'स्पॅरोमॅन ऑफ इंडिया'

    दिनांक  28-Jul-2019   


 


चिमण्यांच्या संरक्षणासाठी आजवर तब्बल ९० हजारांहून अनेक घरट्यांचे वाटप करणार्‍या जगत किनखाबवाला यांचा प्रयोग १० टक्के जरी यशस्वी झाला, तर त्यांच्या कामाचे चीज झाले, असे ते समजतात.

 

माझ्या बालपणी घरात जेव्हा चिमणी यायची तेव्हा आई लगेच पंखा बंद करायची. पंख्याला लागून तिला इजा होणार नाही, याची काळजी नेहमी ती घेत असे. चिमणीने आमच्या घरात घरटे बांधले होते. दिवसभर तिची चिवचिव आम्हाला घरात कायम सोबत वाटायची. आम्ही घरी नसू त्यावेळेस आई घराची एक खिडकी उघडी ठेवायची. तिला ये-जा करताना अडचण होऊ नये याची काळजी घरातल्या प्रत्येकाला असायची...” स्पॅरोमॅन जगत यांचे शब्द ऐकणार्‍याला त्या काळात घेऊन जातात आणि त्यांची चिमण्यांबद्दल वाटणारी ओढ दिसून येते. ज्या काळात माणसं माणुसकी दाखवण्यास कचरतात, त्या काळात या अवलियाने 'हे विश्वची माझे घर!' अशी साद घालत परिसरातील मुक्या प्राण्यांना जीव लावत जगत आपले सत्कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना देशभरात 'स्पॅरोमॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळख़ले जाते. चिमण्यांसाठी काम करताना त्यांनी आजवर ९० हजार घरट्यांचे वाटप केले आहे. “यातील १० टक्के घरट्यांचा उपयोग जरी झाला तरी मी माझे कार्य सिद्धीस गेले असे समजतो,” असे ते म्हणतात.

जगत किनखाबवाला यांनी फायनान्समध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक वाणिज्य कंपन्यांसह काम केले. या क्षेत्रात यशाच्या उच्च शिखरावर असतानाही त्यांना वेगळे काहीतरी करण्याच्या वाटा खुणावत होत्या. आजही ते अनेक कंपन्यासाठी, सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. मात्र, त्यांची ओळख ही 'स्पॅरोमॅन' अशीच आहे. जगत यांनी स्वतःला या कामात वाहून घेतले आहेच मात्र, त्यांनी अनेकांना या कामाची माहिती करून देत त्यांना पर्यावरणासाठी काम करण्याचे प्रोत्साहनही दिले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आजवर अनेकांनी चिमण्या आणि इतर पक्ष्यांच्या संवर्धनाचा वसा उचलला आहे. झपाट्याने बदलणार्‍या जीवनशैलीत निसर्गाप्रति आपले दायित्व मानत या कामात किमान खारीचा वाटा उचलावा, असा अट्टाहास ते करत असतात.

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात लहानाचे मोठे झालेल्या जगत यांनी आपल्या निवृत्तीच्या वयात एका नव्या क्षेत्राची सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वीही झाले. निवृत्तीनंतर इतरांप्रमाणे उर्वरित आयुष्य विश्रांती करण्यात घालवण्यापेक्षा तरुणांनाही लाजवेल, अशा नव्या स्फुर्तीने त्यांनी हे नवे काम सुरू केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर एकदा नजर फिरवल्यास 'वय' हा एक 'आकडा' आहे, असाच भास होतो. जगत यांनी आपल्या घराबाहेरील लहानशा परिसरातही चिमण्या आणि इतर पाखरांसाठी घरटी बांधली आहेत. पक्ष्यांना आवडतील, त्यांना खाण्यासाठी टपोरे दाणे मिळतील, अशा वृक्षांची लागवड केली आहे. दिवस सुरू झाल्यावर त्यांच्या किलबिलाटांनी जाग येते आणि मग सायंकाळी दिवस मावळेपर्यंत चिवचिवाट कायम असतो.

२००८ मध्ये एका विमान प्रवासादरम्यान त्यांनी एका मासिकात शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे मानवाच्या सहवासात राहणार्‍या पक्ष्यांच्या कमी होत असलेल्या संख्येबद्दल एक लेख वाचला. त्यांनी विमानातील कर्मचार्‍याकडे ते मासिक मागून घेतले. त्यानंतर त्यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला. बर्‍याच गोष्टींचा शोध घेतल्यानंतर उघड झालेली माहिती धक्कादायक होती. मोबाईलसारख्या उपकरणांचा अतिवापर, वायफाय आणि तत्सम लहरी आदींचा जैवविविधतेवर होणारा परिणाम यामुळे होत चाललेला पर्यावरणाचा र्हास या बाबी उघड होत गेल्यावर त्यांना प्रचंड वेदना झाल्या. ज्या पक्ष्यांच्या सहवासात आपले बालपण गेले, त्यांना नकळतपणे आपल्या बदलत्या जीवनमानात आपण किती दूर लोटले आहे, याची जाणीव त्यांना झाली. यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना झाली होती. जनजागृती करण्याचा विचारही मनात आला. परंतु, स्वतःमध्ये आधी बदल घडवायचा असा निश्चय त्यांनी केला. त्यानुसार घरातील अंगण आणि परस या भागात पाखरांसाठी मातीची घरटी, तसेच फळझाडे लावली. त्यांना पिण्यासाठी पाणी, बर्डफिडर लावले. त्यांच्या घराबाहेर आता एकूण २६ प्रजातींच्या चिमण्या दररोज येतात.

आता गरज होती, एका जनअभियानाची... ते त्यांच्या मित्राच्या ओळखीने 'शांती एशियाटिक स्कूल' येथे गेले आणि आपल्या कामासाठी पुढील दिशा त्यांना याच ठिकाणी मिळाली. आपले एखादे काम देशाच्या भावी पिढीला आपण सांगितले, तर ते ती ऐकेल आणि बदल नक्कीच घडेल, असा जगत यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी उद्याच्या पिढीवर विश्वास ठेवत आपले काम सुरू केले. शाळेच्या व्यवस्थापकांशी बोलून त्यांनी एका संमेलनाचे आयोजन केले. त्यात पक्ष्यांना मानवी हस्तक्षेपामुळे येणार्‍या अडचणींवर त्यांनी प्रकाश टाकला. मुलांना घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. बघता बघता हा उपक्रम शहरात खूप प्रसिद्ध झाला. त्यांना अनेक शाळांना स्वतःहून या कार्यक्रमासाठी बोलावणे पाठवले. एका खासगी 'एफ वाहिनी'च्या मदतीने एक कार्यक्रम केला. त्यात १८०० मुलांनी त्यांच्या पालकांसह सहभाग घेतला होता.

आपण आपल्या विकासाबरोबर आपली अन्नसाखळी विसरत चाललो आहोत. पशू-पक्षी आपल्या पर्यावरणातील अविभाज्य घटक आहेत. तुमच्या परिसरात एखाद्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे तसे दुर्मीळच होत चालले आहे. त्यांच्यासाठी अन्नपाण्याची सोय तरी किमान प्रत्येकाने केल्यास भरपूर होईल. अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पक्षी मानवाला हानिकारक अशा कीटकांना खाऊन आपल्याला सुरक्षित ठेवतात. अशा प्रजाती नाहिशा झाल्यास धोका आपल्यालाच आहे. म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी किमान प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करावेत,” असा संदेश ते कायम इतरांना देत असतात. आपल्या संपूर्ण कार्याला त्यांनी एका 'सेव्ह दी स्पॅरो' या पुस्तकरुपात मांडले आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना गुजरात सरकारतर्फे गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या पुस्तकाची दखल घेत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी पक्षी संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्यास दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे शुभेच्छा...!

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat