पावसाशी झुंजणाऱ्या मुंबईकरांच्या मदतीला नौदलाची टीम सज्ज

    दिनांक  02-Jul-2019


 


मुंबई : सलग तिसऱ्या दिवशी धुव्वाधार बरसणाऱ्या मुंबईकरांना पावसाने हैराण केले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी बचावकार्य सुरू आहे. कुर्ला परिसरात बचावकार्यासाठी नौदलाला पाचारण करण्यात आले आहे. महापालिकेकडून नौदलाला बचावकार्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार या भागात नौदलाने बचावकार्य सुरू केले आहे. 

कुर्ला परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. अनेक सकल भागांत पाणी साचले असून अनेक झोपडपट्ट्यांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. संपूर्ण रस्ते पाण्याने तुंबले असल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी प्रवाशांच्या गाड्या बंद पडल्याने अनेकांचा खोळंबा झाला आहे.
 

नौदलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी होड्यांची व्यवस्था केली आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी नौदलाचे जवान बचाव कार्य करत आहेत. तसेच रात्रभर या भागांत अडकून पडलेल्या मुंबईकरांच्या मदतीला नौदल धावून आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat