जगातील 'सर्वोत्तम' अपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात

27 Jul 2019 18:32:57



नवी दिल्ली : अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून भारतीय हवाई दलाला शनिवारी अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सची पहिली तुकडी सोपविण्यात आली. यात चार हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. आणखी चार हेलिकॉप्टर्सची दुसरी तुकडी पुढील आठवड्यात हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. भारताने बोईंक कंपनीकडे चार वर्षांपूर्वी २२ अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी नोंदणी केली होती. त्यातील चार हेलिकॉप्टर्स आज प्राप्त झाले असून, ते एएच-६४ ई या श्रेणीतील आहेत.

 

चार हेलिकॉप्टर्सची दुसरी तुकडी अमेरिकेहून रवाना झालेली आहे. पुढील आठवड्यात ती भारतात दाखल होईल. त्यानंतर हे आठही हेलिकॉप्टर्स पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर आणण्यात येतील आणि नंतर त्यांचा हवाई दलात औपचारिक समावेश केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय हवाई दलाने सप्टेंबर २०१५ मध्ये २२ अपाचे हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी बोईंगसोबत करार केला होता. हा संपूर्ण व्यवहार ४,१६८ कोटी रुपयांचा आहे, असे सूत्रांनी सांगितले.

 

काय आहेत वैशिष्ठे?

 

- एएच - ६४ अपाचे हेलिकॉप्टर जगभरात युद्धासाठी वापरले जाणारे मल्टी रोल हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते.

 

- गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन सैन्या या हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. परंतु आता या हेलिकॉप्टर्सचा वापर करणाऱ्या देशांची संख्या वाढली आहे.

 

- सध्या कंपनीने अन्य देशांना २ हजार १०० आपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे.

 

- १९८४ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आले.

 

- सध्या भारत रशियाने तयार केलेली एमआय ३५ हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. परंतु आता ही हेलिकॉप्टर्स सेवेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत.

 

- शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करण्याच्या दृष्टीने या हेलिकॉप्टरचे डिझाइन करण्यात आले आहे.

 

- इस्त्रायलदेखील लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवायांदरम्यान या हेलिकॉप्टरचा वापर करतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0