'पापस्ताना'तील धर्मांतराची पिल्लावळ

    दिनांक  25-Jul-2019   


 


'पापस्ताना'तील हिंदू धर्मीयांची दुरवस्था अगदी १९४७ सालापासूनच होत आली. जो जो हिंदू 'पापस्ताना'तील नापाक कट्टरपंथीयांच्या नजरेला पडेल, तो तो हिंदू संकटाच्या खाईत कोसळणार, हे निश्चितच. हा सिलसिला गेल्या ७० वर्षांपासून सुरू आहे आणि आजही 'पापस्ताना'तील हिंदू पुरुषांसह बालके, मुली-महिलांवर अन्याय-अत्याचार होतच असतात. त्यात स्त्रियांची स्थिती तर सर्वाधिक भीषण.

 

इमरान खान अमेरिकेच्या दौर्‍यावर असतानाच 'पापस्ताना'तील एक प्रकरण उघडकीस आले, जे वाचून-ऐकून कोणाही संवेदनशील व्यक्तीचे रक्त उसळू शकेल. 'पापस्तान'च्या सिंध प्रांताच्या धरकी शहरातील अब्दुल खालिक मिथा या मौलवीशी संबंधित हे प्रकरण आहे. हिंदूंसाठी खलनायक झालेल्या मौलवी अब्दुल खालिक मीथाने नुकतेच मोठ्या अभिमानाने स्वीकारले की, त्याच्या आयुष्याचे ध्येय केवळ हिंदू मुलींना मुसलमान करणे, हेच आहे. एका भारतीय वृत्तपत्राशी बोलताना त्याने हा कबुलीनामा दिला. हे काम मी फार पूर्वीपासून करत असून पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले. अब्दुल खालिकने असाही दावा केला की, त्याची नऊच्या नऊ मुलेसुद्धा हिंदू मुलींना मुसलमान करण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. शिवाय हा मला माझ्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा असल्याचे विधानही अब्दुल खालिकने केले. दरम्यान, मौलवी अब्दुल खालिकच्या या दाव्यामुळे 'पापस्ताना'तील अल्पसंख्य हिंदू समाजाच्या दुर्दशेची चांगलीच पोलखोल झाली आहे.

 

सत्तेवर येताच इमरान खान यांनी 'नव्या पाकिस्तान'चा नारा दिला होता, तसेच काही महिन्यांपूर्वी अल्पसंख्य समाजाच्या रक्षणाचीही हमी दिली होती. आता मात्र अब्दुल खालिकने आपले जीवनउद्दिष्टच अल्पसंख्य हिंदू मुलींच्या धर्मांतराचे असल्याचे सांगितले. तरीही त्याच्यावर काही कारवाई होईल, असे नाही. कारण, मौलवी अब्दुल खालिक हाच इमरान खानच्या निकटवर्तीयांपैकी आहे. अब्दुल खालिक मिथा सिंध प्रांतातील भरचुंंदी दग्यार्र्चा मौलवी असून हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठीचा कुप्रसिद्ध अड्डा अशी या ठिकाणाची ओळख आहे. कारण, एका आकडेवारीनुसार गेल्या नऊ वर्षांत मौलवी मिथाने एकट्याने आपल्या दग्यार्र्त ४५० हिंदू मुलींचे मुसलमानीकरण केले आहे.

 

हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याच्या आपल्या कार्यपद्धतीविषयी मौलवी मिथा म्हणाला की, ''मी हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी दर्ग्यात तयारी केलेली आहे, पण मी त्यांच्या घरी जात नाही. परंतु, माझ्या वाडवडिलांनी हिंदूंचे धर्मांतर करून इस्लामची सेवा केली आहे आणि मीदेखील याच हेतूने काम करत आहे. माझी मुलेही याच मार्गावर चालतील. धर्मांतराच्या कबुलीनंतर ७८ वर्षीय मिथाने आणखी असेही सांगितले की, “माझी पत्नी मृत झाली असून माझ्या अनुयायांना मी पुन्हा निकाह करावा, असे वाटते. त्यासाठी मी मुलगी शोधत असून माझी इच्छा आहे की, ती भारतीय-हिंदू असावी.” मौलवी मिथाच्या वक्तव्यांतून स्पष्ट होते की, 'पापस्ताना'त कशाप्रकारे हिंदू मुलींना संघटितरित्या मुसलमान करण्याचे काम सुरू आहे. सोबतच बळजबरीने धर्मांतरण करून निकाह लावण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे यावरून समजते. अशा घटनांना अर्थात मौलवी अब्दुल खालिकसारख्या कट्टरपंथीयांचीच प्रेरणा असते.

 

'पापस्ताना'तील या घटना जागतिक माध्यमांतही प्रसिद्धीस येत असून अमेरिकेच्या १० खासदारांनी या प्रकरणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रही लिहिले होते. इमरान खान यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली होती. परंतु, दोन्ही नेत्यांत यावर बातचीत झाली अथवा नाही, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, 'पापस्तान'च्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार सिंध प्रांतात सर्वाधिक धर्मांतर होते आणि गेल्या एक वर्षात इथे एक हजारहून अधिक धर्मांतराची प्रकरणे उघडकीस आली.

 

सोबतच मौलवी मिथासारख्या लोकांमुळेच 'पापस्तान'तील हिंदूंचे जीवन नरकापेक्षाही विदारक झाले आहे. तिथे जबरदस्तीचे धर्मांतरण आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना सामान्य आहेत. इस्लामच्या प्रसाराच्या नावावर अशा प्रकारच्या घटनांना सामाजिक स्वीकारार्हताही मिळत आहे. हेच कारण आहे की, 'पापस्ताना'तून प्रत्येक वर्षी हजारो हिंदू पलायन करून भारतात येतात. एका अंदाजानुसार भारतात आजही दोन लाखांपेक्षा अधिक हिंदूंनी आश्रय घेतला आहे. हे लोक 'पापस्ताना'त मिथासारख्या लोकांच्या अन्याय-अत्याचारामुळे पुन्हा माघारी जाऊ इच्छित नाहीत. तरी केंद्र सरकारने याप्रकरणी 'पापस्तान'समोर आवाज उठवला पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat