नवी दिल्ली : मॉब लिंचिंगसारख्या घटनांचा निषेध करत देशातील ४९ सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटनांचा निषेध नोंदवून काही होणार नाही. यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. तसेच अशा घटना रोखण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलण्याची मागणी या मंडळींनी केली. मात्र हे ४९ सेलिब्रेटी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असून ट्विटरवर #UrbanNaxals आणि #JaiShriRam हे दोन हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहेत. मणिरत्नम, अनुराग कश्यप, बिनायक सेन, सुमित्रो चॅटर्जी, अपर्णा सेन, कोंकणा सेन-शर्मा, रेवती, श्याम बेनेगल, शुभा मुद्गल, रुपम इस्लाम, अनुपम रॉय, परमब्रता, रिद्धी सेन इत्यादींचा यात समावेश आहे.
दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री यांनीही या वादात उडी घेतली असून असहिष्णुता गॅंग देशात पुन्हा सक्रिय झाल्याची टीका त्यांनी केली आहे. काँग्रेसकडून शीख नागरिकांची हत्या होत असताना, जम्मू काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्याकांची हत्या होत असताना अपर्णा सेन कुठे होत्या ? यावेळी त्यांचे रक्त का खवळले नाही ? काश्मीर प्रश्नांवर त्यांनी मुफ्तीना पत्र का लिहिले नाही ? असा सवाल विवेक यांनी यावेळी विचारला. दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचेही या लिस्टमध्ये नाव आहे. मात्र, त्यांच्या टीमने याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. मणिरत्नम हे एका प्रोजेक्टवर काम करत असून त्यांच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांच्या टीमने सांगितले. त्यामुळे व्यक्तींना विचारात न घेता सह्या करण्याचा हा कसला प्रकार ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat