ्थुवन वनवासींच्या वस्तीत राहून त्यांना शिक्षणाचे बाळकडू देण्याचा निर्णय घेतला आणि सुशिक्षित पिढ्या घडवल्या. अशा या शिक्षकाविषयी...

 

केरळ हे देशातील सर्वाधिक सुशिक्षित राज्य. नैसर्गिक संपत्तीने भरभरून दिलेल्या या देवभूमीच्या गर्द वनात आजही वनवासींचे वास्तव्य आढळते. पण, साहजिकच सुशिक्षित मूळ प्रवाहापासून हे वनवासी कोसो दूर. त्यापैकीच वनवासींची एक जमात म्हणजे ‘मुथ्थुवन समाज.’ जंगलातच जागा मिळेल तिथे रागी आणि भाताचे पीक घेणारी ही भटक्या वनवासींची जमात. शिक्षणाशी तर त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. एवढंच काय, वही, पुस्तक, पेनाची सावलीही त्यांच्यावर कधी पडली नाही. अशा या शिक्षणापासून वंचित वनवासी समाजात शिक्षणाचे रोपटे रुजवण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला खरा. पण, या समाजाच्या दुर्गम वस्त्यांपर्यंतच पोहोचणेही वन्यप्राण्यांमुळे जिकिरीचे होते आणि शिवाय सोयीसुविधांचीही वानवा. मग काय, केरळ सरकारने अशा दुर्गम भागांसाठी खास ‘एक शिक्षक शाळा’ धोरण अवलंबिले. त्याअंतर्गत निवड झालेल्या शिक्षकाने त्याच वस्तीत राहूनच सर्व मुलांंना शिक्षणाचे धडे द्यायचे. त्या मुलांना काय हवं-नकोयाची काळजी घ्यायची. अशा या एकाच शिक्षकाच्या खांद्यावर चालणाऱ्या ‘मुथ्थुवन’ समाजातील शाळेची जबाबदारी मुरलीधरन यांनी आनंदाने स्वीकारली.

 

तो काळ होता ठीक २० वर्षींपूर्वीचा, म्हणजे १९९९चा. मुरलीधरन आपले घरदार, बायका-मुलं सोडून या ‘वनवासा’त दाखल झाले. महिन्याच्या अखेरीस एक-दोन दिवस फक्त मुरलीधरन घरी तोंडदेखली हजेरी लावायचे. पण, त्यांनी त्यांचे जवळपास संपूर्ण आयुष्यच या वनवासी समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी समर्पित केले होते. म्हणून अगणित समस्या समोर आल्या, तरी मुरलीधरन यांनी कधीही माघार घेतली नाही आणि त्याच्याच परिणामस्वरुप ‘मुथ्थुवन’ समाजाच्या तीन पिढ्यांमध्ये त्यांनी शिक्षणज्योत तेवत ठेवली. २००६ साली त्यांच्या पत्नीच्या निधनानंतरही आपल्या पोटच्या मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात सोपवून ते या वनवासींच्या सेवार्थ जंगलातच स्थायिक झाले. इतर वनवासींप्रमाणे आपल्या प्रथा-परंपरांना सर्वोच्च स्थानी मानणाऱ्या ‘मुथ्थुवन’ जमातीत कुणीही शिक्षित नव्हते. दोन-चार ज्येष्ठ सोडल्यास मल्याळम भाषेचा गंधही नव्हता. त्यामुळे या मुलांशी संवाद साधायचा तरी कसा, हा मोठा प्रश्न मुरलीधरन यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला. पण, पेशाने शिक्षक असलेल्या मुरलीधरन यांनी चक्क हातवारे आणि खाणाखुणांच्या सांकेतिक भाषेचा वापर करून मुलांशी संवाद साधला. पण, जन्मानंतर अवघ्या तिसऱ्या महिन्यापासूनच निसर्गत: मुक्तसंचार करणाऱ्या या मुलांना चार भिंतीस्वरूप वर्गखोली बांधून बंदिस्त करणेही शक्य नसल्याचे मुरलीधरन यांच्या लक्षात आले. मग काय, वस्तीतीलच एका बांबूच्या शेडखाली या मुलांचे शिक्षण सुरू झाले आणि तेही अगदी कुठल्याही शैक्षणिक साहित्याशिवाय. म्हणजे, सुरुवातीला तर साधी पाटी, खडूचीही व्यवस्था नव्हती. वह्या, पुस्तकं वगैरे तर खिजगणतीतच नाही. त्यातच बहुतांशी मुलं ही वयवर्षे ५ ते १५ या वयोगटातील. त्यामुळे त्यांना नेमके काय शिकवायचे, कसे शिकवायचे याचे आव्हानही मुरलीधरन यांनी लीलया स्वीकारले.

 

आपल्या कमाईतील एक-एक दमडीची बचत करून मुलांसाठी आवश्यक ते शिक्षणोपयोगी साहित्य ते उपलब्ध करून द्यायचे. पण, मुख्य अडचण होती ती मुलांच्या स्वच्छताविषयक सवयींची. या मुलांना ना पिवळ्या दातांची शरम ना शरीर झाकण्यासाठी कपड्यांची गरज. मग काय, मुरलीधरन यांनी शिक्षणाचे धडे गिरवण्याआधी वैयक्तिक स्वच्छेवरच लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला स्वच्छतेचे हे सोपस्कार समजणे मुलांना जडही गेले, पण हळूहळू ही सवय त्यांच्या अंगवळणी पडली. लहान मुलांबरोबरच समाजातील काही प्रौढ व्यक्तींनीही मुरलीधरन यांच्या वर्गाला हजेरी लावली आणि चार शब्द का होईना, शिकून घेण्याचे प्रयत्न केले. याच दरम्यान मुरलीधरन यांनी ‘मुथ्थुवन’ समाजाची तामिळशी थोडीफार साधर्म्य साधणारी भाषाही अवगत केली, जेणेकरून या समाजाशी त्यांची वेगळीच नाळ जोडली गेली.

 

शिक्षकी पेशा’ हा तसा समाजसेवेचाच एक मार्ग. हल्ली त्याचे बाजारीकरण झाले असले तरी मुरलीधरन यांच्यासारख्या हाडाच्या शिक्षकांना मात्र हा पैसा कधीही खरेदी करू शकला नाही. मुरलीधरन यांना केरळमधील कोणत्याही शहरात सरकारी नोकरी सोडून एक सुखवस्तू जीवन जगता आले असते. पण, त्यांनी आपल्या संसारसुखाची आहुती देत ‘मुथ्थुवन’ समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी स्वत:ला झोकून दिले. या दुर्लक्षित, वंचित समाजाला केवळ शिक्षणाची गोडीच लावली नाही, तर रेशनकार्ड तसेच इतर सरकारी योजनांचे फायदे त्यांना कसे मिळतील, यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. एवढेच नाही, जिथे जिथे हा समाज रोजीरोटीसाठी स्थलांतरीत झाला, त्या-त्या ठिकाणी जाऊनही मुरलीधरन यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. अशा या मुरलीधरनरूपी एक खांबी शाळेला केरळ सरकार, तसेच अनेक सामाजिक संस्थांनीही विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांचे हे कार्य निश्तितच शिक्षकांना, समाजसेवकांना नक्कीच प्रेरणा देणारे असे...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat