मराठमोळा लढवय्या अधिकारी

    दिनांक  26-Jul-2019   


 


नुकतीच भारताच्या उपलष्करप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती जाहीर झाली. त्यानिमित्ताने या मराठमोळ्या लढवय्या सैन्याधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...


मराठ्यांच्या शौर्यगाथेचा इतिहास साक्षीदार आहेच. नुकतीच भारताच्या उपलष्करप्रमुखपदावर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती झाली. लष्कराच्या इतिहासात प्रथमच एका मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे उपलष्करप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लष्करी कामाचा दांडगा अनुभव असलेला माणूस, अशी त्यांची ओळख असल्याने लष्करातील अनेक मराठी तरुणांचा ते आदर्श मानले जातात. जम्मू-काश्मीर येथील दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडण्यासह ईशान्येत प्रस्थापितांविरोधात बंड उगारण्यासाठी सशस्त्र लढा देणाऱ्या बंडखोरांविरोधांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. मूळ पुण्याच्या असलेल्या नरवणे यांनी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. शालेय वयापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या नरवणे यांनी बालपणातच देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण करण्याचे ध्येय ठेवले होते. अभ्यासासह ते शाळेत इतर खेळांमध्येही पारंगत होते, अशी आठवण त्यांचे बालमित्र नेहमी सांगत असतात. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली होती. देहरादूनच्या लष्करी अकादमीतून त्यांनी पुढील प्रशिक्षण घेतले. चेन्नई विद्यापीठातून त्यांनी संरक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संरक्षण क्षेत्रात एम.फीलचीही पदव्युत्तर पदवी घेतली. इंदौरमधून देवी अहिल्या विश्वविद्यालयातून मॅनेजमेंट स्टडिजचे शिक्षण पूर्ण केले.

 

७ जून, १९८० रोजी सातव्या शीख बटालीयनमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आजवरच्या कारकिर्दीमध्ये जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील त्यांच्या कारवाया लक्षणीय ठरल्या आहेत. ईशान्य भारतात कामगिरी करत असताना ते 'आसाम रायफल्स'चे प्रमुख होते. काश्मीर खोऱ्यात पायदळ ब्रिगेडचे नेतृत्व त्यांनी केले होते. आर्मी वॉर महाविद्यालयात ते प्रशिक्षकही होते. दिल्ली विभागासाठी जनरल ऑफिसर कमांडिंग आणि विसावे जनरल कमांडर इन चीफ, आर्मी ट्रेनिंग कमांडर, म्यानमारमध्ये भारताचे डिफेन्स अटॅच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पुण्यात राहणाऱ्या नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे वायुदलातील निवृत्त अधिकारी आहेत, तर त्यांची आई सुधा नरवणे या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदिका होत्या. पत्नी वीणा यांचे शैक्षणिक कार्यात विशेष योगदान आहे. गेली २५ वर्षे त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. वीणा यांनीही देशाप्रति आपले दायित्व मानत सैनिकांच्या पत्नींसाठी कार्यरत असणाऱ्या 'आर्मी वाईफ्ज वेलफेअर असोसिएशन' आर्मी ट्रेनिंग कमांडच्या (एआरटीआरएसी) प्रादेशिक अधिकारी म्हणून त्या काम पाहतात. नरवणे यांच्या नेतृत्वातील अनेक यशस्वी मोहिमांमुळे एकलष्करी कामाचा दांडगा अनुभवी व्यक्ती देशाला उपलष्करप्रमुख म्हणून लाभल्याबद्दल त्यांचे देशभरातून विशेषतः महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात योगसाधना करणे, बागकाम आणि चित्रकला आदी छंद ते जोपासतात.

 

त्यांचे वडील वायुदलात आणि आई शैक्षणिक क्षेत्रात असल्याने पराक्रम आणि व्यासंग या दोन्ही गुणांचे संस्कार नरवणे यांच्यावर झाले. अतिशय शांत स्वभाव आणि दूरदृष्टी लाभलेला एक अनुभवी अधिकारी अशी नरवणे यांची ख्याती आहे. सैन्यात भरती झालेले मराठी तरुण आणि भरती होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लाखो तरुणांचे ते आदर्श आहेत. जिथे संधी मिळेल त्यावेळी आपल्या सैन्यदलातील प्रत्येक जवानाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम ते आवर्जून करतात. आपले सैन्य आता अधिक चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय सैन्याकडे आता पूर्वीपेक्षाही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत आणि आपल्या सैन्याची हिंमत इतर कुठल्याही सैन्यापेक्षा सर्वात जास्त आहे, असे सांगत ते सैनिकांचा आत्मविश्वास द्विगुणित करतात. जेव्हा जेव्हा भारतीय सैन्यदलाला संधी मिळाली आहे, त्या त्या वेळेस सैन्यदलाने आपली योग्यता सिद्ध केली आहे. आपल्या सैन्यदलावर नरवणे यांना प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या या नेतृत्वशैलीमुळेच ते या पदापर्यंत पोहोचू शकले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षी 'परम विशिष्ट सेवा पदक,' २०१५ मध्ये 'सेना पदक' आणि 'विशिष्ट सेवा पदक' आदी पदकांचाही समावेश आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतर सर्वाधिक अनुभवी असलेला लष्करी अधिकारी म्हणून त्यांची सैन्यदलात ओळख आहे. ७ जून, १९८० रोजी लष्करात सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर १९८२ मध्ये ते लेफ्टनंट झाले. १९८५ मध्ये कॅप्टन, १९९१ मध्ये मेजर, २००२ मध्ये लेफ्टनंट कर्नल, २००५ मध्ये कर्नल, २०१० मध्ये ब्रिगेडिअर २०१३ मध्ये मेजर जनरल आणि २०१५ मध्ये लेफ्टनंट जनरल ते आता उपलष्करप्रमुख असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे. असा हा मराठमोळा कर्तव्यदक्ष अधिकारी देशाच्या लष्करप्रमुखपदावरही विराजमान व्हावा, अशी सदिच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat