गड्या आपुला देश बरा...

26 Jul 2019 22:36:18



अंधश्रद्धेमुळे जगभरात अनेक जणांचा बळी जातो. अज्ञान, भीती वगैरेही कारण असली तरी अंधश्रद्धेच्या पोटी बळी जाणारी नेहमी लहान मुलं, महिला नाहीतर वृद्धच असतात, हे मात्र जगभरातले वैशिष्ट्य आहे.


स्वतःच्या मुलीचा खून केला म्हणून त्या एंजेलाला न्यायालयाने २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. या महिलेने ३ वर्षांच्या निष्पाप मेयाला, आपल्या मुलीला उन्हात तापलेल्या कारमध्ये ठेवले. किती वेळ? तर तब्बल १० तास. या दरम्यान या मुलीला अन्न-पाणी वगैरे काही दिले गेले नाही. मेया उन्हाच्या चटक्यांनी, भुकेने तहानेने व्याकुळ होऊन मेली. मेया मरत असताना तिच्या आईने एंजेलाने तिला वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. का? तर मेयाच्या आईचे म्हणणे आहे की, तिला मेयाला मारायचे नव्हते, तर तिला भुतांना मारायचे होते. जी मेयाच्या जवळ असत. ती भुतं मेयाला तिच्या आईपासून दूर करत होती म्हणे, म्हणून भुतांना त्रास देण्यासाठी त्यांना पळवून लावण्यासाठी मेयाच्या आईने मेयाला तापलेल्या कारमध्ये १० तास ठेवले होते. कुठली घटना असावी? आणि कधीची घटना असावी ही? बहुतेकांचे म्हणणे असेलच की, कुठची काय? ही भारताच्या कोणत्या तरी राज्यातली घटना असावी आणि तीही खूप वर्षांपूर्वीची. मात्र, ही घटना आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधली. २०१७ साली घडलेल्या या घटनेतील आरोपी एंजेलाला आता न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

 

अंधश्रद्धेमुळे जगभरात अनेक जणांचा बळी जातो. अज्ञान, भीती वगैरेही कारण असली तरी अंधश्रद्धेच्या पोटी बळी जाणारी नेहमी लहान मुलं, महिला नाहीतर वृद्धच असतात, हे मात्र जगभरातले वैशिष्ट्य आहे. जगाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर जाणवते की, युरोप खंडाला अंधश्रद्धेचे माहेरघरच म्हणायला हवे. सत्तालालसेपायी आणि अवास्तव धर्मविस्तारापायी इथे कित्येकांचा बळी गेला. रोमन कॅथलिक चर्चचा फतवा तर या अशा बळी घेण्यामध्ये अग्रक्रमाने होता. बायबल वाक्य प्रमाण मानणार्‍यांनी बायबलचे चांगले विचार घेतले, हे ठिकच होते. मात्र, बायबलच्या एखाददुसर्‍या वाक्याचा अर्थ लावून १४व्या शतकाच्या उत्तरार्धात ते १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लाखो महिलांना चेटकीण ठरवून जिवंत जाळण्याचे प्रकारही युरोपमध्ये घडले. या महिलांना, मुलींना ज्या प्रकारे छळ करून जाळले गेले, मारले गेले, त्याची तुलना नाझींनी ज्यूंच्या केलेल्या कत्तलीशीही होणे शक्य नाही. पारंपरिक भयकथेमध्ये चेटकीण कुरूपच असते, तर अशाप्रकारे पारंपरिक युरोपियन्सपेक्षा वेगळ्या दिसणार्‍या त्यातल्या त्यात कुरूप आणि गरीब असणार्‍यांना सरळसरळ चेटकीण ठरवले गेले. यामध्ये काही पुरुषांनाही चेटूक करणारे ठरवले गेले. ते ठरवणार कोण? तर रोमन कॅथलिक चर्चचे सर्वेसर्वा. या चेटकीण किंवा चेटूक करणार्‍या पुरुषांना शिक्षाही इतक्या कू्रर दिल्या जायच्या की, त्यापेक्षा त्यांना मरण परवडत असे. मात्र, चेटकीण ठरवलेल्या महिलेने जर सिद्ध केले की, ती चेटकीण नाही तर तिला जीवदान मिळू शकत असे. पण, आपण चेटकीण नाही, हे कुणीही चेटकीण ठरवली गेलेली स्त्री सिद्ध करूच शकली नाही. कारण तिला नदी, सरोवरामध्ये फेकले जायचे. जर ती पाण्यावर तरंगली तर ती चेटकीण आणि ती न तरंगता पाण्यात बुडून मेली तर ती चेटकीण नाही. अन्याय, अत्याचाराचे घोर कलियुग होते ते.

 

अर्थात गॅलिलिओने ज्यावेळी दुर्बिणीचा शोध लावला, तेव्हा त्याच्यावरही इथल्या धर्मसत्तेने सैतानाची नजर बनवली म्हणून त्याला गुन्हेगार ठरवले होते. पाश्चिमात्त्य संस्कृतीमध्ये भूतप्रेत, चेटकीण वगैरे प्रथांना आता आतापर्यंत मान्यता होती. स्कॉटलंडमध्ये १९६५ साली हेलेन डंकन ही १७३५ सालच्या विचक्राफ्ट अॅक्टनुसार तुरुंगात शिक्षा भोगत होती. तिच्यावर आरोप होता की, ती चेटूक करते. मात्र, अंधश्रद्धाळू भारतात मात्र याचवेळी मेवाडमधल्या राजाने चेटकीणविरोधी कायदा बंद केला होता, हे विशेष. असो, अशीही एक बातमी आहे की, आर्यलंडच्या अमांडा टिग्यू नावाच्या ४५ वर्षांच्या महिलेने ३०० वर्षांपूर्वीच्या टिग्यूच्या आत्म्याशी थोडक्यात भूताशी लग्न केले आहे. भूताशी लग्न करावे की काय, असा कायदा अजून झालेला नाही. त्यामुळे तिच्यावर कारवाई करता येत नाही. तसेही फ्रान्स, चीन आणि सिंगापूर येथे मृत व्यक्तीशी विवाह करता येतो. तसेच चेटकीण कायदा आजही आयर्लंड, पॅलेस्टाईन, इस्रायलमध्ये आहे. फक्त त्याचे रूप बदलले आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे पाहताना एका अंधश्रद्धेचाही विचार करायला हवा, आंतरराष्ट्रीय स्तरावर रोमन कॅथलिक चर्चचे पोप एखाद्याला संतत्व बहाल करतात, तेव्हा निकष कोणते असतात? तर त्या व्यक्तीने आयुष्यात किंवा मृत्यूनंतरही किमान दोन चमत्कार करायला हवेत. अंधश्रद्धाळू कोण याचा विचार करताना वाटते, गड्या आपुला देश बरा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0