गुन्हेगार सापडणार एका क्लीकवर; ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

    दिनांक  29-Jul-2019


 


जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य


मुंबई : सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ॲम्ब‍िसप्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुभारंभ केला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. गुन्हेगारांची माहिती तात्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी ॲम्ब‍िस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी पोलीस आयुक्तालयातील जे.एस. भरुचा सभागृहाचे उद्‌घाटन, कचरामुक्त मोहिमेचा शुभारंभ आणि मुंबई पोलिसांच्या रक्षक हैं हम या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

 

अशी आहे ॲम्ब‍िस प्रणाली

 

जुन्या व पारंपरिक पद्धतींनी होणाऱ्या कामकाजाची परिभाषा बदलून राज्य पोलिस दलाने आता आधुनिकीकरणाची कास धरली आहे. आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. यासाठी अद्ययावत अशी अॅम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली विकसित केली गेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसेच दिली गेलेली ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असणार आहे.

 

जगातील सर्वोत्तम अशीॲम्बिसप्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

 

डोळ्यांचे, हाताच्या तळव्यांचे स्कॅन यांचा वापर करून गुन्हेगाराचा अचूक शोध घेण्यास मदत

 

४१ युनिटमधील, ११६० पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार ही सुविधा

 

२६०० पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण

 

एका क्लिकवर मिळणार आरोपींची सर्व माहिती

 

फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर

 

सीसीटीएनएस आणि सीसीटीव्हीशी कनेक्टेड

 

नवीन सिस्टीमनुसार डिजिटल स्वरूपात साठवले जुने साडेसहा लाख बोटांचे ठसे

 

१४३५ चान्सप्रिंट्स प्रणाली मध्ये उपलब्ध

 

पहिल्याच दिवशी शोधल्या ८५ गुन्ह्यांशी संबंधित ११८ चान्सप्रिंट्स

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat