झुंडबळीचे दुःख असते तर...

    दिनांक  22-Jul-2019
नसिरुद्दीन शहांच्या संवेदना, सहानुभूतीच्या भावना खरोखरच प्रामाणिक होत्या का? त्यात खरेच काही माणुसकीचा, आपुलकीचा ओलावा होता का? की हा फक्त वरवरचा देखावा असून अंतस्थ हेतू काहीतरी निराळाच होता-आहे? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे कारण म्हणजे, कार्यक्रमाला बोलावलेले निवडक पीडित व विशिष्ट गोटातल्या लोकांची हजेरी!

 

'झुंडहल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना ऐकल्यानंतर माझे मन हेलावले. त्यांनी जेवढे भोगले, त्यापैकी दोन टक्केही आपल्यापैकी अनेकांनी भोगले नसेल. त्यांनी धैर्य दाखवले त्याबद्दल माझा सलाम आणि त्यांच्याविषयी माझी सहानुभूती," असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी रविवारी काढले. 'डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया' या डाव्या विचारांच्या संघटनेने मुंबईत 'विद्वेषी अत्याचाराला सरकारी साथ' या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

 

'डीवायएफआय'च्या या कार्यक्रमाला हरियाणातील जुनैद शेख, पुण्यातील मोहसीन शेख, अहमदाबादेतील अयुब मेवाता आणि बुलंद शहरमधील सुबोधकुमार सिंग, नगरमधील नितीन आगेसह कथित झुंडबळी व जातीय अत्याचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना बोलावले होते. सोबतच तिस्ता सेटलवाड, माजी न्या. गोपाल गौडा, सुभाषिनी अली, डॉ. राम पुनियानी, मुक्ता दाभोळकर, मरियम ढवळे, कलिम सिद्दीकी वगैरे मंडळींची याला उपस्थिती होती. नसिरुद्दीन शहांनी झुंडबळींप्रतिच्या संवेदना मनापासून व्यक्त केल्या असतील, तर नक्कीच त्याचे स्वागत केले पाहिजे. कारण, बहुतांश चित्रपट अभिनेते-अभिनेत्री अशा मुद्द्यावर भूमिकाच घेत नाहीत, पण नसिरुद्दीन शहांनी ते नेहमीच केले. मात्र, शहांच्या संवेदना, सहानुभूतीच्या भावना खरोखरच प्रामाणिक होत्या का? त्यात खरेच काही माणुसकीचा, आपुलकीचा ओलावा होता का? की हा फक्त वरवरचा देखावा असून अंतस्थ हेतू काहीतरी निराळाच होता-आहे? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे कारण म्हणजे, कार्यक्रमाला बोलावलेले निवडक पीडित व विशिष्ट गोटातल्या लोकांची हजेरी!

 

देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून डाव्या, छद्म धर्मनिरपेक्षवादी, पुरोगामी, उदारमतवादी, लोकशाहीप्रेमी, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या रखवाल्यांनी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संस्था-संघटनांच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला. एखाद्या छोट्याशा गावात घडलेल्या फुटकळ घटनेचा संबंधही थेट पंतप्रधान मोदी आणि भाजप-संघाशी जोडला गेला. त्यातूनच असहिष्णुतेच्या नावाने कांगावा करत पुरस्कार वापसीची टूमही या लोकांनी काढली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधीही त्यांनी एकत्र येत मोदींचे, भाजपचे सरकार कसा भारतीय इतिहासावरील काळा डाग आहे, हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी व त्याच्या पराभवासाठी पत्रापत्री, भाषणबाजी वगैरे वगैरे नौटंकी केली. परंतु, या लोकांच्या आरडाओरड्याला काडीचाही प्रतिसाद मिळाला नाही नि मोदींना रोखण्याची त्यांची दिवास्वप्ने हवेतच विरली, मोदी लोकशाही पद्धतीने प्रचंड जनसमर्थनाने सत्तेवर आले.

 

मात्र, जनतेने आपल्या आवाहनाकडे ढुंकूनही न पाहिल्याचे शल्य उराशी बाळगलेल्या विकृतांनी त्याला पाशवी, अमानुष बहुमत ठरवले. त्यामागे केवळ भाजप, संघ वा मोदींबद्दलचाच द्वेष नव्हता, तर हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठांना अवहेलण्याची, लाथाडण्याची मानसिकताही होती. परिणामी, नव्या सरकारला १०० दिवसही होत नाही, तोच गोरक्षकांनी वा जय श्रीराम न म्हटल्याने खवळलेल्या हिंदूंनी मुस्लिमांवर, ख्रिश्चनांवर भयानक अत्याचार आरंभल्याचे चित्र रंगवणे सुरू झाले.

 

उल्लेखनीय म्हणजे, या सगळ्याच घटनांना पंतप्रधानच जबाबदार असून आता देशात फॅसिस्टवादी-हिटलरशाही अवतरल्याच्या गुळण्याही मोदीद्वेषाचा तोबरा भरलेल्यांनी टाकल्या. नसिरुद्दीन शहा ज्या राष्ट्रीय परिषदेत बोलले, तो प्रकारही याच ओकार्‍या काढण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग. पण, कार्यक्रमाची आयोजक असलेल्या संघटनेने आणि झुंडबळींचा कळवळा दाटून आलेल्यांनी कावेबाजपणे त्यात मुस्लिमांच्या-ख्रिश्चनांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या हिंदूंना काही बोलावले नाही. इथे दोन मुद्दे आहेत. हिंदू समाजाचा बुद्धीभेद करण्यासाठी हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असलेल्या पण खुल्या वर्गातील लोकांच्या हल्ल्यातील दलित-पीडितांना तर बोलावले, पण मुस्लिमांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दलित परिवारांना सोयीस्कररित्या डावलले. तसेच कथित गोरक्षकांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुस्लिमांच्या आणि हिंदूंच्याही कुटुंबीयांना आमंत्रणे पाठवली, पण मुस्लिमांच्या हल्ल्यात प्राणास मुकलेल्या हिंदूंची आठवणसुद्धा काढली नाही! असे का?

 

तर या छद्म धर्मनिरपेक्षता-उदारमतवादी टोळक्याचा अजेंडा निश्चित आहे, भारत विखंडनाचा! खोट्यानाट्या घटनांवरून वादाचे निखारे पेटवायचे, आग भडकवायची आणि त्यावर आपली पोळी कशी भाजली जाईल, हे पाहायचे. इथला हिंदू समाज व हिंदुत्वनिष्ठ संघटना सैतानाचे वारस असल्याचे सांगत मुस्लीम समाज किती गरीब-बिचारा आहे, हे सांगण्यासाठी या घटनांचे भांडवल करायचे. समाज शांतता कशी बिघडेल यासाठी कला-साहित्य, प्रसारमाध्यमे, विद्यापीठे-महाविद्यालये आदी व्यासपीठांचा वापर करायचा, हेच या लोकांचे ध्येय. म्हणूूनच तर निवडक घटनांतल्याच अत्याचारग्रस्तांना या लोकांच्या कार्यक्रमात बोलावले जाते. त्यात कसलीही माणुसकी, संवेदना, आपुलकी वगैरे नसते. तसे जर असते तर आयोजकांनी आणि नसिरुद्दीन शाह यांनी सर्वच पीडितांबद्दल आपल्या मनातल्या भावना मांडल्या असत्या. नव्वदच्या दशकात धर्मांध मुस्लिमांच्या दहशतवादामुळे, त्यांनी चालवलेल्या कत्तलींमुळे लाखो काश्मिरी पंडितांना आपल्या जन्मभूमीतून पलायन करावे लागले, त्यांच्याबद्दल कधी नसिरुद्दीन शहांनी शब्द तरी काढला का?

 

काश्मिरी पंडितांवरील, मुली-महिलांवरील माणुसकीला काळिमा फासणारे अत्याचार पाहून नसिरुद्दीन शहांचे मन हेलावले का? २००२ साली अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांना मुस्लिमांच्या झुंडीने रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले, त्याबद्दल नसिरुद्दीन शहांनी कधी सहानुभूती-दुःख व्यक्त केले का? हे सोडा, पण दिल्लीच्या अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी, तामिळनाडूच्या व्ही. रामलिंगम, गुजरातच्या मनोहर वारिया, पंजाबच्या विधू जैन, कासगंजच्या चंदन गुप्ता आणि पुण्याच्या सावन राठोडवर धर्मांध मुस्लिमांनी गटागटाने येऊन केलेल्या हल्ल्यावर नसिरुद्दीन शहांनी ब्र तरी उच्चारला का? गेल्याच महिन्यात मुंबईतील गोसेवक चेतन शर्मांवर बदलापुरात कसायांच्या झुंडीने खुनी हल्ला केला, पण त्यावर नसिरुद्दीन शहांसकट सगळ्याच अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाल्यांनी अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली. का? कारण वरील प्रत्येक घटनेतले पीडित हिंदू आणि हल्लेखोर छद्म पुरोगामी-धर्मनिरपेक्षवाल्यांचा लाडका मुस्लीम होता म्हणूनच ना? म्हणूनच या लोकांचे मन कळवळले नाही ना?

 

नसिरुद्दीन शहा वगैरेंच्याच कळपातली अजून एक दुटप्पी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी. निवडक घटनांची उचलेगिरी करून काहूर माजवण्यात शबाना चांगल्याच पटाईत. पण, ही मंडळी असे का वागतात, याचे उत्तर शबानांनीच काही वर्षांपूर्वी दिलेले आहे आणि ते 'चेहरे : छाया व्यक्तिचित्र' या सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्षांच्या पुस्तकात (पान क्र. २०५) वाचायला मिळते. अभिनयक्षेत्रात काम करतानाच शबाना आझमी राज्यसभेच्या खासदारही होत्या. त्यावेळी १९८३ मध्ये गौतम राजाध्यक्ष यांनी शबाना आझमींची मुलाखत घेतली आणि याच मुलाखतीत आपल्याला वरच्या प्रश्नाचे उत्तर सापडते.

 

शबाना आझमी यात एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या की, "अचानक मला माझी मुळं सापडली आहेत आणि ती मुसलमान आहेत." वस्तुतः कम्युनिस्ट पक्षाचे सभासद असलेल्या आईवडिलांची मुलगी असलेल्या शबाना आझमींनी पहिली गोष्ट टाकून द्यायला हवी होती, ती धर्म. पण, त्यांनी तसे केले तर नाहीच, उलट मुसलमानी धर्मच आपले मूळ असल्याचे सांगितले. इथे गौतम राजाध्यक्ष यांनी आपले मतही मांडले आहे. ते म्हणतात की, "मवाळ मुसलमान या आपल्या भूमिकेवर शबानाचा आतून विश्वास आहे की, नाही, असा प्रश्न आजही मला आहे. पण मला वाटतं की, इमाम आणि नास्तिक यांच्यामध्ये कुठेतरी समतोल भूमिका घेणारा नेता म्हणून मुसलमान सेलिब्रिटीसाठी जागा आहे, हे तिच्या लक्षात आलंय." नसिरुद्दीन शहा किंवा शबाना आझमी असे का वागतात, हे इथे अतिशय मोजक्या शब्दांत सांगितले आहे. म्हणूनच निवडक घटनांवर दुःख करायची नि अन्य घटनांवर मूग गिळायचे उद्योग हे लोक करतात. त्यात माणुसकी वगैरे काही नसून राजकीय स्पेस मिळवण्याचा डाव आहे. जो काश्मिरी पंडितांपासून गोध्रा नि चेतन शर्मासाठी गळा काढून पूर्ण होणार नाही, पण मुस्लिमांसाठी छाती पिटली तर एखाददुसरा तुकडा आपल्याही ताटात पडेल, याची त्यांना खात्री वाटते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat