हिंदू देवतांना शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास मुंबई पोलिसांची टाळाटाळ

    दिनांक  29-Jul-2019
तक्रार देऊनही हिंदू देवतांविषयी अश्लील अपशब्द वापरणाऱ्या ट्विटर हँडलविरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई नाही

मुंबई : ट्विटरवरील 'अशी कलीम' या महिलेच्या ट्विटर अंकाऊंटवरून गेले अनेक दिवस धार्मिक द्वेष पेरणारा मजकूर ट्विट केला जात आहे. त्यात श्रीकृष्ण, सीता यांच्याबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषेचा प्रयोग दिसून येतो. दुर्गेला 'वेश्या', श्रीकृष्णाविषयी लिहिताना 'बलात्कारी' या दूषणाचा वापर 'अशी कलीम' या ट्विटर हँडलवरून केला आहे. कलीम यांच्या ट्विटर अंकाऊंटवरून हिंदूंच्या ऋषीमुनींवर अश्लील शब्दांत टीका केली जात होती. अशी कलीम यांनी एका ट्विटमध्ये असे लिहिले होते की, "एक टक्के मुस्लिमांनी या देशावर राज्य केलं ; आज आम्ही (मुस्लीम) २० टक्के आहोत... " तसेच राधा, शिवशंकर, ब्रह्मदेव अशा हिंदूंच्या श्रद्धास्थानासाठी अपशब्दांचा वापर करण्यात आला आहे.

 

या विरोधात मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. चांदनी शाह यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रारदारांनी भारतीय दंडविधान संहिता, १८६० च्या कलम २९५-क, २९८, ५०४, ५०५ खाली 'अशी कलीम' या ट्विटर हँडलविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली होती. कलम २९५ - क नुसार 'धार्मिक भावना दुखावणे' अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे. शाह यांनी कारवाईची मागणी करणारा तक्रार अर्ज देऊन १० दिवस उलटून गेले ; तरीही अजून मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 'एफआयआर' दाखल केलेला नाही. 'धार्मिक भावना दुखावणे' हा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे, 'एफआयआर' दाखल करणे, पोलिसांवर बंधनकारक असते. अशी कलीम यांची ट्विटस धार्मिक शत्रुत्व पसरवणारी आहेत. समाजमाध्यमांवर असा मजकूर लिहिण्यास परवानगी नाही. याबाबत धार्मिक तेढ निर्माण होईल, असा मजकूर लिहिल्याप्रकरणीदेखील कारवाई केली जाऊ शकते. शाह यांनी वारंवार पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

 

"आपण एका सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्या देशात राहतो. तिथे अशाप्रकारे इतरांच्या धार्मिक भावना दुखावणे योग्य नाही. हिंदू समाज सहिष्णू आहे. नागरिकांना घटनेने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये. संबंधित प्रकार हा कायद्याने शिक्षेस पात्र असलेला गुन्हा आहे. सदरचे ट्विटर हँडल चालवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे."

 

- अॅड. चांदनी शाह

वकील, मुंबई उच्च न्यायालय)

 

ट्विटरवरील हा प्रकार दिनांक १९ जुलै, २०१९ रोजी लक्षात आल्यावर, शाह यांनी बीकेसी, बांद्रा येथे जाऊन सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आले की, आपण या तक्रारीची प्रत जवळच्या पोलीस ठाण्यात द्या ; गुन्हा दाखल करून घेतला जाईल. दुसऱ्याच दिवशी, २० जुलै २०१९ रोजी, त्या जवळचे पोलीस ठाणे म्हणजेच गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता गेल्या होत्या. याप्रकरणी इतर कुठे एफआयआर झाला आहे का, याची पडताळणी करायला वेळ लागेल, असे कारण त्यांना सांगण्यात आले. अॅड. शाह यांनी त्यांना लेखी तक्रार देऊन, त्याची पोच घेतली आहे. समाजमाध्यमांत याविषयी असंतोषजनक प्रतिक्रिया उमटल्यावर , पोलिसांनी २२ जुलै रोजी शाह यांना जबाब नोंदवण्यासाठी बांगूरनगर पोलीस ठाण्यात बोलावले. जबाब नोंदवून अनेक दिवस झाले ; तरी कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही. अॅड. शाह वारंवार सदर गुन्ह्याची आठवण मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलला करत होत्या ; पण तिथून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. पायल रोहतगी या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अभिनेत्रीला ब्लॉक केल्याच्या प्रकरणात, मुंबई पोलिसांचे अधिकृत ट्विटर हँडलदेखील काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat