देशात २९६७ वाघांचे अस्तित्व

29 Jul 2019 09:53:31


 ( छायाचित्र प्रविण दौंड ) 


चार वर्षांत व्याघ्र संख्येत ७४१ वाघांची भर



मुंबई ( विशेष प्रतिनिधी) :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय व्याघ्र गणनेचे चौथे (२०१८) अंदाजपत्र सोमवारी सकाळी जाहीर केले. त्यानुसार देशात २९६७ वाघांचा अधिवास आहे. वाघांच्या जगभरातील एकूण संख्येपैकी ७० टक्के संख्या भारतात असल्याचे उघड झाले आहे.  'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'अंतर्गत (एनटीसीए) देशात दर चार वर्षींनी व्याघ्र गणनेचा अंदाज मांडण्यात येतो. त्याानुसार २०१४ मध्ये वाघांची संख्या २२२६ एवढी होती. ज्यामध्ये गेल्या वर्षांत ७४१ वाघांची भर पडली आहे.

 

 

भारतात वाघांचे आश्रयस्थान टिकवून ठेवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेरीस यश मिळाले आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय व्याघ्र गणनेचे अंदाजपत्र पंतप्रधानांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. त्यानुसार गेल्या चार वर्षांत देशामधील वाघांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र तसेच राज्य शासनांच्या वतीने सुरू असणाऱ्या व्याघ्र संवर्धन मोहिमांचे हे फलित आहे. गेल्या काही कालावधीमध्ये वाघांचे संशयास्पद किंवा अपघाती मृत्यू झाले होते. त्यामुळे संरक्षित वनक्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या वाघांच्या एकूण संख्येबाबत काही वन्यजीवप्रेमींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, जाहीर झालेल्या अहवालनुसार भारतात वाघांची संख्या जोमाने वाढत असल्याचे समोर आले आहे.

 

भारतात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे डिसेंबर, २००५ साली 'एनटीसीए'ची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाअंतर्गत व्याघ्र संवर्धनाच्या अंमलबजावणीचे काम पाहिले जाते. तर केंद्र सरकारच्या देहरादुन येथील 'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) या संस्थेकडून वाघांच्या संख्येची गणना केली जाते. ही गणना दर चार वर्षांनी केली जाते. त्यानुसार भारतात २००६ मध्ये १४११, २०१० मध्ये १७६० आणि २०१४ मध्ये २२२६ एवढी वाघांची संख्या होती. आज जाहीर झालेल्या अहवालानुसार भारतात २९६७ वाघांचे वास्तव्य असल्याचा अंदाज आहे. यामध्ये नर, मादी आणि बछड्यांचा समावेश आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0