राष्ट्रवादीला नवी मुंबईत खिंडार ; गणेश नाईक भाजपप्रवेश करणार ?

    दिनांक  29-Jul-2019५७ नगरसेवक पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येणार


नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांची रीघ काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक, त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत. तसेच, त्यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेतील तब्बल ५७ नगरसेवक, तसेच पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे.

 

गणेश नाईक हे नवी मुंबईत एकहाती वर्चस्व असलेले नेते मानले जातात. गेले अनेक दिवस ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, स्वतः नाईक यांनीच आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोडून अन्य पक्षात जाणार नसल्याचे वारंवार सांगितले होते. मात्र आता गणेश नाईक आपल्या सर्व समर्थकांसह, ५० हून अधिक नगरसेवकांसह पक्षांतर करून राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. याबाबत काही वृत्तमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सोमवारी नवी मुंबई महापौर निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ५३ नगरसेवक नगरसेवक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी यावेळी उपस्थितांना भाजपप्रवेशाबाबत विचारणा केली व त्यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी होकारही दिला. यानंतर मंगळवार, दि. ३० जुलै रोजी हे सर्व नगरसेवक व अन्य पदाधिकारी आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसया निवासस्थानी उपस्थित राहणार असल्याचे सुतार यांनी सांगितल्याचे समजते.

 

स्वतः गणेश नाईक यांनी संभाव्य भाजपप्रवेशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. नाईक यांच्यासोबत त्यांचे पुत्र व माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, मीरा-भाईंदर महापालिकेतील आजी-माजी महापौर, ठाणे जिल्हा बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी, नवी मुंबई महापालिकेतील ५७ नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवली, मुरबाड, भिवंडी आदी तालुक्यांतील राष्ट्रवादीचे असंख्य पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच, यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईक व समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे नाईक यांच्या कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेले दोन-तीन महिने नवी मुंबई महापालिकेतील हे ५७ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही होते.

 

पवारांना मोठा हादरा

 

नवी मुंबई व आसपासच्या प्रदेशात गणेश नाईक यांचे मोठे वर्चस्व आहे. नाईक आधी शिवसेनेत होते परंतु, कालांतराने ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. आघाडी सरकारच्या काळात ते कामगार, उत्पादन शुल्क, पर्यावरण आदी विविध खात्यांचे मंत्री होते तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्रीही होते. २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. तसेच, त्यांचे पुत्र संजीव नाईक हे २००९-१४ या काळात ठाण्याचे खासदार होते व संदीप नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग २ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नवी मुंबई परिसरावर मोठे वर्चस्व असणारे नाईक आपले सर्व समर्थक, कार्यकर्ते व नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने हा शरद पवारांसाठी मोठा हादरा ठरण्याची शक्यता आहे.

 

नवी मुंबई पालिकेत भाजपची सत्ता?

 

या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. सध्या येथे राष्ट्रवादीची सत्ता असून भाजपचे केवळ ६ नगरसेवक आहेत. नवी मुंबईसारखी मोठी आणि महत्वाची महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यास विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat