जगा आणि जागा

    दिनांक  23-Jul-2019
भारताचा विकास साधायचा असेल, तर खेडी विकसित व्हायला हवीत. 'शिक्षण' हा विकासाचा पाया मानला गेला आहे. विकासाच्या सर्व संकल्पना या प्रभावी शिक्षणाभोवती गुंफल्या गेल्या आहेत म्हणूनच खेड्यांचा विकास साधायचा असेल, तर खेड्यात सोयी-सुविधा उपलब्ध करणे व त्या सक्षम करणे गरजेचे आहे. ग्रामविकास हेच ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून 'साद माणुसकीची' या संस्थेची स्थापना २०१६ साली करण्यात आली.

 

गावाकडे जाणे-येणे सुरू असताना गावाकडील एकेका प्रश्नाची धग त्यांना जाणवू लागली. गावच्या शाळेत ज्या वेळी गेलो, त्यावेळी तेथील सुविधांची स्थिती जेमतेमच होती. स्वच्छतागृहांची स्थिती फारच गंभीर होती. तिथे उभं राहणंही शक्य नव्हतं. विद्यार्थी त्यांचा कसा वापर करत असतील? गावात माध्यमिक शाळा आहे. तेथीलही अवस्था अशीच. मुलींच्या गळतीचे प्रमाण का जास्त आहे, त्याची जाणीव त्या ठिकाणी झाली. आपल्या परीने जे शक्य आहे ते गावासाठी करायला पाहिजे, हा विचार पक्का झाला. गावातील शाळेला प्रोजेक्टर देऊन शाळा डिजिटल करण्याचा पहिला प्रयत्न झाला. 'साद माणुसकीची' अभियान शिक्षकांसाठी सुरू झालेलेहोते. शिक्षकांच्या मूल्यवर्धनासाठी कार्य करण्याचा मानस होता आणि केवळ 'शिक्षण' या विषयावर भर देत वाटचाल सुरू केली. मात्र, जसजसे पुढे जात गेलो, त्या वेळी ग्रामविकास साधायचा असेल तर शेतीशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास, शेती व वृद्धसेवा या पंचसूत्रीवर कार्य करण्याची गरज असल्याचे लक्षात आले आणि त्यानुरूप सारासार विचार करून एखादं गाव समृद्ध करायचं तर काय केलं पाहिजे, यावर विचार सुरू झाला.

 

'साद माणुसकीची' या संस्थेची उद्दिष्टेही त्याप्रमाणेच आहेत. समृद्धजनांच्या सहभागातून स्वयंप्रेरित, सातत्यपूर्ण, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास करणे, लोकसहभागातून ग्रामविकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, लोकसहभागासोबत अनिवासी ग्रामवासी, ग्रामस्थ, उद्योजक व सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामविकासासाठी दिशादर्शन करणे, ग्रामविकासाच्या संकल्पनेला समर्पित सेवाभावी कार्यकर्त्यांची फळी उभी करून त्यांचे प्रशिक्षण व कियान्वयन करणे, दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योग, गरजू गावं व सामाजिक संस्था यांच्यामधील एक विश्वासार्ह सेतू म्हणून स्वतःला स्थापित करणे, समाजाचे प्रयत्न व त्याचा सकारात्मक परिणाम यांची योग्य माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे, ही संकल्पनेमागील उद्दिष्टे आहेत.

 

ग्रामविकास करताना सुरुवात केली ती माझ्या गावापासून. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी गावापूसन. मागील वर्षी कोठारी पंचक्रोशीतील १० गावांच्या जिल्हापरिषद शाळांना त्यांनी मागेल त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन दरवर्षी एक लाख असे एकूण पाच लाख रुपये देण्याचे ठरविले आणि त्या प्रकल्पासाठी 'विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट'ने पुढकार घेऊन त्यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांची देणगी मिळाली. या रकमेतून दहा शाळांमधील भौतिक सुविधांचा संपूर्ण कायापालट झाला. आता या दहा शाळांमधील स्वच्छतागृहे अतिशय स्वच्छ झाली आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेला स्मार्ट टीव्ही, पाणी शुद्धीकरण यंत्रे, वॉटर कुलर, सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके आणि कपाटं, संगणक, प्रिंटर, पंखा आणि सॅनिटरी पॅड्स अशा साहित्याचे वाटप करून त्याचे लोकार्पण मागील वर्षी ३० मार्च, २०१७ रोजी महापालक डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या उपस्थितीत केले होते. कोठारी गावामध्ये 'सादग्राम निर्मिती प्रशिक्षण शिबिर' झाले. १५ जानेवारी ते २३ जानेवारी २०१९. या पासून प्रेरणा घेऊन विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येकी ३ गावानी 'सादग्राम निर्मिती प्रशिक्षण शिबिर' आयोजित केले. सादग्राम नावाचे अ‍ॅपही तयार केले आहे.

 

कोठारी हे गाव साधारण साडेसात हजार लोकसंख्येचे गाव आहे. मात्र, या गावात एकाही ग्रंथालयाची सुविधा नव्हती. माझ्या एका भेटीत ही समस्या सोडविण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावेळी एका सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे काम कोठारी गावाशी कधीही संबंध न आलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी केले. केवळ कोठारी गावचा अनिवासी ग्रामवासी म्हणून ते मी करू शकलो. मला एक प्रश्न नेहमीच पडत असे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून जर आपलं गाव आणि शेजारच्या गावासाठी काम घडू शकतं, तर माझ्यापेक्षा अधिक संपन्न झालेल्या हजारो-लाखो नागरिकांनी आपापल्या गावासाठी विचार केला तर कोणतेही गाव प्रगतीपासून दूर राहू शकत नाही. पण असं मोठ्या प्रमाणात घडत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच खेडी दिवसेंदिवस ओस पडत चाललीआहेत. या सर्व समृद्ध झालेल्या अनिवासी, ग्रामवासींना'साद माणुसकीची'तर्फे कळकळीची विनंती आहे की, त्यांनी 'फूल ना फुलाची पाकळी' आपापल्या मूळ गावच्या ग्रामविकासात हातभार लावावा. आपणासत्यासाठी मार्गदर्शनाची गरज लागल्यास 'साद माणुसकीची' संस्था यथायोग्य मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहे.
 

'चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम' असे म्हणतात. मात्र, बरेचदा समाजकार्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातलाजात नाही. सुरुवातीला स्वतःच्या संपत्तीतील महत्त्वपूर्ण हिस्सा ग्रामविकासाच्या पायाभरणीसाठी उभा केला. पुण्यात आमच्या मालकीची सिंहगड रोडवरील 'सन सिटी' येथील २ बीएचके सदनिका राज्यभरातून येणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना राहण्यासाठी तात्पुरतानिवारा म्हणून मागील तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजपर्यंत अनेकांनी या निवार्‍याचा लाभ घेतला असून त्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत. पुण्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख विद्यार्थी विविध प्रकारच्या शिक्षणासाठी येत असतात. त्यांच्यासाठी निवार्‍याचा प्रश्न हा फार मोठा आहे. ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना पुण्यातील हॉस्टेलचे दर परवडत नाहीत. अशा वेळी ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट्स घेतलेले आहेत आणि केवळ कुलूप लावून ठेवलेले आहेत, अशा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी अगदीच मोफत नव्हे तरी निदान वीजबिल आणि देखभाल खर्च घेऊन अशा विद्यार्थ्यांना ते उपलब्ध केले तर संपत्तीसहयोगाचं समाधान ते 'याची डोळा याची देही' घेऊ शकतील.

 

असो, अनिवासी गावकरी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांत वेगवेगळ्या समस्यांवर कार्यरत असणाच्या सामाजिक संस्था आणि शासन यांच्या सहभागातून समग्र आणि संपन्न ग्रामविकासाचे मॉडेल राबवण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. या संस्थेची साद आहे ती प्रामुख्याने गावातून शहराकडे गेलेल्यांना. आज परदेशात स्थायिक झालेले भारतीय वंशाचे नागरिक देशाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत.मग गावखेड्यांमधून बाहेर पडून समृद्ध झालेल्यांनी आपल्या मूळ गावाच्या विकासासाठी सहयोग द्यायला नको का? खरे तर ते त्यांचे नैतिक कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन, मार्गदर्शन करून 'साद माणुसकीची' संस्था काम करत आहे. विकासासाठी कटिबद्ध आहेत.

 

संस्थेचे काम करण्याचे आयाम ठरलेले आहेत.

शिक्षण - शिक्षण हा पहिला आयाम. शिक्षण हा कोणत्याही विकासाचा पाया मानला गेला आहे म्हणूनच खेड्यांचा विकास साधायचा असेल, तर ग्रामीण शैक्षणिक विकास साध्य करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

आरोग्य - बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये निर्माण होणार्‍या आरोग्याच्या समस्या समजून घेऊन त्या समस्यांवर मूलभूत व सहज परवडणाच्या उपाययोजना ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.

 

शेती - भारतातील बहुतांश ग्रामीण समाज शेती व शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व संपन्न होईल, यासाठी संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

रोजगार व कौशल्यविकास - ग्रामीण भागातील युवकांमध्ये लपलेल्या विविध कौशल्यांना वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसित करण्यासाठी विविध संस्थांच्या सहयोगाने कौशल्यविकास कार्यक्रम राबवणे व या युवकांना स्वाभिमानाने उपजीविकेची खात्री देणारे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

वृद्धसेवा - बदलती परिवार पद्धती व समाजरचना यातून वयोवृद्ध व्यक्तींच्या वेगळ्याच समस्या आज निर्माण होत आहेत. भविष्यात त्या अजून जटिल स्वरूप धारण करतील. या समस्यांवर वेळीच अभिनव उपाययोजना तयार करून ज्येष्ठ व वृद्ध व्यक्तींना समाजात उन्नत व सन्मानाचे स्थान निर्माण करून देणे. यानुसार संस्थेचे उपक्रम आहेत. जसे -महापालक सन्मान - ट्रस्टतर्फे असामान्य पालकत्वासाठीचा 'महापालक सन्मान' दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

 

महाएक्झाम - 'डीपर'प्रमाणे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'महाएक्झाम' सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

 

सेतूबंध - 'साद माणुसकीची' सामाजिकता अभियानाअंतर्गत सामाजिक संस्थांना आणि समाजकार्य करणार्‍या व करू इच्छिणार्‍यांना एकत्र घेऊन 'सेतूबंध' उभारण्याचे सुरू केले आहे. सामाजिक संस्थांच्या संसाधन विकासासाठी मदत करणे, त्यांना अनुभवी व निष्णात व्यक्तींकडून वैधानिक व कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करणे आदी कार्ये या अभियानाअंतर्गत पार पाडण्यात येणार आहेत.

 

माणुसकी सन्मान - समाजात माणुसकीचे अत्युच्च मापदंड निर्माण करणार्‍यांसाठी फाऊंडेशनतर्फे 'माणुसकी सन्मान' सुरू करण्यात येत आहे. संस्थेचे अनेक यशस्वी उपक्रम असले तरी आजपर्यंतच्या वाटचालीत सामाजिक क्षेत्रात जेवढं काम करणं शक्य झालं, ते स्वावलंबनातूनच केलं. बाहेरील देणगी किंवा कोणतेही सरकारी अनुदान अपेक्षित धरलं नाही. कुणाला वाटेल की मी समाजऋण फेडण्याचे आवाहनकरीत असताना आम्ही समाजकल्याणाचा खारीचा वाटा उचलायचे ठरवले आहे. त्यानुसार माझी दोन्ही मुले कमावती झाल्यावर झाल्यावर त्यांना आमच्याकडे असलेल्या संपत्तीचा कोणताही वाटा मिळणार नसून, त्यानंतर संपत्तीचा विनियोग गरजूंसाठी करण्याचे आम्ही ठरवले आहे. आम्ही म्हणजे मी आणि माझी पत्नी डॉ. रोहिणी यांनी. त्यासाठी २०२५ मध्ये आम्ही आमच्या नेहमीच्या कामातून बाजूला होऊन पूर्णवेळ ज्या ठिकाणी आरोग्य व शिक्षणाच्या समस्या असतील तेथे जाऊन ग्रामविकासाच्या दृष्टीने कार्य करण्याचे निश्चित केले आहे.

 

तसेही माझ्या आणि संस्थेच्या मते, चांगल्या वृत्तीचे शिक्षकच उत्तम पिढी घडवू शकतात, त्यामुळे शिक्षकांना समृद्ध कसे करता येईल, त्यासाठी माझा विशेष प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने समृद्ध झाल्यानंतर आपल्या मूळ गावाकडे वळून बघितलं आणि आपल्या समृद्धीतून सहयोग केला तर गावोगावच्या शिक्षण, आरोग्याच्या, रोजगाराच्या, वृद्धांच्या समस्या दूर होण्यास वेळ लागणार नाही. मात्र, बहुतांशी लोकं आपल्या गावासाठी म्हणावा तसा सहयोग देत नाहीत, त्यासाठी कारणेही अनेक आहेत. ही स्थिती जाणून आता 'जगा आणि जागा : समृद्धीतून सहयोग' या अभियानातून जागरण करायचे ठरविले आहे.

 

'डीपर'चे यश

१२ वर्षांत नऊ वेळा 'डीपर'ची परीक्षा देणारे विद्यार्थी राज्यात पहिले आणि त्यात तीन वेळा वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग दोन्हीसाठी हे स्वप्नवत वाटतं, त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. पण वास्तवात उतरले आहे. १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेने एमबीबीएसची कवाडं उघडण्यासाठी आत्मविश्वास दिला.

 

संस्थेचे सगेसोयरे

मेळघाटामध्ये स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून आदिवासींच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःचे आयुष्य खर्ची घालणारे महापालक डॉ. रवींद्र कोल्हे या फाउंडेशनच्या संचालक मंडळावर आहेत; तर ज्येष्ठ विचारवंत आणि बांधकाम व्यावसायिक ईश्वरलाल परमार हे प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहेत. तसेच फाउंडेशनच्या व्यासपीठावर मार्गदर्शक म्हणून हिवरेबाजार आदर्श गावचे सरपंच व राज्याच्या आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, आपल्या मूळ निढळ या गावी ग्रामविकासाचे मॉडेल उभे करणारे पुण्याचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कृषिरत्न आनंद कोठाडिया, सचिन ईटकर, 'स्नेहालया'चे गिरीश कुलकर्णी, 'रुरल रिलेशन'चे प्रदीप लोखंडे, 'लातूर पॅटर्न'चे जनक माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव तसेच नियामक मंडळावर डॉ. सतीश देसाई, अ‍ॅड. उदय वारुंजीकर, यजुर्वेंद्र महाजन ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी कार्यरत असून, कार्यकारी मंडळामध्ये राज्यातील विविध भागातील आपापल्या क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती ग्राम.

 
 - हरीश बुटले

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat