हिंदूद्वेषाचा विखार

    दिनांक  29-Jul-2019   इस्लामी वा ख्रिश्चन कट्टरवादी आपापल्या धर्माच्या वर्चस्वासाठी कोणत्याही थराला जात असल्याचेच यातून दिसते. परंतु, डॉ. डेव्हिड फ्रॉली उर्फ वामदेवशास्त्री यांच्या मताप्रमाणे हिंदूंनी कधीही अशांततेचा, अत्याचाराचा पुरस्कार केल्याचे दिसले नाही.


आज जगात कट्टरवाद्यांची अजिबात कमतरता नाही, ना पूर्वीही कधी होती ना पुढेही कधी असेल. कारण, एकीकडे धर्मांध इस्लामी जिहाद्यांनी खुदाच्या नावावर बहुतांश देशांत दहशत माजवल्याचे दिसते, तर दुसरीकडे ख्रिश्चन मिशनर्‍यांनी सेवाभावाच्या नावाखाली संपूर्ण जगाला ख्रिस्ती करण्याचा रस्ता धरल्याचे पाहायला मिळते. तिसरीकडे अमेरिकन तत्त्वज्ञ, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉली यांनी नुकताच, हिंदू धोकादायक, अत्याचार करणारे असतील, तर सर्व स्थलांतरित हिंदू शांतताप्रिय, कार्यप्रवण आणि आदर मिळवणारे कसे? असा सवाल उपस्थित केला. इथे हे मुद्दे मांडल्याने कोणाला वाटेल की, हा तिन्ही धर्मांची तुलना करण्याचा तर प्रकार नाही ना? तर तसे नसून ज्या घडामोडी घडल्या आणि घडत आहेत, तेच वास्तव इथे लिहिले आहे. आताच हा विषय येण्याचे कारण म्हणजे रशियातील एक घटना.

 

रशियातील ख्रिश्चन कट्टरवाद्यांकडून तिथल्या 'श्री प्रकाश धाम' या हिंदू आश्रमाशी निगडित भाविकाला दीर्घ काळापासून सतावले, धमकावले जात आहे. आश्रमप्रमुख श्री प्रकाश यांनी ही माहिती दिली असून १९९० सालापासून आम्ही शांततेने इथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, अलेक्झांडर दोर्किन नामक एका ख्रिश्चन कट्टरवाद्याची त्यांच्या आश्रमावर नजर पडली आणि तिथली शांतता भंगू लागली. दोर्किनने 'प्रकाश धाम'मध्ये जाणार्‍या-येणार्‍या हिंदूंवर हल्ले तर केलेच, पण आपल्या 'iriney.ru' या वेबसाईटवर उघडपणे हिंदू धर्माचा आणि हिंदूंच्या देवी-देवतांचा अभद्र शब्दांत अपमानही केला.

 

अलेक्झांडरने आपल्या वेबसाईटवर लिहिले की, "हिंदू धर्म नसून राक्षसी, मूर्तिपूजक, जादूटोणा करणारा पंथ असून त्यात हजारो संप्रदाय आहेत. हिंदू धर्माचे सार पाहता सैतानीपणाशिवाय काहीही दिसत नाही. हिंदू धर्म जंगली बुतपरस्त, ख्रिस्तविरोधी आहे. कृष्ण स्वतः सैतान असून गोपिका वेश्या होत्या. काली ही सैतानाचे राक्षसी स्त्री रूप आहे. योग राक्षसी प्रथा-पद्धती असून योग मृत्यूचा मार्ग आहे. योगाचा उद्देश स्थायी मृत्यू हाच असून ध्यानावेळी एखादा योगी सैतानाचीच भेट घेतो. हिंदू धर्म मानवजातीसाठी सर्वात घातक दर्शन आहे. श्री प्रकाश ख्रिस्तविरोधी असून ते सैतानवाद पसरवत आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरील गंधाचा टिळा मलमूत्रासम असून असे वाटते की, तो त्यांना सैतानानेच लावला आहे."

 

हिंदू धर्माच्या अवहेलनेने व्यथित झालेल्या प्रकाश यांनी आव्हान दिले, त्यावेळी अलेक्झांडर दोर्किनने त्यांना व कुटुंबीयांना 'विदेशी मैला' देखील म्हटले. त्यानंतर गेल्यावर्षी १ नोव्हेंबर, २०१८ ला काही समाजकंटकांनी पोलिसांचे कपडे घालून प्रकाश यांच्या आश्रमावर छापे मारले. उल्लेखनीय म्हणजे तिथल्या पोलिसांनीही प्रकाश यांच्यावर रशियातून पलायन करण्यासाठी व कधीही परत न येण्यासाठी दडपण आणले. पुढे आश्रमाच्या वकिलांनी हा छापा अवैध असल्याचे सिद्ध केले व अलेक्झांडरविरोधातील खटलाही जिंकला. न्यायालयाने यावेळी असेही सांगितले की, "दोर्किनच्या वेबसाईटवरील माहिती वाह्यात असून हा मानहानीचा प्रकार आहे.

 

दरम्यान, हा मुद्दा प्रकाश व त्यांचे सहकारी प्रसून प्रकाश यांनी संयुक्त राष्ट्रांत आणि रशियन संसदेतही उठवला होता. दरम्यान, प्रकाश यांनी रशियातील हिंदू मंदिराच्या उभारणीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र मान्यताप्राप्त १२ मोठ्या स्वयंसेवी संस्थांनी नरेंद्र मोदी तथा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून रशियातील कट्टरवादी अलेक्झांडर दोर्किनला शिक्षा देण्याची व तिथल्या हिंदूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हा विषय रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यापर्यंतही पोहोचला आहे.

 

खरे म्हणजे, 'प्रकाश धाम' हा हिंदू आश्रम रशिया, युरेशिया, युरोप आणि युनायटेड किंग्डममधील हिंदू केंद्रांचा एक समूह आहे. परंतु, याच आश्रमसंस्थेला तिथले ख्रिश्चन कट्टरवादी बदनाम करण्याचे काम करत आहेत. तथापि, सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे इस्लामी वा ख्रिश्चन कट्टरवादी आपापल्या धर्माच्या वर्चस्वासाठी कोणत्याही थराला जात असल्याचेच यातून दिसते. परंतु, डॉ. डेव्हिड फ्रॉली उर्फ वामदेवशास्त्री यांच्या मताप्रमाणे हिंदूंनी कधीही अशांततेचा, अत्याचाराचा पुरस्कार केल्याचे दिसले नाही. हिंदू धर्माच्या याच वैशिष्ट्यामुळे कोणत्याही प्रलोभन, आमिष वा दबावाशिवाय हिंदू धर्माकडे कित्येकांचा ओढा वाढत आहे आणि कट्टरवाद्यांच्या मनात मात्र विखारच विखार दिसत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat