मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रीय कृषी उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी

    दिनांक  02-Jul-2019
नवी दिल्ली : निती आयोगाने देशातील कृषी क्षेत्राच्या आमुलाग्र परिवर्तनासाठीस्थापन केलेल्या मुख्यंमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढवून देशातील शेतीच्या आमुलाग्र परिवर्तनासाठी उचलवायाच्या महत्वाच्या पावलांबाबत चर्चा करून महत्वपूर्ण सूचना देण्यासाठी निती आयोगाने देशातील मुख्यमंत्र्यांची उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल निती आयोगाला सादर करणार आहे.

 

समितीच्या निमंत्रकपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी.कुमारस्वामी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर , अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ या मुख्यमंत्र्याचा तसेच केंद्रीय कृषी, ग्रामीण विकास तथा पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची या उच्चाधिकार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर निती आयोगाचे सदस्य रमेश चंद हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

 

ही उच्चाधिकार समिती देशातील कृषी क्षेत्राच्या परिवर्तनासाठी विविध राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आधुनिक उपाययोजनांसह कालबध्द अमंलबजावणीसाठीच्या महत्वपूर्ण सूचना देणार आहे. कृषी विपणन व पायाभूत सुविधा क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक वस्तू अधिनीयम १९५५ मध्ये दुरुस्त्या सूचविणार आहे. कृषी क्षेत्रात निर्यात वाढ, अन्न प्रक्रिया क्षेत्राला गती देणे, कृषी क्षेत्रातील आधुनिक विपणनात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरण तयार करण्याबाबतही ही समिती सूचना देणार आहे.

 

जागतिक दर्जाचे कृषी तंत्रज्ञान करण्यासाठी उपाययोजना सूचविणे, शेतक-यांना उच्च दर्जाची बी बियाणे व शेती विषयक साहित्य उपलब्ध करून देणे याबाबत ही समिती सूचना करणार आहे. बाजारपेठेतील सुधारणांची e-nam, gram सह अन्य सरकार पुरस्कृत ऑनलाइन पोर्टलशी सांगड घालण्याबाबतही ही समिती सूचना देणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat