शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक ट्रस्ट उचलणार

26 Jul 2019 14:01:20


 

 
मुंबई : भारतीय लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा केजी टू पीजीपर्यंतचा शैक्षणिक खर्च मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. या बरोबरच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी पुण्यात कार्य करणाऱ्या 'क्वीन मेरी' या संस्थेला न्यासाने २५ लाखांचा धनादेशही दिला.
 
 

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाने आणखी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. आज २६ जुलैला देशभरात साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहीद जवानांच्या मुलांच्या 'केजी टू पीजी' शिक्षणाचा खर्च उचलण्याचा हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

 

यापूर्वीदेखील तिवरे धरण दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्यांची घरे आणि गावातील शाळादेखील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट बांधून देण्याचा निर्णय झाला आहे.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
Powered By Sangraha 9.0