असले माजवादी ठेचायलाच हवेत...

26 Jul 2019 21:36:09


 


'समाजवादा'च्या नावाखाली 'माजवादा'ची ही परंपरा समूळ नष्ट व्हायला हवी आणि त्यासाठी आझम खानसारखे विखारी सर्प सर्वप्रथम ठेचायला हवेत.


आझम खान. हे केवळ एका व्यक्तीचं नाव नसून ही एक प्रवृत्ती आहे. 'माझं नाव-आडनाव, जात-धर्म, पक्ष, प्रदेश ऐकल्यावर माझं कुणीही, काहीही वाकडं करू शकणार नाही आणि मी कुणाचंही काहीही वाकडं करू शकतो,' असा माज नसानसांत भिनलेली प्रवृत्ती म्हणजे आझम खान. अशी प्रवृत्ती अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींत आढळते. परंतु, आपण ज्या व्यक्तीला 'आझम खान' म्हणून ओळखतो, ती व्यक्ती या प्रवृत्तीचा गाळीव अर्क म्हणता येईल. वयाच्या ७० व्या वर्षी, डोक्यावरील केस पांढरे होतात ते अनुभव आणि शहाणपणामुळे, असं मानलं जातं. जीवनाच्या या टप्प्यात माणूस सौम्य, समंजस, संयमी होतो. परंतु, 'आझम खान' नामक व्यक्ती वयाच्या ७०व्या वर्षी अधिकच निर्लज्ज, मग्रूर आणि उन्मत्त झालेली दिसते. वास्तविक, हे महाशय ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचं नाव 'समाजवादी पक्ष.' हा पक्ष राममनोहर लोहियांसारख्या महान, तत्त्वनिष्ठ-ध्येयनिष्ठ नेत्यांचा वारसा सांगतो. परंतु, प्रत्यक्षात हा पक्ष गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांनी पूर्णतः बरबटलेला आहे. पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वापासून ते पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत. लोहिया, समाजवाद यांच्याशी या पक्षाचा नावालाही संबंध नाही. जनता दल, लोक दल, जनता दल (सेक्युलर) अशा अनेक पक्षांतून प्रवास करून 'आझम खान' नामक व्यक्तिमत्त्व समाजवादी पक्षात स्थिरावलं आणि अधिक 'विकसित' झालं. गेल्या दहा-पंधरा वर्षांत तर हे व्यक्तिमत्त्व नको तितकं जास्त विकसित झालं आहे. भ्रष्टाचार-गुन्हेगारीचे असंख्य आरोप, महिलांप्रती संतापजनक वक्तव्यं आणि जातीयवादी भूमिका यापैकी कशाचीही या महाशयांकडे कमी नाही. गुरुवारी लोकसभेत बोलताना त्यांनी भाजप खासदार रमा देवी यांच्याविषयी जे काही उद्गार काढले, ते कोणत्याही सुजाण-सुसंस्कृत नागरिकाला चीड आणणारे आहेत. “तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं,” असं वाक्य आझम खान लोकसभेत बोलून गेले. विशेष म्हणजे, रमादेवी त्यावेळी अध्यक्षस्थानी बसलेल्या होत्या आणि याही गोष्टीचं भान खान यांना राहिलं नाही.

 

आझम खान १९८० पासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहेत. असं असतानाही त्यांनी लोकसभा अध्यक्षस्थानी बसलेल्या व्यक्तीबाबत, तेही तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना, इतक्या खालच्या स्तरावरील टिप्पणी करणं, हे समाजवादी पक्ष आणि पक्षाची संस्कृती किती खालच्या दर्जावर पोहोचली आहे, याचंच दर्शन घडवतं. महिलांबाबत अशी वक्तव्यं करणं आझम खान यांच्यासाठी नवीन नाही. अभिनेत्री व माजी खासदार जया प्रदा यांच्याविषयी त्यांनी वारंवार केलेली वक्तव्यं तर कुणाचीही मान शरमेनं खाली जाईल, अशीच आहेत. २००९ मध्ये जया प्रदा यांची खान यांनी 'नाचनेवाली' अशा शब्दांत खिल्ली उडवली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान खान जया प्रदा यांच्याविषयी जे काही बोललेत, ते इथे लिहिताही येणार नाही, इतकं अश्लील होतं. बरं, हे सगळं कुठे खासगीत बोललं गेलेलं नसून भर सभांतून बोललं गेलं आहे. भारतीय सैन्यदल आणि महिलांबाबतही हा मनुष्य असंच बरळला होता. 'कारगिलमध्ये हिंदूंनी नाही तर मुस्लीम सैनिकांनी पराक्रम गाजवला', 'मुस्लिमांनो, मुझफ्फरनगर दंगलीचा बदला घ्या', 'ताजमहाल पुरातत्त्व विभागाकडून काढून वक्फ बोर्डाला द्या' इ. आणि अशी असंख्य वक्तव्यं आणि वाद यांतूनच आझम खान यांची राजकीय कारकीर्द घडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही अनेकदा खालच्या स्तरावर जाऊन ते बोलले आहेत.

 

आता या अशा माणसाला गांभीर्याने घ्यायची गरजच काय, असाही प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो. आझम खान हा कोणी किरकोळ माणूस असता तर त्याला गांभीर्याने घ्यायची निश्चितच गरज नव्हती. परंतु, हा माणूस चाळीस वर्षं उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय आहे. १९८० पासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडला जातो आहे.उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील राज्यात मंत्री, विरोधी पक्षनेता राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मतदारसंघाचं नाव 'रामपूर' आहे! समाजवादी पक्षातील आघाडीच्या नेत्यांमध्ये खान यांची गणना होते. पक्षाचा मुस्लीम चेहरा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्थावर-जंगम संपत्तीबाबत न बोललेलंच बरं. त्यामुळे आझम खानसारख्या व्यक्तींना गांभीर्याने घेणं भाग पडतं. कारण, एवढ्या वरिष्ठ स्तरावरील व्यक्ती इतक्या खालच्या स्तरावर विचार करणारी निघते, तेव्हा ती व्यक्ती न राहता प्रवृत्ती बनायला वेळ लागत नाही. समाजवादी पक्षासारख्यांनी जी प्रवृत्ती पोसली, वाढवली त्याचीच ही फळं आहेत. भारतीय राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून गणना होणारे मुलायमसिंह यादव हे या पक्षाचे संस्थापक. २०१२ मधील दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर 'लडके गलती कर सकते है..' असं सहजपणे म्हणून जाणारे मुलायमसिंह या पक्षाचे संस्थापक. मुस्लीम आणि यादव मतांचं ध्रुवीकरण करणं, त्यासाठी समाजाचे अनेक प्रश्न धगधगते ठेवणं, अफाट पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर स्थानिक राजकारण आपल्या हातात ठेवणं आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्याच्या जोरावर केंद्रीय राजकारणात सौदेबाजी करणं, असे गलिच्छ डावपेच खेळत हा पक्ष वाढला आहे आणि आझम खानसारखी माणसंदेखील. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने समाजवादी पक्षाला पहिला दणका दिला आणि २०१९ मध्ये दुसरा. परंतु, तेवढ्यावर भागणार नाही.

 

'समाजवादा'च्या नावाखाली 'माजवादा'ची ही परंपरा समूळ नष्ट व्हायला हवी आणि त्यासाठी आझम खानसारखे विखारी सर्प सर्वप्रथम ठेचायला हवेत. रमा देवी यांच्याबाबतच्या वक्तव्याच्या विरोधात लोकसभेत ज्याप्रकारे महिलाशक्ती एकवटली, निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणींसह अनेक महिला नेत्यांनी या प्रकरणात ज्याप्रकारे आक्रमक आणि ठाम भूमिका घेतली, ते निश्चितच सकारात्मक आहे. त्याचं अभिनंदन व्हायलाच हवं. आझम खान यांची थोडी अधिक 'सोफेस्टिकेटेड' आवृत्ती म्हणजे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी. हे महाशय उत्तम वक्ते आहेत, मुद्देसूद बोलतात किंवा तसा भास तरी निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. परंतु, त्यांची आणि त्यांच्या पक्षाची कट्टर आणि विखारी अशी कट्टर इस्लामवादी भूमिका देशवासीयांपासून लपून राहिलेली नाही. तिहेरी तलाकबाबत बोलताना त्यांनी विवाह म्हणजे इस्लाममध्ये केवळ एक कॉन्ट्रॅक्ट असल्याचा शोध लावला. ओवेसींचं या अशा युक्तीवादांच्या आडून आपली धर्मांध भूमिका पुढे रेटणं आता सर्वांना ठाऊक झालेलं आहे. या 'कॉन्ट्रॅक्ट थिअरी'चा भाजपच्या अनेक सदस्यांनी जोरदार समाचार घेतला, हेही बरंच झालं. अशा या आझम, ओवेसी प्रवृत्तींचा सध्या येत असलेला अनुभव पाहता, अटलजींच्या वाक्यांत थोडासा बदल करून असं म्हणावं लागेल की, “सरकारं येतील, जातील. पक्ष बनतील, फुटतील. पण ही माजवादी प्रवृत्ती ठेचली जायला हवी.” तरच हा देश पुढे जाईल आणि भविष्यात अशा कोणा आझम खानाची देशाच्या कायदेमंडळाच्या अध्यक्षस्थानी बसलेल्या व्यक्तीबाबत एक शब्दही उलटसुलट बोलण्याची हिम्मत होणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0