'लादेन'वरून 'लेने के देने'

    दिनांक  23-Jul-2019   
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दाऊद इब्राहिमही पाकिस्तानात असल्याची एकदाची जाहीर कबुली देऊन मोकळे व्हावे. कारण, दाऊदही भविष्यात अशाच एखाद्या 'ऑपरेशन'मध्ये मारला गेल्यानंतर त्याच्या टाळूवरचे लोणीही पाकिस्तानला गोडच लागेल.पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अमेरिकेने २०११ साली 'अल कायद्या'चा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. तोपर्यंत लादेन आमच्या देशात नाहीच, असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून ते लष्करप्रमुख उच्चरवाने करत होते. एवढेच नाही, तर अमेरिकेच्या धडक कारवाईशी पाकिस्तानचा कुठलाही संबंध नाही, याची पूर्वकल्पनादेखील आम्हाला नव्हती, असे सांगत पाकिस्तानने अमेरिकेच्या या धाडसी कारवाईशी पूर्णपणे फारकत घेतली.

 

अशाप्रकारे पाकच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे कृत्य पुन्हा खपवून घेणार नाही वगैरे बाताही मारल्या. आज क्रूरकर्मा ओसामाचे कुस्मरण करावे लागले, ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या एका दाव्यामुळे. 'आयएमएफ'च्या कुबड्यांवर उभ्या असणार्‍या पाकिस्तानला अमेरिकन मदतीचा टेकू मिळावा म्हणून इमरान खान भिकेचे कटोरे घेऊन वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. पण, ट्रम्प सरकारतर्फे अमेरिकेचा साधा कनिष्ठ पातळीवरचा एकही अधिकारी खान यांच्या स्वागताला विमानतळावर फिरकला नाही. उलट पाकिस्तानचेच परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन दूतावासातील अधिकार्‍यांवर खान यांच्या स्वागताची नामुष्की ओढवली. पैसे नाही म्हणून खान यांनी सरकारी विमानप्रवासही टाळला आणि हॉटेलचे भाडेही परवडणारे नाही म्हणून अधिकार्‍याच्याच घरी राहणे पसंत केले.

 

असो, तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा लादेनचे गढे मुर्दे उकरण्याची वेळ आली. इमरान खान म्हणतात, “आयएसआयच्या मदतीमुळेच 'सीआयए'ला लादेनला यमसदनी धाडता आले.” आता इमरान खान यांचा हा दावा सत्य मानला, तर हाच प्रश्न पडतो की, मग पाकनेच लादेनला का नाही संपवले? त्याच्या दहशतवादी कृत्यांवर पांघरुण का घातले? २०११ पासून २०१९ पर्यंत पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी सैन्य यांनी मग कधीही 'आयएसआय'च्या या देदीप्यमान यशाचे तोंडभरुन कौतुकही का केले नाही? का इमरान खान यांनाही तब्बल नऊ वर्षांनंतर अमेरिकन भूमीतून हे वक्तव्य करण्याची बुद्धी सुचली? यामागचे कारण तसे उघड आहे.

 

खरं तर 'सीआयए'ला 'आयएसआय'ने लादेनच्या ठावठिकाणाची माहिती पुरवली अथवा नाही, यावर आजही अनेक मतमतांतरे आहेत. काही दाव्यांनुसार, 'आयएसआय' आणि पाक लष्कराच्या मदतीशिवाय 'सीआयए'ला लादेनला संपवणारे 'ऑपरेशन नेपच्यून स्पिअर' हाती घेताच आले नसते. एवढेच नाही, तर अमेरिकेच्या हेलिकॉप्टर्सना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत अबोटाबादपर्यंत सहज मार्गक्रमणही करता आले नसते. पण, या सगळ्याची जाहीर कबुली दिली, तर लादेनचे हाडूक आपल्याच घशात अडकून बसेल, म्हणून 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' ही रणनीती त्यावेळी पाकसह अमेरिकेच्याही हिताची होती.

 

कारण, तत्कालीन ओबामा सरकारनेही सर्वार्थाने लादेनच्या मृत्यूचे 'क्रेडिट' पाकसह भागीदारीतही नको, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे म्हटले जाते. अमेरिका दहशतवाद्यांना जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून शोधून संपवू शकते, असा संदेश प्रसारित करण्यात ओबामा यशस्वी झाले. अमेरिकनांची त्यांनी मनेही जिंकली आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत बाजी मारत दुसरा कार्यकाळही यशस्वीरित्या पूर्ण केला. पण, आज या घटनेला नऊ वर्षं उलटून गेल्यानंतर पाकिस्तानच्याच पंतप्रधानांनी अमेरिकेच्याच भूमीत 'आयएसआय'ची केवळ पाठच थोपटली नाही, तर अप्रत्यक्षपणे 'सीआयए'लाही चिमटा काढला.

 

अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांना खुश करण्यासाठीच त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या बराक ओबामांवरच इमरान खान यांनी असा दावा करत निशाणा साधलेला दिसतो. दुसरीकडे, हेही विसरून चालणार नाही की, इमरान खान यांच्या या अमेरिका दौर्‍यात लष्करप्रमुख आणि 'आयएसआय'प्रमुखही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे जागतिक स्तरावर पाकी लष्कर, 'आयएसआय'ची डागाळलेली प्रतिमा थेट अमेरिकेच्या व्यासपीठावरून सुधारण्याचा इमरान खान यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्नच म्हणावा लागेल. पण, हे करताना लादेन पाक भूमीतच पोसला गेला, लष्कराने त्याला संरक्षक छत्र दिले, 'आयएसआय'ने आपल्या हितासाठीच लादेनला वापरून घेतले, यावर इमरान खान यांच्या एका जाहीर विधानाने कित्येक दाव्यांची आपसूकच पुष्टी होते. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दाऊद इब्राहिमही पाकिस्तानात असल्याची एकदाची जाहीर कबुली देऊन मोकळे व्हावे. कारण, दाऊदही भविष्यात अशाच एखाद्या 'ऑपरेशन'मध्ये मारला गेल्यानंतर त्याच्या टाळूवरचे लोणीही पाकिस्तानला गोडच लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat