‘काँग्रेस’ नावाची जुनी इमारत

    दिनांक  02-Jul-2019पावसाळा सुरू झाला की एक हमखास मागणी सुरू होते ती म्हणजे जुन्या इमारतींची संरचना तपासणी करण्याची. अशी इमारत जुनी झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोक ती सोडून जाण्याचा शहाणपणा दाखवितातच; परंतु ज्यांच्यासमोर काहीच पर्याय शिल्लक राहत नाही, त्यांना मात्र जीव मुठीत धरून तिथेच राहावे लागते. हा सगळा संदर्भ इथे मांडण्याचे कारण सध्या सुरू असलेला धुवांधार पाऊस नसून कॉँग्रेसनावाच्या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची स्थिती हा आहे.

 

पावसाळा सुरू झाला की एक हमखास मागणी सुरू होते ती म्हणजे, जुन्या इमारतींची संरचना तपासणी करण्याची. पावसाळ्याच्या तडाख्यात जर जुनी-पुराणी इमारत कोसळली, तर त्यात कुणाकुणाचे काय नुकसान होईल, हे सांगता येत नाही. अशी इमारत जुनी झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोक ती सोडून जाण्याचा शहाणपणा दाखवितातच. परंतु, ज्यांच्यासमोर काहीच पर्याय शिल्लक राहत नाही, त्यांना मात्र जीव मुठीत धरून तिथेच राहावे लागते. हा सगळा संदर्भ इथे मांडण्याचे कारण सध्या सुरू असलेला धुवांधार पाऊस नसून कॉँग्रेसनावाच्या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची स्थिती हा आहे. २०१४ आणि नंतर २०१९ साली जो काही तडाखा या राष्ट्रीय पक्षाला बसला, त्यातून तो काही सावरायला तयार नाही. स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागाचे पाठबळ, सरदार पटेल, लालबहाद्दूर शास्त्री आणि कितीतरी नावे घेता येतील अशा नेत्यांची मांदियाळी असलेला हा राजकीय पक्ष इंदिरा गांधींच्या हातात येईपर्यंत खरोखरच अजिंक्य होता. सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा पराभव करणे कुणालाही शक्य नसते. कारण, यासाठी लागणारी आणि त्याच्या विरोधात वापरली जाऊ शकतात अशी सारी संसाधने त्याच व्यक्तीच्या हातात असतात. मग अशा व्यक्तींच्या कारकिर्दीला क्षय लागतो कसा? तर तो लागतो त्या व्यक्तींनीच केलेल्या चुकांमधून!

 

काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी आज जे राजीनामा नाट्य चालविले आहे, त्याची बीजेही काँग्रेसच्या नेतृत्वाच्या चुकांमध्येच दडली आहेत. वस्तुस्थितीत भाजपला अखिल भारतीय पर्याय म्हणून उभा राहू शकतो असा पक्ष म्हणजे काँग्रेसच. कारण, या पक्षाचे अखिल भारतीय स्वरूप आजही कायम आहे. स्वरूप कायम असले तरी त्यासाठी लागणारे चैतन्य मात्र पूर्णपणे हरपले आहे. त्यामुळे आज राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची आपली मागणी पक्षासमोर रेटून धरली असली, तरी त्यांना पर्याय म्हणून जे लोक समोर येत आहेत, ते मात्र राहुल गांधींपेक्षा भयंकर, अशी स्थिती आज काँग्रेससमोर येऊन ठेपली आहे. सुशीलकुमार शिंदे वगैरे नावे ही तर पराभूतांच्या स्पर्धेत पहिली आलेल्या मंडळींची नावे आहेत. पण, पक्षात लोकशाही विरुद्ध मालकीया पद्धतीला सुरुवात झाली की, पुढे काहीच मार्ग राहत नाही. वस्तुत: राहुल गांधी ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी. मूळ उंट वाकवायला सुरुवात केली ती नेहरूंनीच. इंदिरा गांधींच्या रूपाने आपला वारस त्यांनी या उंटाच्या पाठीवर लादला आणि पुढे गांधी घराण्याच्या वारसांच्या वजनानेच हा उंट इतका वाकला की त्याची आजची स्थिती निर्माण झाली आहे. इंदिरा गांधी या तशा नेतृत्व क्षमता असलेल्या व्यक्ती, पण त्याचबरोबर काँग्रेसमध्ये युवा नेतृत्व आणण्याच्या नावाखाली त्यांनी संजय गांधींना पक्षात रुजविण्याचा प्रयत्न केला. पक्ष संघटनेच्या कुठल्याही अनुभवाशिवाय संजय गांधी पक्षाच्या शीर्षस्थ ठिकाणी येेऊन बसले आणि त्यांच्या दुर्दैवी निधनापर्यंत जो काही सावळा गोंधळ पक्षात चालू होता तो सर्वश्रुत आहेच.

 

तरीसुद्धा काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाही संपविण्याचे आणि मोठे नेते खच्ची करण्याचे सारे श्रेय जाते ते इंदिरा गांधींनाच. नेहरूंच्या काळात ठिकठिकाणी कार्यकर्ते असलेले नेतेच नंतर राज्या-राज्यात मुख्यमंत्री म्हणून किंवा त्या राज्यातील शीर्षस्थ नेते म्हणून उदयाला आले. ती सर्व ताकदीची माणसे होती. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांची जी स्थिती केली गेली, ती अन्य राज्यातल्या नेतृत्वाचीदेखील केली गेली. महाराष्ट्रात अंतुले, मध्य प्रदेशात पी.सी.सेठी, कर्नाटकात गुंडूराव अशा नेत्यांना इंदिरा गांधींनीच आणले. मुळात ही कुवत नसलेली माणसे होती. त्यांनी काँग्रेेस पक्ष संघटनेेचे अतोनात नुकसान केले. मुळात सर्व प्रकारच्या विचारांच्या लोकांना सामावून घेणारा हा पक्ष होता. गांधी घराण्याची मालकी त्यावर प्रस्थापित करण्यासाठीच हे सारे खेळ इंदिरा यांनी खेळले. पुढे सोनिया गांधीही याच वारशाच्या अनुयायी ठरल्या. यातून पक्षाचे जे काही व्हायचे तेच झाले. आपल्या विरोधात जाऊ शकतील असे वाटल्यामुळे इंदिरा गांधींनी जे केले तेच नरसिंहराव ते सीताराम केसरी यांच्यासोबत झाले. अंतरात्म्याचा आवाजइतरांना ऐकविण्याचा जो काही खेळ सोनिया गांधी त्यावेळी खेळल्या, त्याचाच परिणाम म्हणून २०१४ पासून काँग्रेसचे अनेक नेते निवडणुकीच्या राजकारणातून पळ काढते झाले. बुडत्या काँग्रेसकडूनही अपेक्षा ठेवणार्‍यांची आपल्या देशात कमी नाही. रामचंद्र गुहांसारख्या विद्वान गृहस्थाने सोनिया गांधींनी इब्न खल्दून का वाचावाअशा आशयाचा लेख लिहिला आहेे. आत्ताच्या राजकारणात पूर्णपणे प्रभावशून्य झालेल्या समाजवाद्यांचे मुखपत्र असलेल्या साधनासाप्ताहिकाने तो प्रकाशितही केला आहे. इंदिराते सोनियाहा आपल्या परिवाराचा ताबा कायम ठेवण्यासाठी जे काही झाले, त्याचा उल्लेखही न करता गुहांनी राहुलना अनुभवसंपन्न करण्यासाठी काय करायला हवे होते, याचा पाढा वाचत विलाप केला आहे. गुहांचे दुर्दैव असे की, काँग्रेस मोदींना पर्याय होऊ शकते, असे वाटत असले तरीही सोनिया अथवा राहुल यांना त्यांच्या विद्वत्तेतून काही शिकावे असे मुळीच वाटत नाही. आता राहुल गांधी आणि त्यांच्या भोवतालच्या खुज्या नेत्यांव्यतिरिक्त फारसे कुणीही शिल्लक नाही. वस्तुत: मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय मोठा होता. खुद्द भाजपच्या गोटातही हे काय चालले आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राहुल गांधींना त्या विजयाचे परिवर्तन राष्ट्रीयस्तरावर करताच आले नाही. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात येणार्‍या काळात निवडणुका आहेत. पराभव विसरून कामाला लागा,’ असे सांगण्याचे त्राणही आता राहुल गांधींमध्ये उरलेले नाही. त्यांनी सरळ आघाड्या करण्याचे संकेत संबधितांना देऊन टाकले आहेत. महाराष्ट्रात अशोक चव्हाणांच्या ठिकाणी कोण, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. त्यामुळे काँग्रेसनावाची जुनाट इमारत अजून किती पावसाळे पाहते, हे पाहत राहणेच आपल्या हातात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat