दासबोधातील जीवनदर्शन व समर्थांची शिकवण

    दिनांक  03-Jul-2019 
 जुगार, चोरी, बाहेरख्यालीपणा, चहाडी, परस्त्रीगमन इ. वाईट सवयी असलेल्यांचे उल्लेख दासबोधात येतात. कृतघ्न, वाचाळ, भित्रे, निर्लज्ज, घाणेरडेपणाने राहणारे अशा लोकांचेही संदर्भ येतात. ही मूर्खांची लक्षणे आहेत. ही माणसे अडाणी, अशिक्षित असल्याने असला मूर्खपणा करतात. परंतु, हे सारे माहीत असूनही काही लोक सदाचाराला महत्त्व न देता भ्रष्टाचाराचा आणि हीन लक्षणांचा जाणीवपूर्वक अंगीकार करतात. अशांना समर्थांनी ‘पढतमूर्ख’ म्हटले आहे.
 
 

प्रपंच ‘नेटका’ करायचा तर त्यासाठी आजूबाजूच्या सामाजिक स्थितीचा ऊहापोह केला पाहिजे. लोकांना ‘शहाणे’ करायचे ठरवले, तर त्यासाठी ‘सामाजिक शहाणपण’ शिकवणे महत्त्वाचे होते.त्यामुळे जेथे लोकांसाठी शिकवण महत्त्वाची वाटते, तेथे समाजाचा विचार करावा लागतो, तसेच समाजाच्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक असते. तसा आढावा समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात वेळोवेळी घेतलेला आहे. दासबोध ग्रंथारंभी स्वामींनी स्पष्ट केले आहे की, या ग्रंथात अनेक विकल्पांचे अनेक भ्रम आणि चुकीच्या समजुतींचे निराकरण केलेले आहे.

 

मूर्खांची लक्षणे सांगताना कोणाची टवाळी करण्याचा स्वामींचा उद्देश नव्हता.तरीही मूर्ख माणसांची टिंगल त्यातून अप्रत्यक्षपणे होऊ नये, असा प्रामाणिक हेतू मनात ठेवून त्यांनी ही लक्षणे सांगण्याअगोदर गुरुचरणांचे रघुनाथाचे स्मरण केले आहे व त्याज्य करण्यासाठी ही लक्षणे सांगितले आहे.

 

वंदून गुरुचण । करुन रघुनाथ स्मरण।

त्यागार्थ मूर्खलक्षण। बोलिजेल ॥

 

मूर्खांची व पढतमूर्खांची लक्षणे स्वामींनी आजूबाजूच्या समाजातून न्याहाळली आहेत. त्यामुळे त्यात लोकांचे चित्रण येते. त्या लक्षणांचा त्याग करावा ही शिकवण मिळून लोक शहाणे व्हावेत, असे स्वामींच्या मनात होते. प्रपंचात पूर्णपणे गुरफटलेल्या माणसाची ही लक्षणे आहेत. कामवासनेपायी आपल्या स्त्रीच्या पूर्ण अधीन झालेल्यांचे यात वर्णन आहे. असा माणूस त्यापायी आपल्या जन्मदात्या मातापित्यांना विसरतो.आजच्या काळाप्रमाणे समर्थकाळीही ‘वृथा अहंकार’ बाळगणारी आळशी आणि व्यसनी माणसे होती. ही माणसे फुकट बढाया मारणारी होती. स्वत:चे कर्तृत्व शून्य असताना पूर्वजांच्या नावे कीर्ती सांगणारी आळशी होती.

 

आपली आपण करी स्तुती। स्वदेशी भोगी विपत्ती। सांगे वडिलांची कीर्ति। तो येक मूर्ख ॥

 

जुगार, चोरी, बाहेरख्यालीपणा, चहाडी, परस्त्रीगमन इ. वाईट सवयी असलेल्यांचे उल्लेख दासबोधात येतात. कृतघ्न, वाचाळ, भित्रे, निर्लज्ज, घाणेरडेपणाने राहणारे अशा लोकांचेही संदर्भ येतात. ही मूर्खांची लक्षणे आहेत. ही माणसे अडाणी, अशिक्षित असल्याने असला मूर्खपणा करतात. परंतु, हे सारे माहीत असूनही काही लोक सदाचाराला महत्त्व न देता भ्रष्टाचाराचा आणि हीन लक्षणांचा जाणीवपूर्वक अंगीकार करतात. अशांना समर्थांनी ‘पढतमूर्ख’ म्हटले आहे. हे पढतमूर्ख ‘शिक्षित’ असल्याने चांगल्या ग्रंथांचे वाचन करतात. लोकांना ब्रह्मज्ञान सांगतात, पण अंतरात मात्र हे पढतमूर्ख वासनेने बरबटलेले आणि अहंकाराने लिप्त असतात. हे अवगुण त्यांना सोडवत नाहीत. एखादा ग्रंथ पूर्णपणे न वाचता त्याला नावे ठेवणारे हे ‘पढतमूर्ख विद्वान’ (?) समर्थकाळीही होते, तसेच एखाद्या गुणी माणसाचे फक्त अवगुण पाहणारेही होते.

 

समूळ ग्रंथ पाहिल्यावीण।

उगाच ठेवी जो दूषण।गुण सांगता अवगुण।

पाहे तो येक पढतमूर्ख ॥

 

हे लोक ग्रंथांचे वाचन करून आपल्या ज्ञानाच्या प्रदर्शनासाठी स्त्रियांची संगत करतात आणि त्या ज्ञानाचे निरुपण फक्त स्त्रियांना करतात, असे ‘लंपट’ समर्थकाळी होते. आजही अशा भोदूंची कमतरता नाही.

 

उत्तम लक्षणे सांगताना अनेक गोष्टी टाळायला समर्थांनी सांगितले आहे. त्यातूनही तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. स्वामी सांगतात,‘शोधिल्यावीण करु नये कुळहीन कांता.’ एखाद्या मुलीशी लग्न करायचे तर कुल-शीलाची नीट चौकशी करून मग लग्न ठरवावे. तत्कालीन समाजात लग्नकार्यात फसवाफसवी होत असावी. इतर बाबतीतही फसवाफसवी होत असावी. म्हणून स्वामी सांगतात, “दस्तावेज म्हणजे कागदपत्र केल्याशिवाय देवघेवीचे व्यवहार करू नये.” त्याकाळीही धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन करणारी व्यसनी माणसे होती. ‘कुविद्या’ लक्षणे सांगताना तापट, तामसी, अविचारी, पापी, आततायी व निरर्थक बडबड्या स्वभावाची माणसे दासबोधात दिसून येतात. ते सारे समर्थांचे सभोवतालचे अवलोकन आहे.

 

तमोगुणांचे वर्णन करताना अनेक प्रकारच्या ‘हत्या’ करणाऱ्या माणसांची उदाहरणे समर्थांनी दिली आहेत. त्यात बालहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, देवळे पाडणारे, मूर्ती फोडणारे, फळांनी बहरलेलेवृक्ष तोडणारे यांचे उल्लेख आहेत. लोकांना त्रास देण्यात, निदर्यपणे वागवण्यात या ‘तमोगुणी’ लोकांना आनंद वाटत असतो. या तमोगुणांनी पुरेपूर भरलेले लोक त्यावेळी कोण होते, हे तत्कालीन समाजाला स्वानुभवाने ठाऊक होते. हे सांगताना समर्थांचा रोख नेमका कोणत्या अत्याचारी लोकांविषयी आहे, हे त्यावेळी सर्वांना ठाऊक होते. मुसलमानांच्या धाडी उत्तरेकडून आल्या की, हे प्रकार लोक अनुभवायचे. स्वामींनी त्यांना ‘राक्षस’ म्हटले आहे. देवळे पाडणे, देवाच्या मूर्तीचा विद्ध्वंस करणे, दहशत पसरवणे हे उद्योग परधर्मीय सत्ताधारी व त्यांचे अनुयायी सर्रासपणे करीत होते. अशा ‘पापीकृत्यां’ना ते ‘धर्मकृत्य’ मानत. त्या काळी म्लेंच्छांत ‘बुतशिकन’ म्हणजे ‘मूर्तिभंजक’ ही पदवी मानाची समजली जाई. ती पदवी मिळवून मिरवण्यात या म्लेंच्छांना अभिमान वाटत असे. समर्थांनी या सर्व कृत्यांचा निषेध केला आहे.

 

समर्थांनीसगुण परीक्षा’ नावाचे दशक लिहिले आहे. त्यात स्वामींनी मानवी जीवनाची मूळ समस्या सांगितली आहे. मनुष्य आयुष्यभर सुुखासाठी धडपड करतो. पण, ते वाट्याला न येता दु:ख मात्र मोठ्या प्रमाणावर भोगावे लागते. त्याची कारणे व त्यावरील उपाय समर्थांनी या दशकात स्पष्ट केले आहेत.या दशकात ‘सगुण परीक्षा’ नावाचे चार मोठे समास स्वामींनी लिहिले असून तत्कालीन आपत्स्थितीचे वर्णन केले आहे. सर्वसामान्य माणसाची धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक स्थिती कशी असते, त्यातील समस्या कोणत्या, याचे यथार्थ वर्णन या चार समासांतून पाहायला मिळते. स्वामी या समासात सांगतात की, मूल लहान असताना असाहाय्यअसल्याने आई हे त्याचे सर्वस्व असते. आईशिवाय थोडा वेळही ते राहत नाही. जरा मोठे झाल्यावर त्या मुलाला खेळायचा आणि समवयस्क मित्रमंडळींचा नाद लागतो. शेवटी कसेतरी मारून मुटकून आईवडील या मुलाला शिकवून शहाणे करतात. तो मार्गाला लागतो. मग आई-वडील त्याचे लग्न लावून देतात. बायको व सासुरवाडी त्याला अत्यंत प्रिय असते. आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती कशीही का असेना, हा सासुरवाडीला जाताना नीटनेटका जातो.त्यासाठी तो कर्ज काढतो. त्यानंतर कामवासनेच्या आहारी गेलेल्या तरुण विवाहित माणसाचे स्वामी वर्णन करतात. बायकोशिवाय त्याला काही सूचत नाही. तिच्यासाठी तो वेडापिसा होतो. तिच्या सहवासासाठी लोकलज्जा सोडून वागतो.असे हे ‘प्रितीपात्र’ मेल्यावर बायकोचे प्रेत मांडीवर घेऊन लाजलज्जा सोडून ढसाढसा रडतो. त्याला काहीही नकोसे वाटते. एकप्रकारे त्यांच्या अंगी ‘स्मशान वैराग्य’ येते. त्यातून सावरल्यावर तो पुन्हा दुसरेलग्न करतो. दुसऱ्या बायकोत त्याचे मन रमून जाते. आनंदाला उधाण येते. या वर्णनात अतिशयोक्त काही नाही. आजही अशी माणसे पाहायला मिळतात. दुसरे लग्न झाल्यावर हा कंजुषपणे वागू लागतो. दुसरी बायको केली, पण ती लहान वयाची. स्त्रीसुखाची चटक लागलेली असल्याने हा बाहेरख्याली होतो. त्यातून तो अनेक रोगांना-विकारांना बळी पडतो. तशात दरोडा पडल्याने कंजुषपणाने वाचवलेला पैसा नाश पावतो. मग त्यातूनही तो सावरतो. वैद्यांच्या औषधाने बरा होतो. काहीतरी कामधंदा करू लागतो. थोडा पैसा गाठीशी साठवतो, पण समस्या काही त्याचा पिच्छा सोडत नाहीत.

 

या समस्या बारकाईने सांगण्यामागे मानवी जीवनाची यथार्थ कल्पना यावी व त्यापासून आपण योग्य ती शिकवण घ्यावी आणि आपले जीवन कृतार्थ करावे, असा स्वामींचा उद्देश आहे. या जीवाच्या आणखी समस्या पुढील लेखात...

 

(क्रमश:)

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat