चंद्रकक्षा उपग्रहाचे आयुष्य एक वर्षाने वाढणार !

    दिनांक  28-Jul-2019बंगळुरू : 'चांद्रयान-२' हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यानंतर, यातील चंद्रकक्षा उपग्रहाचे आयुष्य आणखी एक वर्षाने वाढविण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी तयारी सुरू केली आहे. या उपग्रहाचे आयुष्य आधी एक वर्षासाठी निर्धारित करण्यात आले होते. ते आता एक वर्षासाठी वाढवले जाऊ शकते.

 

या मोहिमेवर काम करणार्‍या वैज्ञानिकांच्या मते, वर्तमान स्थिती पाहता चंद्रकक्षा उपग्रहाचा कालावधी आणखी एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. याआधी इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले होते की, “चंद्रकक्षा उपग्रह फक्त एक वर्षच काम करेल. 'चांद्रयान-२' मोहिमेशी संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-१' ची निर्मिती जास्त काळ काम करेल, अशा प्रकारे करण्यात आली होती, पण ऊर्जा परिवर्तक केंद्रात आलेल्या अडचणीमुळे त्याचा कालावधी लवकर संपला. 'चांद्रयान-२'ची निर्मिती करताना हा अडथळा दूर करण्यात आला आहे. 'चांद्रयान-२' मध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ काम करण्यासाठी इंधन उपलब्ध आहे.”

 

चंद्रकक्षा उपग्रहाचे प्रक्षेपण करताना त्यात १,६९७ किलोग्रॅम इतके इंधन होते. २४ आणि २६ जुलै रोजी त्यात १३० किलोग्रॅम अतिरिक्त इंधन भरण्यात आले. शनिवारी यात १,५०० किलोग्रॅम इतके जास्तीचे इंधन शिल्लक होते. प्रक्षेपण अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने झाल्याने, ४० किलो इंधनाची बचत झाल्याचे इस्रोच्या एका वैज्ञानिकाने सांगितले.

 

सुरुवातीच्या नियोजनानुसार, चंद्रकक्षा उपग्रहामधील अतिरिक्त इंधन आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ठेवण्यात आले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार त्यात एक वर्षापेक्षा अधिक काम करता येईल, इतके इंधन शिल्लक आहे. चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी 'चांद्रयान-२' ची कक्षा नऊ वेळा विस्तारित केली जाईल. यासाठी चंद्रकक्षा उपग्रहातील इंधनाचा वापर केला जाईल. 'चांद्रयान-२' ची कक्षा बदलल्यानंतर त्यात २९०.२ किलोग्रॅम इंधन आवश्यक आहे. मात्र, 'चांद्रयान-२' मध्ये सध्या इतके इंधन आहे की, ते चंद्राच्या कक्षेत दोन वर्षे फेरी मारू शकणार आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat