...आधी केलेचि पाहिजे!

28 Jul 2019 21:38:42




मुंबईत वाहनांची एवढी गर्दी वाढली आहे की, जागा नसल्याने ती कुठेही उभी केली जातात. महापालिकेने अनेक ठिकाणी पार्किंग सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र बेशिस्तपणा अंगी असणारे चालक-मालक रस्त्यातच गाडी उभी करतात. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडतो. यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आणि तो तातडीने अंमलातही आणला. त्यामुळे काही ठिकाणी घुसमटलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. परदेशी यांचा हा तातडीचा निर्णय म्हणजे ’केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे कृतीने दाखवून दिले आहे.

 

मुंबई (अरविंद सुर्वे) : पूर्वीचे एल्फिन्स्टन रेल्वेस्थानक आणि आताचे प्रभादेवी. या स्थानकानजीकच हे आलिशान पार्किंग केंद्र उभारण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभाग कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक, बाजारहाटासाठी येणारे कुटुंबीय, दीपक चित्रपटगृहात चित्रपट बघण्यास येणारी मंडळी आणि ‘इंडिया बुल’ सेंटरमध्ये विविध कार्यालयात येणार्‍या नोकरदार मंडळींसाठी हे पार्किंग केंद्र अतिशय उपयुक्त आहे. या पार्किंग केंद्रामुळे उड्डाण पुलाखाली होणारे बेकायदा पार्किंग बंद झाले आहे. त्यामुळे वाहनांची गती वाढली आहे. ’सोरील इन्फ्रा रिसोर्सेस’ यांच्याकडे पार्किंगचा ठेका असून येथे सुमारे तीन हजारांवर वाहने पार्क होऊ शकतात, असे तेथील ठेकेदाराच्या माणसाने सांगितले.

 

रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

महापालिकेने निर्माण केलेल्या पार्किंग सुविधांच्या पाचशे मीटरच्या परिसरात वाहन उभे केल्यास चारचाकी वाहनांना टोईंगसह सुमारे दहा हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. अवजड वाहनांना दंडात्मक कारवाईची रक्कम त्यांहून अधिक मोठी आहे. वाहन टोचन केल्यापासून जेवढे दिवस विलंब होईल त्याप्रमात विलंबशुल्कात वाढ होणार आहे. शिवाय टोचन केलेल्या वाहनांची महिनाभरात दखल न घेतल्यास ती वाहने बेवारस समजून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची तरतूदही या कारवाईत करण्यात आली आहे.

 

एखाद्याने हौस म्हणून बँकेच्या कर्जातून वाहन खरेदी केले असेल, तर त्या बँकेच्या हप्त्याच्या रकमेपेक्षाही दंडाची रक्कम जास्त होत असेल. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी वाहन रस्त्यात उभे करणे बंद केले आहे. परिणामी दिवसभर वाहनांची वर्दळ आणि वाहतूककोंडीने गुदमरलेल्या रस्त्यांनी आता मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. पालिकेची वाहनतळे बंदिस्त तर आहेतच, पण ती सुरक्षितही आहेत. त्यामुळे वाहन पार्क करून आपण दिवसभर कुठेही जाऊन येऊ शकता.

 

बरे झाले, दंड केले

रस्त्याकडेला उभ्या राहणार्‍या पार्किंगला दंड केला हे बरे झाले. इथे वळणावरच गाड्या उभ्या राहत होत्या. त्यामुळे मागून येणारी गाडी दिसत नसे. परिणामी, अनेकदा अपघात होत होते. आता यामुळे अपघातांची शक्यता तरी मिटली.

- विशाल राणे, स्थानिक नागरिक, प्रभादेवी

 
 

रस्त्यांच्या कडेला होणार्‍या पार्किंगमुळे अरुंद रस्त्यांवरून गाडी चालविणे आधी त्रासदायक ठरत होते. मात्र, आता रस्त्यांशेजारील पार्किंग हटविल्यानंतर रस्ते पूर्वीपेक्षा रूंद झाल्याचे पाहण्यास मिळत असून वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली आहे.

- सुरज दुधवडकर, खासगी बस चालक

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0