महाराष्ट्र काँग्रेसचे नशीब बाळासाहेबांच्या ‘हाती’

20 Jul 2019 11:41:49

 

 
काँग्रेसमधील आमदारांची गळती त्वरित थांबवणे व काँग्रेसच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, ही सर्वात मोठी आव्हाने सध्या बाळासाहेब थोरातांसमोर आहेत. त्यांचे कट्टर पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे-पाटील आता ‘भाजपवासी’ होऊन मंत्री झाले असले तरी त्यांनी पक्षातून बाहेर पडताना काँग्रेसला सुरुंग लावला आहे.
 

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या नेतृत्त्वाने पदभार स्वीकारला. ही औपचारिक प्रक्रिया असली तरी नव्या शिलेदारांसाठी हा खरोखरचा ’भार’च असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे संगमनेरचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. त्यांच्या दिमतीला पाच-पाच कार्याध्यक्षही पक्षाने दिले आहेत. आ. बसवराज पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. विश्वजीत कदम, माजी आ. नितीन राऊत, मुझफ्फर हुसेन या राज्याच्या विविध भागांतील पाच कार्याध्यक्षांनीही आपला कार्यभार नुकताच स्वीकारला. काँग्रेसने अशाप्रकारे पाच कार्याध्यक्ष नेमून पहिल्यांदाच असा प्रयोग केला आहे. खरं म्हटलं तर सध्या काँग्रेस पूर्णपणे शरपंजरी पडली असल्याने ते कुठलाच प्रयोग करण्याच्या परिस्थितीत नाहीत.
 
 

पण, जास्तीत जास्त माणसांना पदे देऊन पक्षात गुंतवून ठेवायचे, या उद्देशानेच काँग्रेसने हा अवसानघातकी प्रयोग केल्याचे दिसते. पण, हा प्रयोग त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यताच जास्त आहे. कारण, या पाच कार्याध्यक्षांपैकी आ. विश्वजीत कदम हे भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहे, असे उघडपणे म्हटले जाते. त्याचबरोबर अमरावतीच्या एक यशोमती ठाकूर सोडल्या, तर उर्वरित कार्याध्यक्षांचे पक्षातील कर्तृत्व यथातथाच आहे. त्यामुळे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर सत्ताधार्‍यांचे आव्हान तर आहेच, पण काँग्रेसअंतर्गतही खूप मोठी आव्हाने असणार आहेत. एकेकाळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदी खालोखाल प्रदेशाध्यक्षपदासाठीही स्पर्धा रंगायची. मुख्यमंत्रिपदाबरोबरच प्रदेशाध्यक्षपदासाठीही किमान दहा नावे चर्चेत असत. आता ही जबाबदारी घ्यायला कुणी पुढे येत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ त्याप्रमाणे काँग्रेसचे दिवस फिरले (संपले) आहेत, एवढे नक्की. आता यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन बरेच दिवस उलटले होते. परंतु, चव्हाणांच्या जागी बाळासाहेब थोरात यांचेच फक्त नाव समोर येत होते.

 
 
नाही म्हणायला सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांची नावेही घेतली जात होती. पण, या नावांना पक्षातूनच फारसा प्रतिसाद नव्हता. त्यामुळेच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला बाहेरून (म्हणजे शिवसेनेतून) आलेल्या विजय वडेट्टीवारांना संधी द्यावी लागली. कारण, काँग्रेसमध्ये सध्या आक्रमकता औषधालाही शोधून सापडत नाही. बाळासाहेब थोरात यांचीही ही मोठी कमजोरी आहे. त्यांच्यावर याआधी कधीही सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नाही आणि त्यांनी कधी रस्त्यावर उतरून संघर्षही केला नाही. त्यामुळे आता त्यांना मिळालेली जबाबदारी त्यांच्यासाठी निश्चितच आव्हानात्मक ठरणार आहे. या गोष्टीचा फायदा त्यांचे पारंपरिक विरोधक आणि सरकारमधील नवीन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उचलण्याची शक्यता आहे. थोरात यांच्याकडे नेतृत्त्व असतानाच अर्ध्याधिक काँग्रेस संपवणे, हे विखे यांचे लक्ष्य असल्याचे बोलले जाते. 
 
 
 
 गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे उमेदवार छाननी समितीची जबाबदारी दिली होती, त्या समितीचे ते अध्यक्ष होते. ती जबाबदारी त्यांनी अगदी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडल्याने काँग्रेसचे ‘रणछोडदास’ माजी अध्यक्ष राहुल गांधी थोरात यांच्या कामावर प्रभावित झाले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी राहुल यांनी संगमनेरमध्ये मुक्कामही केला होता. यातूनच थोरात यांच्याकडे ही मानाची, पण अवघड जबाबदारी दिल्याचे म्हटले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या अडीच महिन्यांवर विधानसभा निवडणूक असताना आलेली अध्यक्षपदाची जबाबदारी थोरात कशी निभावतात, यावर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष असेल. काँग्रेसमधील आमदारांची गळती त्वरित थांबवणे व काँग्रेसच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, ही सर्वात मोठी आव्हाने सध्या बाळासाहेब थोरातांसमोर आहेत. त्यांचे कट्टर पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे-पाटील आता ‘भाजपवासी’ होऊन मंत्री झाले असले तरी त्यांनी पक्षातून बाहेर पडताना काँग्रेसला सुरुंग लावला आहे.
 
 

आजघडीला आ. कालिदास कोळंबकर, आ. जयकुमार गोरे, आ. भारत भालके, आ. अब्दुल सत्तार, आ. विश्वजीत कदम (कार्याध्यक्ष), विदर्भातील आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुनील केदार, आ. राहुल बोंद्रे हे आठ आमदार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे, पण तांत्रिकदृष्ट्या अजूनही काँग्रेसमध्ये असलेले आ. नितेश राणे काँग्रेसबाहेर गेल्यातच जमा आहेत. या नऊ आमदारांव्यतिरिक्त आणखीन किमान दहा आमदार काँग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत आहेत. हे आमदार फक्त युती झाली तर आपला मतदारसंघ नेमक्या कोणत्या पक्षाकडे (भाजप वा शिवसेना) जाईल, याची वाट बघत आहेत. ही पक्षफुटी थोरात कसे थांबवतात, याकडे उरल्यासुरल्या काँग्रेसवाल्यांबरोबरच सर्वांचेच लक्ष लागले आहे. यामध्ये काही अंशी जरी थोरात यशस्वी ठरले, तर त्यांची कारकीर्द सार्थकी लागली, असे म्हणता येईल. पण, जसे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असताना काँग्रेस सत्तेबाहेर पडली, त्याप्रमाणे थोरात यांच्याकडे अध्यक्षपद असताना काँग्रेस विशीत (आमदारांची संख्या चाळीस वरून वीस) नाही आली म्हणजे मिळवली, असे काँग्रेसच्याच वर्तुळात बोलले जात आहे.

 

1999 मध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी’ नावाची वेगळी ‘प्रतिकाँग्रेस’ काढली होती. त्यावेळी अवघड परिस्थितीतही तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी सर्वाधिक आमदार निवडून आणत काँग्रेसची नौका तीरावर लावली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रिपदही मिळाले होते. तोच आदर्श ठेवून थोरात यांना काँग्रेसची नौका हाकावी लागणार आहे. बाळासाहेब थोरात यांचे व्यक्तिमत्त्व नेमस्त असल्याने त्यांचे मित्रपक्षांबरोबरच सत्ताधार्‍यांशीही चांगले संबंध आहेत. पण, ही विधिमंडळाची जबाबदारी नसल्याने त्यांना भाजप-शिवसेनेविरोधात आक्रमक व्हावे लागणार आहे. त्यांचे राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही, एवढे सध्या तरी नक्की आहे.

 
 
 पण, थोरात यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघावर दावा केला. या मतदारसंघातून पवार कुटुंबाची ‘धाकटी पाती’ म्हणून ओळख असणारे रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवणार, हे काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले होते. असे असताना थोरात यांचा हा दावा राष्ट्रवादीच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा ठरू शकतो. आधीच दुसर्‍या धाकट्या पातीचा (पार्थ पवार) मावळमध्ये झालेला पराभव पवार कुटुंबीयांच्या वर्मी बसला आहे. असे असताना रोहितच्या विजयाबाबत स्वतः शरद पवार लक्ष घालण्याची शक्यता आहे. पण, सुरुवातीलाच थोरात यांनी याप्रश्नी ‘हात’ घातल्याने आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते. असे जिल्ह्याजिल्ह्यातील जागावाटपाचे नाजूक प्रश्न थोरात यांना मोठ्या कुशलतेने हाताळावे लागणार आहेत.
 
 

‘रोहित पवार प्रकरण’ हे त्याची झलक म्हणावी लागेल. त्यासाठी थोरातांना त्यांच्याच मतदारसंघापासून सुरुवात करावी लागणार आहे. तसेच इतर छोट्या पक्षांबरोबरच्या आघाडीबाबतही त्यांना भूमिका घ्यावी लागेल. वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा दणका दिल्याने त्यापासून योग्य धडा घेऊन थोरातांना पुढील वाटचाल करायची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोठमोठे गड ढासळले आहेत. त्यात त्यांच्या संगमनेर मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीत विरोधी उमेदवार पंचवीस हजारपेक्षा जास्त मतांनी पुढे होता. त्याचबरोबर त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे थोरातांना सुरुवात ‘होमग्राऊंड’मधूनच करावी लागणार आहे. थोरात यांना सोबतीला दिल्या गेलेल्या कार्याध्यक्षांनी त्यांना मदत करावीच, पण मदत नाही जमली तर निदान मनस्ताप तरी देऊ नये, अशी थोरात यांनी अपेक्षा ठेवणे गैर नाही.

 
 
विदर्भात त्यांच्या जोडीला नितीन राऊत व आ. यशोमती ठाकूर हे दोन कायार्र्ध्यक्ष आहेत. राऊत हे बर्‍यापैकी वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असून ठाकूर या काही प्रमाणात पक्षकार्यासाठी उपयोगी ठरू शकतात. लातूरचे आ. बसवराज पाटील यांचे विधानसभेतील काम जेमतेमच आहे. ते फार अपवादानेच तोंड उघडतात, अशी परिस्थिती. चौथे मुझफ्फर हुसेन यांच्याकडे मुंबई व कोकणची जबाबदारी पक्षाने दिली आहे, तर पश्चिम महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विश्वजीत कदम यांना संधी देण्यात आली आहे, तर नेहमीप्रमाणे ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेणार्‍या काँग्रेसने या निवडीमध्येही जातीय समीकरणांचा विचार केलेला दिसतो. राऊत मागासवर्गीय, तर ठाकूर या इतर मागासवर्गीय समाजातून येतात. महाराष्ट्रात अल्पसंख्य असणार्‍या लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व बसवराज पाटील करतात, तर मुझफ्फर हुसेन मुस्लीमधर्मीय आहेत. पतंगराव कदम यांचे चिरंजीव असलेले आ. विश्वजीत कदम हे मराठा समाजातून येतात. लातूरचे अमित देशमुख, धुळ्याचे कुणाल पाटील, कोल्हापूरचे सतेज पाटील यांसारख्या तरुण नेत्यानांही सक्रिय करण्यासाठी बाळासाहेबांना मेहनत घ्यावी लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात जवळजवळ सर्व काँग्रेस आमदारांची देहबोली कमालीची नकारात्मक होती. त्यांच्या भविष्याची चिंताच जणू त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होती. ही चिंता जरी काही प्रमाणात कमी होऊ शकली, तरी थोरात जिंकले, असेच म्हणावे लागेल.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0