हे खेळाडू का नाहीत?; संघनिवडीवर 'दादा'ची तोफ

    दिनांक  24-Jul-2019
मुंबई : भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने तीनही फॉरमॅटचे संघ जाहीर केले. याबद्दल क्रीडाविश्वात अनेक चर्चा झाल्या. अशामध्ये भारताचा माजी क्रिकेटवीर आणि कर्णधार सौरव गांगुलीने संघनिवडीवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'तीनही फॉरमॅटमध्ये साजेशी कामगिरी करणारे शुभमन गिल आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे यांचा संघामध्ये समावेश का करण्यात आला नाही?' असा प्रश्न गांगुलीने उपस्थित केला आहे.

 

३ ऑगस्टपासून चालू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये ३ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दिपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदिप सैनी आणि खलिल अहमद यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, गांगुली याने ट्विट करून निवड समितीच्या निर्णयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

"सध्या भारताकडे असे अनेक खेळाडू आहेत जे तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. असे असूनही शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नाही याचे मला आश्चर्य वाटते. आता अशी वेळ आली आहे की निवड समितीने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि लय कायम राखण्यासाठी तीनही प्रकारच्या क्रिकेटसाठी एकाच संघाची निवड करावी. क्रिकेटचे तीनही प्रकार खेळणारे खूप कमी खेळाडू आहेत. चांगल्या संघात समान खेळाडू सर्व प्रकारचे क्रिकेट खेळतात. सगळ्यांना खुश करणं हा यामागचा उद्देश नसावा. त्यापेक्षा सर्वोत्तम संघ निवडावा आणि त्यांना तीनही प्रकारचे क्रिकेट खेळावेत." असा खोचक सल्ला गांगुलीने बीसीसीआयला दिला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat