पुराचे गणितीय भविष्य

    दिनांक  21-Jul-2019   अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी एक अनोखे गणितीय मॉडेल विकसित केले आहे. या गणितीय सूत्रानुसार कोणत्या नदीला, नेमका कोणत्या वेळी पूर येणार आहे, याचे अचूक भविष्य वर्तविता येणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या ज्या शास्त्रज्ञांच्या चमूने हे मॉडेल विकसित केले आहे, त्या चमूमध्ये एका भारतीय शास्त्रज्ञाचादेखील समावेश आहे.


निसर्गाच्या सहवासात जीवनमान व्यतीत करत असताना मानवाला नैसर्गिक आपत्तींचा कायमच सामना करावा लागत असतो. पूर, भूकंप, वृक्ष उन्मळून पडणे, डोंगर खचणे, हिमस्खलन होणे अशा नानाविध नैसर्गिक आपत्ती मानवाला आपल्या जीविताची किंमत मोजण्यास कारणीभूत ठरत असतात. जागतिक हवामानात होणारे बदल, आणि मानवामार्फत होणारा पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे नद्या पावसाळ्याच्या मोसमात कायमच आपली धोक्याची पातळी ओलांडत असतात. भारतासारख्या मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या देशात तर पावसाळ्यात नद्यांना येणारे पूर आणि त्याचे महापुरात होणारे रूपांतरण ही कायमच मोठी समस्या असते.

 

नद्यांना कधी पूर येणार, त्याची तीव्रता नेमकी किती असणार, त्यामुळे किती नुकसान होण्याची शक्यता आहे, हे जर आधीच समजले तर संभाव्य वित्त आणि जीवितहानी रोखणे शक्य होईल. हीच किमया अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी साधली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृतानुसार, अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी एक अनोखे गणितीय मॉडेल विकसित केले आहे. या गणितीय सूत्रानुसार कोणत्या नदीला, नेमका कोणत्या वेळी पूर येणार आहे, याचे अचूक भविष्य वर्तविता येणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या ज्या शास्त्रज्ञांच्या चमूने हे मॉडेल विकसित केले आहे, त्या चमूमध्ये एका भारतीय शास्त्रज्ञाचादेखील समावेश आहे. अमेरिकास्थित 'द सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्क' मधील नासिर नजीब व नरेश देवीनेनी या शास्त्रज्ञांनी एकत्र संशोधन करत हे मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलबाबत त्यांनी सांगितले की, "पावसाळ्यात वा अवकाळी वा मुसळधार पाऊस झाला तर, नद्यांच्या पातळीत वाढ होते. त्यातच पावसाचा जोर न थांबल्यास सखल मैदानी भागातदेखील पुराचा धोका कायम संभवत असतो. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता पुराची तीव्रता आणि त्यातून निर्माण होणारी भयावहता नेमकी कशी असेल, हे आजवर समजणे मोठे जिकिरीचे काम होते. एका रात्रीत पावसाचे प्रमाण वाढले तर, पर्जन्यछायेच्या प्रदेशातील काही चौरस किलोमीटर भूभाग पाण्याखाली जात असतो. त्यामुळे नागरिकांच्या वित्त आणि जीविताचे नुकसान होण्याबरोबरच त्यांना आपल्या घरातच नाईलाजास्तव कैद होऊन बसावे लागते. परंतु, पृथ्वीवरील वातावरण आणि जमिनीच्या पृष्ठभागाची नेमकी स्थिती या आधारे आता या नव्या गणितीय मॉडेलद्वारे पुराची भविष्यवाणी करण्यात येणार आहे. या शास्त्रावर आधारित गणितीय पद्धतीद्वारे नदीला पूर येण्याची अचूक वेळ निश्चित करणे सहज शक्य होणार आहे.

 

पूर नेमका कधी येणार आहे, किती येणार, याची पूर्वकल्पना आल्यामुळे पुरामुळे होणारे संभाव्य नुकसानदेखील टाळता येणे शक्य होणार असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. तसेच, पुराची तीव्रता नद्यांतील पाण्याची पातळी व प्रवाह किती आहे आणि कुठल्या दिशेला आहे, यावर बहुतांश वेळा अवलंबून असते. पाऊस संततधार असेल आणि तो सातत्याने पडत असेल तर त्याचवेळी नद्या धोक्याची पातळी ओलांडून प्रवाही होत असतात. मात्र, या नव्या गणितीय मॉडेलद्वारे या नद्यांच्या पातळी आणि प्रवाह यांचे गणित मांडण्यात येणार असल्याने पुराची संभाव्य जोखीम कमी होण्यास मदत होणार असल्याचेदेखील या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारतासारख्या देशात कोसी, ब्रह्मपुत्रा या नद्या प्रत्येक पावसाळ्यात आपली धोक्याची पातळी ओलांडून वाहत असतात. तसेच, या नद्या आपले पात्रदेखील प्रत्येक वेळी बदलत असतात. त्यामुळे होणारी हानी ही आपण कायमच ऐकत असतो. त्यामुळे तयार करण्यात आलेले हे गणितीय मॉडेल भारतासारख्या खंडप्राय देशात नक्कीच उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. तसेच, पूर अथवा आणि महापूर आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन हादेखील एक महत्त्वाचा विषय समोर येत असतो. मात्र, या गणितीय मॉडेलमुळे आपत्तीची पूर्वकल्पना येण्यास मदत होणार असल्याने त्याचे व्यवस्थापन करणेदेखील सोयीचे होण्यास मदत होईल, हे नक्की. अमेरिकेमध्ये तयार करण्यात आलेले हे गणितीय मॉडेल भविष्यात केदारनाथ दुर्घटनेसारख्या एखाद्या संभाव्य दुर्घटनेचीदेखील भविष्यवाणी करण्याकरिता उपयोगी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat