हंपीच्या व्यासतीर्थ वृंदावनाची समाजकंटकांकडून नासधूस

20 Jul 2019 15:39:54

 

 
बेंगळुरू :  जागतिक वारसा असलेल्या हंपी परिसरातील व्यासतीर्थ यांचे ५००वर्षांपूर्वीचे वृंदावन काही समाजकंटकांनी १७ जुलै रोजी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या घटनेमुळे असंतोषाचे वातावरण पसरले असून या घटनेचा निषेध केला जात आहे. दुसरीकडे,
 ही घटना घडल्यानंतर लगेचच मध्व संप्रदायाच्या अनुयायांनी आणि स्थानिक व्यक्तींना स्वयंस्फूर्तीने अवघ्या दोन दिवसांच्या आत या वृंदावनाचे पुनर्निर्माण केले आहे. रोजच्या पूजेच्या निमित्ताने काही अर्चक त्या ठिकाणी गेले असता वृंदावन पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचे त्यांना आढळून आले. हे वृंदावन हंपीजवळील अनेगुंदी येथील नववृंदावनांचा एक भाग आहे. नववृंदावन ही व्यासतीर्थांसहीत मध्व संप्रदायातील अन्य हिंदू संतांचे समाधीस्थान आहे.
 
 
सदर वृंदावन कोणी उद्ध्वस्त केले याचा तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या स्मारकाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या मते, हे कृत्य काही गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने किंवा जुन्या दुर्मीळ वस्तू प्राप्त कऱण्याच्या हेतूने केले असावे. परंतु, हे कृत्य भारताचा समृद्ध इतिहास नष्ट करू पाहणाऱ्या समाजकंटकांचे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
 
 
हंपीतील अन्य वारशांचे जतन करण्यात पुरातत्त्व विभाग या पूर्वीही असफल ठरला आहे. यापूर्वी हंपीतील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर परिसरातील काही खांब समाजकंटकांनी उद्ध्वस्त केले आहेत. पुरातत्त्व विभागाचे महत्त्वपूर्ण स्थळ आणि स्मारकांच्या सुरक्षेबाबत असलेले औदासीन्य वेळोवेळी प्रत्ययाला आले आहे. विशेष म्हणजे, व्यासतीर्थ वृंदावन हे १५६५ साली परकीय आक्रमणात सुरक्षित राहिले होते.

 
 

'हंपी हे विजयनगरच्या साम्राज्याच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होते ज्याने हिंदू संस्कृतीची समृद्ध आध्यात्मिक वारसा आणि ज्ञान त्याच्या वास्तुकलातून प्रदर्शित केले. हंपीमधील वारसा स्थानांचा नाश करण्याचा हा प्रयत्न आमच्या सांस्कृतिक वारसाचा अपमान', असे ट्विट करत भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0