छोट्या पार्टीतील मोठा आनंद

    दिनांक  23-Jul-2019


 गेल्या आठवड्यात मला रुपालीचा फोन आला. तिच्या मोठ्या मुलीचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे, असे तिने सांगितले. वाढदिवस एखाद्या अनाथाश्रमात साजरा करावा, अशी बर्थडेगर्लची इच्छा होती. कॉलेज ग्रुपवर मी वरचे वर प्रोजेक्ट्सबद्दल पोस्ट टाकत असल्याने ‘हॅप्पीवाली फिलिंग’ उपक्रम आणि माझ्या सामाजिक कामाबद्दल तिला माहिती होती आणि त्यामुळेच तिने माझ्याकडून एखाद्या अनाथाश्रमाचा संपर्क क्रमांक मिळवा, यासाठी फोन केला होता. मला ते ऐकून फार बरं वाटलं. मी लगेचच बदलापूर आणि ठाणे येथील दोन आश्रमांचे संपर्क क्रमांक तिला पाठवले आणि त्यांच्याशी बोलायला सांगितले. तिच्या ऐका मैत्रिणीने मुंबईच्या शहरी वस्तीत असणार्‍या एका अनाथाश्रमाचा संपर्क क्रमांक दिला होता. जिथे मुली राहतात आणि शिकतात. त्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी बोलून रुपाली आनंदे होणे अपेक्षित होते, पण उलट ती आता बेचैन झाली होती.

 

रुपालीला वाढदिवसाच्या औचित्त्याने तिच्या मुलीचे वापरात नसलेले पण वापरण्यासारखे कपडे, काही चांगली खेळणी ‘डोनेट’ करायची होती आणि सोबत खाऊ वाटून मुलांमध्ये वेळ ‘स्पेंड’ करायचा होता. पण त्या पदाधिकार्‍यांनी जुन्या कपड्यांना साफ नकार दिला. आरोग्याच्या दृष्टीने संस्थेच्या नियमावलीनुसार बाहेरचा खाऊ मुलांना देण्यासदेखील मनाई आहे. खेळणी आणल्यास प्रत्येक मुलाला/मुलीला मिळतील, अशी एकसारखीच आणावीत असे सांगण्यात आले. पण या सगळ्या गोष्टी करणे तिला अवघड होते म्हणून तिने अजून विकल्प विचारला, तर संस्थेने सरळ पैसेरुपी ठराविक रकमेची मागणी केली किंवा मग संस्थेतील सर्व मुलांच्या एका वेळच्या जेवणाचा निधी द्यावा असे सांगितले. या गोष्टीसाठी निर्धारित निधीही रुपालीने या कार्यासाठी ठरवलेल्या ‘बजेट’पेक्षा जास्त होता. मुलीचा वाढदिवस फक्त आपल्या मानसिक समाधानासाठी नाही करायचा, तर यातून पुढच्या एखाद्या खरंच गरजूला मदत व्हावी, अशी त्या दोघांचीही तीव्र इच्छा होती. (शेवटी भीती फक्त इतकीच वाटते की, या संस्थांच्या नियमावलींमुळे किंवा निधीरुपी जाचक अटींमुळे लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार्‍या हातांना नकळत ‘फुलस्टॉप’ बसू नये.)आता तिला काळजी ही वाटत होती की, आजचा अर्धा दिवस तर निघून गेला, उद्या वाढदिवस तर अशाच काही पद्धतीत साजरा करण्याचे ‘प्रॉमिस’ तिने मुलीला केले होते, पण आता ते ‘प्रॉमिस’ पूर्ण कसे करणार हे तिला सुचत नव्हते.

 

क्षणाचाही विलंब न करता मी तिला म्हणालो, “अजिबात टेन्शन घेऊ नकोस. शांत हो. कामावरून शांत घरी जा आणि तू ठरवल्याप्रमाणेच वाढदिवस साजरा होईल. त्यानंतर मी लक्ष्मीचं घर गाठलं. (लक्ष्मी ही माझी मानलेली बहीण जी आपल्या कुटुंबासोबत घणसोली नोड येथील पादचारी मार्गालगत राहते आणि लोहार काम करून तिचे कुटुंब आपले उदरनिर्वाह करते.) मी या वेळी दोन आठवड्यानंतर त्यांना भेटायला गेल्यामुळे आधी तर आमच्या बर्‍याच सार्‍या ‘पेंडिंग’ गप्पा रंगल्या. यावेळी लक्ष्मीची लहान बहीण अंगावर चादर घेऊन झोपली होती. मी आईंना विचारलं, “बत्तीच्या वेळी ही का झोपली आहे?” तर आई म्हणाल्या, “तिला बरं न्हाय. मागच्या आठवड्यात मच्छरदाणी फाटली पोरांची आणि रातचे मच्छर लय तरास देत्यात आन पोरं आजारी पडत्यात.” ते चित्र पाहून अन त्यांची व्यथा ऐकून मला मनातून फार दुःख वाटलं. पण मी ते मनात लपवत तसच त्यांना धीर देत म्हणालो, “करू मच्छरजाळीची व्यवस्था लवकरच. तुम्ही काळजी घ्या तोवर. मग त्यांना मी वाढदिवसाबद्दलची माझी कल्पना सांगितली. मी काही म्हणावं, या आधीच लक्ष्मीनं माझं मन वाचलं आणि लगेच म्हणाली, “दादा आरं इथं करू की ‘बर्थडे पार्टी’ धुमधडाक्यात आपल्या आशियानात.” मग ठरलं तर उद्या बर्थडे इथंच साजरा करायचा.

 

मी घरी जाऊन रुपालीला फोन केला आणि सांगितलं, “वाढदिवसाची धमाल जागा ठरली आहे. पण आता ती ‘सरप्राईज’ आहे. तू फक्त बाराजणांसाठी खाऊ, आठ फूट मच्छरजाळी आणि बर्थडेगर्लला घेऊन उद्या सकाळी ११ वाजता घणसोलीला ये.” सकाळी अविनाशने (मेव्हणे कम बेस्टफ्रेंड ज्यादा) फुग्याचे पाकीट घेऊन बर्थडे लोकेशन ज्या पद्धतीने सजवले होते, त्याला पाहून सिग्नलवर थांबलेली प्रत्येक गाडी काच खाली करून आमच्या आशियानाकडे वळून वळून पाहत होती. मग बर्थडेपार्टी सेलिब्रेशनचा जो काही आनंद या डोळ्यात साठवला, त्याच वर्णन शब्दात होते. बघा ना खूप अवघड वाटलेली गोष्ट इतक्या सहज पार पडली. एकीकडे रुपाली अन तिच्या कुटुंबाला हवी होती तशी बर्थडेपार्टी झाली. दुसरीकडे लक्ष्मी अन तिच्या कुटुंबाला आमच्या गोड कंपनीसोबत खाऊ आणि मच्छरदाणी मिळाली आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांनाच ‘रिटर्न गिफ्ट’रुपी मिळाली ‘हॅप्पीवाली फिलिंग.’

 
- विजय माने  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat