अंबरनाथ, बदलापूरला मुसळधार पावसाने झोडपले

    दिनांक  27-Jul-2019अंबरनाथ : शुक्रवार सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने अंबरनाथसह बदलापूरला झोडपून काढले असून त्यामुळे दोन्ही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवार २६ जुलै रोजी सकाळपासून धुडगूस घालणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याबरोबरच लोहमार्गात पावसाचे पाणी साठल्याने शुक्रवारी रात्री रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, त्याचा फटका कामावरून घरी येणाऱ्यांना चांगलाच बसला. मुसळधार पावसाने १४ वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीच्या आठवणी जाग्या झाल्या.

 

बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीने पाण्याची धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकिनारी असलेल्या अनेक इमारती आणि घरांत पावसाचे पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले होते. हेंद्रे पाडा, बॅरेज रस्ता, सानेवाडी, वैशाली सिनेमागृह आदी ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नगराध्यक्ष ऍड. प्रियेश जाधव, शहरप्रमुख वामन म्हात्रे, नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी अश्या सूचना दिल्या.

 

शिवमंदिरात पाणी

 

अंबरनाथला देखील मुसळधार पावसाने झोडपल्याने शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीला महापूर आला होता, पुराचे पाणी मंदिरात शिरल्याने महादेवाची मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली, पावसाचे पाणी स्वामीनगरसारख्या ठिकाणी आल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले, शिवाजी चौक, रेल्वे स्थानकातील तिकीट बुकिंग कार्यालय, विमको नाका याठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार प्रकार घडले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat