बांगलादेशला हरवून भारत उपांत्य फेरीत

    दिनांक  02-Jul-2019


 


बर्मिंघम : इंग्लंड येथे चाललेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बांगलादेशचा २८ धावांनी पराभव करत भारतीय संघाने ही मजल मारली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दिलेल्या ३१५ धावांचे लक्ष बांगलादेशला भेदता आले नाही. बांगलादेशने ४८ षटकांमध्ये सर्व गडी बाद २८६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे या विजयासह ऑस्ट्रेलियानंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा भारत हा दुसरा संघ ठरला आहे.

 

बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानामध्ये रंगलेल्या लढतीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवत १८० धावांची सलामी दिली. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतील चौथे व आपल्या करियरमधील २६ वे शतक झळकावत भारतीय संघाला ३१४ धावांपर्यंत पोहचवले. भारतीय संघाने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेश २८६ धावत गारद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ बळी, हार्दिक पांड्याने ३ बळी तर चहल, शमी व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat