खुशखबर : आता इलेक्ट्रिक वाहने स्वस्त

27 Jul 2019 16:54:03



नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी होणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. हा निर्णय १ ऑगस्ट २०१९ पासून अमलात येणार आहे.

 

इलेक्ट्रिक बस भाड्याने घेतल्यास त्यावरील कर स्थानिक संस्थांना माफ करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरवरील करही १८ टक्के न राहता आता ५ टक्के होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची ३६ वी बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीला विविध राज्यांचे अर्थमंत्री तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी कपात करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पातून सादर केला होता. अर्थसंकल्प ५ जुलैला सादर झाल्यानंतर ही जीएसटी परिषदेची पहिलीच बैठक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0