त्यांच्याकरिताच 'सूर्योदय'!

    दिनांक  24-Jul-2019


 


सकलांचा आदित्य देव तर केव्हाच उगवलेला आहे. त्याची सर्वव्यापी प्रकाशकिरणे अंतर्बाह्य विश्वाला उजळवणारी आणि स्थूलातिस्थूल व सूक्ष्मातिसूक्ष्म जड-चेतनांना बल व शक्ती प्रदान करणारी आहेत. पण, याची अनुभूती कोणाला होणार? ज्याने आपल्या पवित्र ज्ञानाने व विवेक बुद्धीच्या आधारे व तसेच प्रखर दिव्य दृष्टीने त्याची आराधना, उपासना व भक्ती केली. त्यालाच तर त्या परमदेव सवितादेवाची अनुभूती होणार, अन्यथा जन्म-जन्मांतरीचे कुसंस्कार, अविद्या आणि अनिष्ट कर्मसंचिताचे ओझे वाहत भटकणारे पामर काय करतील? स्वार्थ व माया-मोहाच्या बाजारात कितीजरी वणवण केली, तरी काय उपयोग? परमात्मारूपी तेजोमय सूर्यदेवाची त्याला अनुभूती अशांना होणार तरी कशी?

 

धीरास: पदं कवयो नयन्ति,

नाना हृदा रक्षमाणा अजुर्यम्।

सिषासन्त: पर्यपश्यन्त सिन्धुम्

आविरेभ्यो अभवत् सूर्यो नृन्॥

(ऋग्वेद १.१४६.४)

 

अन्वयार्थ

(धीरास:) बुद्धिमान, धैर्यशाली व (कवय:) क्रांतदर्शी कविजन (नाना) विविध प्रकारच्या (हृदा) हृदयातील पवित्र भावनांनी (रक्षमाणा:) रक्षण करीत (अजुर्यम्) अजरामर अशा परमेश्वराला (पदं) आराध्यपदावर (नयन्ति) घेऊन जातात. (सिषासन्त:) भक्ती व उपासना करू इच्छिणारे असे ते सर्वजण (सिन्धुम्) सद्गुणांच्या सागरस्वरूपी परमेश्वराला व तसेच (नृन्) त्याच्या नेतृत्व सामर्थ्याला (पर्यपश्यन्त) प्रत्यक्षपणे अनुभवतात. (एभ्य:) अशा सर्व पवित्रात्मात्यांकरिता (सूर्य:) ज्ञान व समृद्धी सूर्याचा (आवि: अभवत्) उदय होतो.

 

विवेचन

सूर्य कोणी नाही पाहिला? प्राची दिशेला उगवणारा तेजस्वी सूर्य समग्र सृष्टीवर प्रकाशकिरणे फैलावतो आणि सर्वांनाच आरोग्य, समृद्धी व आनंद प्रदान करतो. स्वत:तील सर्व प्रेरक गुण व निर्माणशक्ती सबंध जड-चेतन तत्त्वांना वितरित करतो. उगवता-उगवता तो गतिमान 'सविता' समग्र सृष्टीला उगवण्याचे (जन्मण्याचे)बळ देतो आणि सर्वांना गतिशीलही बनवितो. अगदी सृष्टिउत्पत्तीपासून हा आदित्य देव आपले पवित्र कार्य अखंडितपणे करीत आहे. आम्ही दररोज आपापली नित्यकामे करतो. सांसारिक कार्याच्या व्यस्ततेमध्ये आम्हास त्या भास्कर भगवंताकडे पाहावयास थोडादेखील वेळ नाही. प्राकृतिक थंडी-पावसामध्ये त्याचे दर्शन झाले नाही किंवा उन्हाळ्यात प्रचंड उष्माघात वाढू लागला की आम्हाला प्रकर्षाने त्याच्या महाशक्तीची जाणीव होते. पण, याच तेजोनिधीचे महत्त्व ऋषिमुनी, शास्त्रज्ञ व तत्वज्ञानी ओळखतात आणि विविध संशोधन करून त्याचा सदुपयोग मानवमात्राच्या कल्याणाकरिता करतात. आजची वैज्ञानिक प्रगती सूर्याला केंद्रस्थानी मानून केली जाते. मग सांगा पाहू सूर्य कोणासाठी उगवला? त्यापासून उष्णतेचा संचय करून नानाविध शोध लावणार्‍या 'धीमान' व 'कांतदर्शी' विद्वानांकरिता की अज्ञानयुगात वावरणार्‍या आळशी, प्रमाद व कर्महीन लोकांकरिता?

 

हे झाले एका तेजोगोलक सूर्याबाबत, जो की आपल्या पृथ्वीच्या जवळचा आहे. असे कितीतरी तेजस्वी सूर्य कार्यरत आहेत आपल्या सूर्यमालेत! पण, जो सूर्याचा सूर्य-महासूर्य परमेश्वर आहे. त्याविषयी जरा विचार करूया! या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारा महासूर्य कोणी अनुभवला आहे काय? हा सकलांचा आदित्य देव तर केव्हाच उगवलेला आहे. त्याची सर्वव्यापी प्रकाशकिरणे अंतर्बाह्य विश्वाला उजळवणारी आणि स्थूलातिस्थूल व सूक्ष्मातिसूक्ष्म जड-चेतनांना बल व शक्ती प्रदान करणारी आहेत. पण, याची अनुभूती कोणाला होणार? ज्याने आपल्या पवित्र ज्ञानाने व विवेक बुद्धीच्या आधारे व तसेच प्रखर दिव्य दृष्टीने त्याची आराधना, उपासना व भक्ती केली. त्यालाच तर त्या परमदेव सवितादेवाची अनुभूती होणार, अन्यथा जन्म-जन्मांतरीचे कुसंस्कार, अविद्या आणि अनिष्ट कर्मसंचिताचे ओझे वाहत भटकणारे पामर काय करतील? स्वार्थ व माया-मोहाच्या बाजारात कितीजरी वणवण केली, तरी काय उपयोग? परमात्मारूपी तेजोमय सूर्यदेवाची त्याला अनुभूती अशांना होणार तरी कशी?

 

परमेश्वराची व्यवस्था, त्याने निर्मिलेले हे ब्रह्मांड, त्याचे पवित्र वेदज्ञान आणि त्याचे गुणकर्म-स्वभाव हे सर्व काही ओळखणारे मात्र विवेकशील, धैर्यशील आणि कांतदर्शी साधकच असतात. आपल्या योगमय पवित्र अशा आदर्श जीवन व कार्याने आणि अपूर्व अशा ज्ञानबळाने त्या महान अजरामर परमेश्वराच्या सान्निध्यात ते राहतात. जगातील सर्व चिंतांपासून ते मुक्त असतात. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यात कमळ फुललेले असते, पण तेथील पाण्याचा एक थेंबही आपल्या पाना-फुलांवर येऊ देत नाही. चिखलाच्या दलदलीत राहूनही ते नेहमी स्वच्छ असते व इतरांना सुगंध देते. त्याप्रमाणे ईश्वरभक्तीचे जीवन असते. सुख-दु:ख, हानी-लाभ, ज्ञान-अज्ञानाच्या द्वंद्वात राहूनही असे ईश्वरभक्त आपल्याला जगापासून अलिप्त ठेवतात. आपल्या हृदयस्थ विविध पवित्र भावनांनी परमेश्वराची उपासना करतात व त्याच्या पवित्र ज्ञानमार्गाचे रक्षण ही करतात. त्याचेच ध्यान करीत नित्य प्रसंगी पदोपदी ते त्यांचा अनुभव घेतात. मग तो महासूर्य भगवंतदेखील अशा भक्तजनांकरिता नेहमी उगवलेलाच असतो. त्या ईशोपासकांची अवस्था उपनिषदांनी अतिशय सार्थपणे व्यक्त केली आहे.

 

भिद्यते हृदयग्रन्थी छिद्यन्ते सर्वसंशया:।

क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे॥

 

म्हणजेच भगवान सूर्यनारायणाच्या तेजस्वी ज्ञानप्रकाशात वावरणार्‍या व मनसा-वाचा-कर्मणा पवित्र बनलेल्या भक्तांच्या हृदयग्रंथी भेदल्या जातात, द्वंद्वांचे सारे संशय कल्लोळ छिन्न-भिन्न होतात आणि सर्व प्रकारच्या कर्मांचा क्षय होतो. खरोखरच हा सूर्योदय त्यांना अंतर्बाह्य उज्ज्वल बनवितो.

 -  प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat