'शास्त्री, मुखर्जी, उपाध्याय यांच्या मृत्यूची पुन्हा तपासणी नाही'

24 Jul 2019 16:14:17


 


नवी दिल्ली : पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी सरकार कोणताही आयोग स्थापन करणार नाही. तसेच, यासंदर्भातील कुठलेही प्रस्ताव केंद्र सरकारकडून विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती बुधवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. विविध स्तरांमधून या नेत्यांच्या मृत्यूच्या चौकशीविषयी मागण्या होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे मृत्यू झाला होता. ताश्कंद डिक्लरेशन अर्थात ताश्कंद अग्रीमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० जानेवारी १९६६ रोजी झाला होता. या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्री यांचे हृदयविकाराने अकस्मात निधन झाले.

 

तसेच, दीनदयाल उपाध्याय यांचे ११ फेब्रुवारी १९६८ रोजी निधन झाले होते. दीनदयाल उपाध्याय यांचा मृतदेह ११ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील दीनदयाल उपाध्याय स्टेशन म्हणजेच त्याकाळचे मुगल सराय रेल्वे स्टेशन जवळ मिळाला होता. २३ जून १९५३ रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा श्रीनगरमधील कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला होता. या तिघांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0