कोळंबकर यांचा कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा : ३१ जुलैला करणार भाजपप्रवेश

29 Jul 2019 17:14:35
 


मुंबई : काँग्रेसचे वडाळा विधानसभेचे आमदार आणि नारायण राणेंचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी सोमवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. ३१ जुलै रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरू होती. "गेल्या साडेचार वर्षात काँग्रेसने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात मदत केली नाही. त्यामुळेच मी काँग्रेस सोडत आहे, असे कोळंबकरांनी यापूर्वी जाहीरपणे सांगितले होते. माझी कामे मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन", असे कालिदास कोळंबकर म्हणाले होते.

 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच काँग्रेस चांगलाच फटका बसत आहे. त्यात आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मुंबईत मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर बुधवारी म्हणजे ३१ जुलैला भाजपप्रवेश करतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0